अदलाबदली

muktapeeth
muktapeeth

काळ बदलतो. आपण बदलतो. आपली कर्तव्ये बदलत जातात आणि मग आपापल्या भूमिकाही उलटसुलट होतात.

बदलत्या काळासोबत बऱ्याच गोष्टी बदलत जातात. नव्या आणि जुन्या पिढ्यांच्या विचारांची, मतांची देवाण-घेवाण होते. अडचण होणारे जुने जाते, सुलभशा नवीन परंपरांचा आनंदाने स्वीकार होतो. काही गोष्टी झटक्‍यात बदलतात, तर काही गोष्टी हळूहळू कधी बदलत गेल्या ते कळतही नाही. तर अशा बदलत्या गोष्टींसोबत माझ्या आणि आईच्या "ड्यूटी'ची कधी अदलाबदली झाली, समजलेच नाही. अचानकच ते लक्षात आले. गंमत वाटली.

"अगं आता चॉकलेट मिळणार नाही, दात खराब होतील,' अशी माझ्या लहानपणी आई मला दम द्यायची. आता मीच आईला सूचना देत असते, "ए, जास्त गोड खाऊ नकोस. पुरे हं आता तुझे उपवास-बिपवास. चहा नाही मिळणार, हे ज्यूस पी.' लहानपणी मैत्रिणींच्या बर्थडे पार्टीला, सणाला मी कोणते कपडे घालायचे हे आई ठरवायची. आता लग्न, बारसे, वास्तूशांती अशा कार्यक्रमांच्या वेळी "तू या साडीवर या अशा बांगड्या घाल आणि ही पर्स घेऊन जा, छान वाटेल' असे सांगताना मीच तिची आई बनलेली असते. रविवारची सुटी म्हणजे तिचा नवीन पदार्थांचा (खाऊचा) बेत असायचा पूर्वी आणि आता जेव्हा मी यू ट्यूबवरच्या रेसिपीज बनवते तेव्हा मी तिची आई झालेली असते. दर आठवड्याला नवा पदार्थ खाऊ घालायची प्रथा दोघींनीही पाळली आहे. "तू अभ्यास करत नाहीस, माझे ऐकले नाहीस तर शाळेतल्या वर्गशिक्षिकांना भेटायला येणार आहे मी, तुझी तक्रार करेन' अशी धमकी शाळकरी मला बऱ्याच वेळी ऐकायला मिळायची. आता "तू वेळेवर जेवण कर, नको म्हटले तरी आज उपवास केलास पुन्हा, व्यायाम कर नाहीतर तुझ्या डॉक्‍टरांना सांगेन' असे बजावताना मी तिची आईच असते.

ही अशी अधून-मधून "ड्यूटीं'ची अदलाबदली होते, पण उरलेल्या वेळी मी आजही तिची लहान मुलगीच आहे, तिच्या निर्णयावर, सल्ल्यांवर आणि परवानगीवर अवलंबून राहणारी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com