भविष्याची ऐशीतैशी

शीला शारंगपाणी
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

कन्या राशीला आठवडाभर पाण्याचं भय होतं. अशा काळात समुद्रावरून जायचं होतं. मनातून पार हादरले होते. बरोबरच सहलीला जाणाऱ्या आणखी एक-दोघांकडे चौकशी केली, तर त्यांचीही कन्या रासच निघाली. मग मात्र खचलेच.

कन्या राशीला आठवडाभर पाण्याचं भय होतं. अशा काळात समुद्रावरून जायचं होतं. मनातून पार हादरले होते. बरोबरच सहलीला जाणाऱ्या आणखी एक-दोघांकडे चौकशी केली, तर त्यांचीही कन्या रासच निघाली. मग मात्र खचलेच.

आपल्या मॉरिशस सहलीची बातमी संबंध सोसायटीभर तासाच्या आत पोचेल अशी व्यवस्था करून मी बसले होते. इतक्‍यात चोरगेबाई हातात पेपर हलवत आवेशात येत विचारत्या झाल्या, ""ए, तू कधी जाणार आहेस मॉरिशसला?'' मी आनंदाने उडालेच. या भवानीला कळले म्हणजे सगळ्यांनी बातमी ऐकली म्हणायची. ""मी ना याच शनिवारी पहाटे निघणार आहे.'' ""आणि तुझी रास कुठली? कन्या ना?'' ""हो, मग?'' ""तुझी मुलगी पण तुझ्याबरोबर जाणार आहे म्हणे आणि तिचीही रास कन्याच आहे, असे ऐकलेय. बघा बाई, अगं या पेपरात चक्क लिहिलंय, की या संपूर्ण आठवड्यात कन्या राशीला पाण्यापासून धोका आहे. '' मी मनातून हादरले. पण तसे न दाखवता त्यांना धीटपणे म्हटले, ""अहो, ही भविष्य वगैरे खरी नसतात हो.'' पण चोरगेबाई हार मानणाऱ्या नव्हत्या. ""अगं, पण कशाला विषाची परीक्षा बघायची. संबंध प्रवास समुद्रावरून.'' मी धपकन सोफ्यावर कोसळले.

थोड्याच वेळात हे बाहेरून आले. माझ्या डोळे वाहायला लागले. आनंदाच्या क्षणी मी का रडते, हेच त्यांना कळेना. सगळ्यांनी सोईस्कर समजूत करून घेतली, की आपल्याशिवाय हे घर कसे चालणार, या काळजीने मी रडते आहे. ""अगं, आठ-दहा दिवस तर आहेत. हां हां म्हणता उडून जातील.'' ""अहो, तसे नाही.'' मी जवळ जवळ किंचाळलेच आणि सर्व घडलेली हकिगत सांगितली. "हॅ, असे काही भविष्य बिविश्‍य नसते. आधी शांत हो आणि पाणी पी.' तेवढ्यात चिरंजीव ओरडले, ""आई, पाणी पिऊ नकोस. तुला पाण्याचे भय आहे ना!'' त्याच्या या विनोदावर सगळे खळाळून हसले. वातावरण जरा शांत झाल्यावर हे मला म्हणाले, ""हे बघ, तुमच्या विमानात शंभर तरी लोक असतील, त्या सगळ्यांचीच कन्या रास असणे असंभव आहे. मग ते बुडणार नाहीत, तर तू कशी बुडशील?'' ऐकून जरा दिलासा मिळाला. पण, मन भयंकर अस्वस्थ. मी "टूर ऑफिस'कडून या सहलीला जाणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक घेतले.
पहिला नंबर फिरवला. "हॅलो', त्रासिक आवाज. "मी बोलतेय!' "अहो, मी म्हणजे कोण? तुम्हाला काही नावबिव असेल ना?' "हो, आहे ना. मी शीला, मॉरिशसला जी टूर जाणार आहे, त्याबरोबर तुम्ही जाणार आहात ना?' "हो, पण तुम्हाला काय करायचेय?' "तुमची रास कोणती आहे हो?' "तुम्हाला कशाला हव्यात चौकशा? मला ठाऊक नाही. पण, लहानपणी मी खूप दंगे करायची, आईला खूप त्रास द्यायची. तेव्हा आई म्हणायची "ही कन्या म्हणजे संकटाची रास आहे' म्हणजे त्यावरून माझी रास कन्याच असेल.' फोन आपटला गेला.

दुसरा नंबर. "मी नाही, माझी पत्नी टूरवर जाणार आहे.' "मग त्यांची रास कुठली हे तुम्हाला ठाऊक आहे का?' "हो, न ठाऊक असायला काय झाले? सदैव दुविधेत असणारी व्यक्ती कुठल्या राशीची असणार? अहो, एक नंबरची कन्या रास. कांजीवरम नेसू की चंदेरी, अळूची भाजी करू की कारल्याची, हे ठरवण्यात सारा वेळ जातो आणि पानात दिसते ती भेंडीची बुळबुळीत भाजी.' "बरंय,' इतकेच मी कसेबसे बोलले.
तिसरा नंबर आवाजावरून तरुणीचा हे जाणवले. "हॅलो, मे आय हेल्प यू?' एवढ्या अगत्यशीलतेची सवय नसल्याने बावरले. ती एका ठिकाणी रिसेप्शनिस्टचे काम करत असल्याने ती सर्वांशीच नम्रतेने बोलते, हे कळल्यावर मन थोडे खट्ट झाले. "हॅलो, तुम्ही या शनिवारी मॉरिशसच्या सहलीवर जाणार आहात का हो?' "हो, मी आईबाबांना घेऊन जाणार आहे. त्यांना सोबत म्हणून. अहो काय करणार, सारखे भांडत असतात. त्यांच्या पत्रिका पाहून छत्तीस गुण जमतात म्हणून गुरुजींनी ओके केले. पण कसले गुण आणि काय सारखे वाद चालू असतात.' "तुम्हाला त्यांची रास ठाऊक आहे का हो?' "आईची आणि बाबांची एकच रास आहे कन्या. त्यामुळे तर गुण जमतात.' आणि "तुमची रास' मी चाचरतच विचारले. "माझी? मी या ज्योतिषांत वगैरे पडत नाही. पण, तुम्हाला म्हणून सांगते, माझी रासही "कन्याच' आहे. बरं, कुणीतरी आलेय मी फोन ठेवते. बरंय, मग भेटू आपण विमानतळावर.'

मी सहलीला जायचे रद्द करण्यासाठी गेले. तर, पन्नास हजारांपैकी फक्त पाचच हजार परत देऊ, असे सांगण्यात आले. नेहमीप्रमाणे द्विधेत पडले.
मॉरिशसला पोचले, पहिला फोन यांना लावला. "पोचलात ना सुखरूप, आता भविष्य वगैरे विसरा आणि मजा करा.' मी आनंदाने "हो' म्हटले खरे, पण लगेच एक शंका विचारली, "पण परत पाण्यावरूनच यायचेय ना!' यांनी कपाळावर हात मारल्याचे मला ऐकू आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sheela sharangpani write article in muktapeeth