मंगळसूत्रामागचं कथासूत्र

मंगळसूत्रामागचं कथासूत्र

मंगळसूत्र एका मण्याचेही चालेल. गाठवलेले चालेल. मनासारख्या डिझाइनचे मिळाले तर उत्तमच. भारतीय स्त्रीचा सर्वात आवडता दागिना तो एकच. तो मिळवताना कष्ट करावे लागले, तर त्या आनंदाला सोन्याचे मोल असते.

मंगळसूत्र हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. मंगळसूत्र खोटे असो वा खरे, त्याची किंमत कधी होत नाही आणि होणारही नाही. मंगळसूत्र हे पती- पत्नीला बांधून ठेवणारे एक अतुट बंधन आहे. प्रत्येक स्रीला आपल्याकडे एक छानसे सोन्याचे मंगळसूत्र असावे असे वाटतेच. घरच्यांनी ठरवून लग्न करणाऱ्या मुलीला लग्नात सोन्याचे मंगळसूत्र मिळतेच. पण... पण... लग्न जर प्रेमविवाह असेल, घरच्यांची जर मदत नसेल, तर मंगळसूत्र थोड्याफार सोन्यात गाठवलेले असण्याची शक्‍यता अधिक असू शकते. माझाही प्रेमविवाहच. 1997 मध्ये आमचा प्रेमविवाह झाला. 

लग्नाआधी आम्ही दोन वर्षे एकमेकांना भेटत होतो. तेव्हापासूनच माझ्या पतींनी दरमहा दोनशे रुपयांची भिशी एका माहितीच्या सोनाराकडे लावली होती. त्यातून त्यांनी मला साधारण तीन- चार ग्रॅमचे गाठवलेले मंगळसूत्र केले होते. माझी आई, सासूबाई, शेजारपाजारच्या स्त्रिया यांच्याही गळ्यात मी गाठवलेली मंगळसूत्रेच पाहात आले होते, त्यामुळे मला माझे मंगळसूत्र खूप आवडायचे. 

आमची परिस्थिती बेताचीच होती. आम्ही दोघे खासगी कंपनीत नोकरी करीत होतो. जेमतेमच पगार होता. घरखर्च भागवून महिनाअखेरीस आमच्याकडे कधीच पैसे नसायचे. पैसे शिल्लक कधी पडलेच नाहीत. अशा परिस्थितीत मी खूप आजारी पडले. उधार- उसनवारी करून यांनी उपचार केले. पैसे पुरतच नव्हते. घरात होते- नव्हते तेवढे सगळे सोने मोडावे लागले. अगदी मंगळसूत्रसुद्धा मोडावे लागले. त्या वेळी माझ्या पतींना खूप वाईट वाटले; पण त्या वेळी दुसरा काही उपायच नव्हता. 

आम्ही दोघे, सासूबाई व दीर असे एकत्रच राहात होतो. माझ्या नणंदेचा व दिरांचा हट्ट होता, की दिरांच्या लग्नात मला व माझ्या होणाऱ्या जावेला सारखेच मंगळसूत्र करायचे. पण त्या वेळी आमचे "बजेट' ढासळलेले होते. पैसे कमी पडत होते. दोघींचे मंगळसूत्र होणे शक्‍य होत नव्हते. येणाऱ्या नव्या मुलीच्या अंगावर मंगळसूत्र असणे आम्हाला सगळ्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. 

मी ज्या कंपनीत काम करत होते, ती कंपनी खूप लांब गेली होती, त्यामुळे मी ते काम सोडण्याचा निर्णय घेतला. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळे मला कंपनीकडून प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युइटी मिळून साधारण लाखभर रुपये मिळाले होते. तेव्हा माझ्या दीर व जावेने या पैशांत मंगळसूत्र करा असा सल्ला दिला होता. त्यांचे म्हणणे मला पटलेदेखील. कारण सर्वसामान्यांना जर मंगळसूत्र घ्यायचे असेल, तर एकदम एवढे पैसे येत नाहीत. गुंज गुंज सोने साठवूनच मंगळसूत्र घेता येते. पण नेमके त्याचवेळी घर डागडुजीला आले होते. नंतर एवढे पैसे एकत्र मिळणार नाहीत आणि घराची डागडुजी राहून जाईल, असा सगळा विचार करून आम्ही मंगळसूत्र घेण्याऐवजी घर नीट करायचे ठरविले. पण त्यांनी तेव्हा मला वचन दिले, मी तुला माझ्या पैशातून नक्की मंगळसूत्र करेन. 

नातेवाइकांच्या लग्नकार्यात, सण-समारंभात इतरांच्याकडील दागदागिने पाहून हे मला म्हणायचे, बाकी कुठला दागिना असो वा नसो, तुला एक मंगळसूत्र तरी नक्कीच करायला हवे. मला स्वतःला सोन्याचे कधीच अप्रूप वाटले नाही. मला त्यांची मिळालेली साथ, त्यांचा सहवास, त्यांचे माझ्यावर असलेले जीवापाड प्रेम याची किंमत मला जास्त मोलाची वाटते. त्यांनी निश्‍चय केला होता. ते हळूहळू पैसे साठवत होते. पण घरातील अडचणी, आजारपण, मुलीचे शिक्षण यातच पैसे खर्च होत होते आणि माझे मंगळसूत्र करायचे मागे पडत होते. 

नुकतीच आमच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली. त्यातच आम्ही बचत करीत गेलो होतो, ती पोस्टातील रक्कम मिळाली. थोडेफार यांनी साठवलेले पैसे हाताशी होते. लक्ष्मी रस्त्यावरच्या एका सोन्याच्या पेढीवर सुवर्ण संचय योजनेत पैसे गुंतवून काही सोने जमा केले होते. ही सर्व गोळाबेरीज करून आमच्या लग्नाच्या वाढदिवशी यांनी मला मंगळसूत्र केले. तो दिवस गुढी पाडव्याचा होता. काही वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही आमच्या हक्काच्या घरात प्रवेश केला होता. त्याचदिवशी मला मंगळसूत्र मिळाले होते. त्या दिवशी आम्ही गुढी उभारली. देवाला आणि गुढीला नमस्कार केला आणि यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले. घरात दुसरे कोणी नव्हते. आमच्या मुलीनेच आम्हा दोघांना औक्षण केले आणि ती म्हणाली, ""तुमच्या लग्नाच्या वेळी बाकी सगळे होते, पण मी नव्हते. म्हणून आज बाकी कोणी नाही; पण मी एकटी तुमच्या सोबत आहे.'' तिचे हे वाक्‍य ऐकून आम्हा दोघांचेही मन गहिवरून आले होते. हा आनंदाचा दिवस आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही. मी खूप खूप खूष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com