हपापा... गपापा...

शिवराम गोपाळ वैद्य
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

लोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही.

लोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही.

चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो. बसने जावे लागे. एके दिवशी सकाळी असाच प्रवास करीत असताना, कुरुळी गावाजवळ एक मालमोटार रस्त्याच्या कडेला उलटी झालेली दिसली. ती मालमोटार एका बाजूला पडलेली असल्यामुळे रस्त्यात वाहतूक हळूहळू सुरू होती. पण, त्या मालमोटारीच्या भोवती बरेचसे लोक, कोणती तरी पाकिटे लुटत होते आणि ती घेऊन पळून जात होते. काही दुचाकी आणि चारचाकी गाडीवालेही आपापल्या गाड्या थांबवून, त्यातील पाकिटे आपापल्या गाड्यांमध्ये कोंबून तेथून पोबारा करताना दिसले. आमची गाडी त्या मालमोटारीच्या जवळ गेली तेव्हा लक्षात आले, की त्यातील ब्रॅंडेड कंपनीच्या चपला-बूट-सॅंडल्सच्या पाकिटांची लुटालूट सुरू होती. आमच्या गाडीचा ड्रायव्हर प्रामाणिक असल्यामुळे बसमधील प्रवाशांना ही लुटालूट करण्याची संधी मिळाली नाही.
आमच्या "लंचटाईम'नंतर आमच्या कंपनीतील माल नेण्यासाठी एक मालमोटार आली. ड्रायव्हरच्या केबीनमध्ये त्याच लुटमारीतील पाकिटे खचाखच भरलेली दिसली. तसेच मालमोटारीच्या मागच्या लोड बॉडीमध्ये आणि केबीनवरच्या रॅकमध्येही मोठमोठी पाकिटे भरलेली दिसली. कंपनीतील कामगारांनी काम सोडून त्या मालमोटारीवरच हल्ला चढवला आणि ज्याच्या हाताला जेवढी पाकिटे लागतील ती घेऊन पळ काढायला सुरुवात केली. तो ड्रायव्हर आणि क्‍लीनर ही लुटालूट थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते, पण कोणीच थांबत नव्हते. तेवढ्यात एक कामगार तावातावाने त्या ड्रायव्हरकडे आला आणि त्याने पळवलेला "जोडा' त्याच्या पायाला "सूट' होत नसल्याने बदलून दे, म्हणून त्याच्यामागे लकडा लावला. दुसऱ्या कामगाराने तर कमालच केली. त्याला एकाच पायाचे दोन बूट आले होते, तेही बदलून दे म्हणून तोही ड्रायव्हरच्या कनपटीला बसला. "अरे लेकानो, बदलून मागताय? लाज वाटत नाही? काय विकत घेतलाय का माझ्याकडून?' असे ड्रायव्हर विचारत होता. त्या ड्रायव्हर, क्‍लीनरच्या पायातील नवीन जोड तेवढेच राहिले आणि बाकीचा सर्व हपापाचा माल गपापा झाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivram gopal vaidya write article in muktapeeth