जबरदस्त इच्छाशक्ती

श्रीकांत कुलकर्णी
शुक्रवार, 18 मे 2018

इच्छा हवी. युद्धमय वातावरणात सीमेवर राहूनही अभ्यास करता येतो आणि पदवीपर्यंत शिक्षणही पूर्ण करता येते. अडचणींवर मात करीत शिकता येते.

इच्छा हवी. युद्धमय वातावरणात सीमेवर राहूनही अभ्यास करता येतो आणि पदवीपर्यंत शिक्षणही पूर्ण करता येते. अडचणींवर मात करीत शिकता येते.

सायरन झाला. एअरमॅन मेसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे पत्रपेटी पाहिली. माझ्यासाठी पोस्टकार्ड मिळाले ! नजर टाकली. एकदम आनंदलो. एसएससी झाल्यावर मी हवाईदलात भरती झालो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याला बदली झाली. जेट विमानावर इलेक्‍ट्रिशियन म्हणून रुजू झालो. दोन वर्षे रजा न घेतल्याने मोठ्या रजेवर बडोद्याला परतलो. मित्रांबरोबर चेष्टामस्करी करताना मोठी बहीण म्हणाली, "त्याची इतकी विकेट घेऊ नको, तो महाविद्यालयात आहे.' मला धक्का बसला. मन खट्टू झाले. कारण मी त्याच्याहून हुशार होतो. पण खो-खोच्या खेळात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि मी एसएससी केवळ उत्तीर्ण होऊ शकलो.

रजा रद्द करून ताबडतोब पुण्याला आलो. मित्रांच्या सल्ल्याने पटनाईक सरांना भेटून इंटरचा फॉर्म भरला. एसएससी उत्तीर्ण झाल्यावर दोनांहून अधिक वर्षांचे शिक्षणात अंतर पडले असेल, अशांना मध्य प्रदेशमध्ये थेट इंटरला बसू देत. इंग्रजी माध्यम घेतले. शुल्क भरले. पण पुस्तके नव्हती, ती पुस्तके पटनाईक सर तीन-चार दिवसांत देणार होते. त्यांनी विचारले, "परीक्षेकरिता केंद्र कोणते हवे आहे, उज्जैन, इंदोर का भोपाळ?' विचार करून सांगतो, असे सांगून मी परत लोहगावला आलो.

चीन सीमेवरचे वातावरण तापले होते. आमच्या विमानाच्या पथकासहित तातडीने सीमेवर जावे लागले. सरांनी बडोद्याला पाठविलेली पुस्तके वळवून सीमेवर माझ्याकडे पाठविण्यात आली. हिंदी माध्यमातील पुस्तके पाहून नाराज झालो. तेच वाचून मनात इंग्रजीत भाषांतर करून अभ्यास करू लागलो. परीक्षा मार्चमध्ये होती. मी रजेचा अर्ज दिला. रजा फक्त परीक्षेपुरतीच मंजूर झाली. बडोद्याला आलो तर घरातील मंडळींनी सरांनी पाठविलेले टपाल मला सीमेवर पाठविलेले होते. त्यात माझा परीक्षा क्रमांक व परीक्षा केंद्र यांचा उल्लेख होता. शुक्रवार उजाडला, सोमवारपासून परीक्षा. दुपारी इंदोरकरिता निघालो. रात्री दहा वाजता पोचलो. टांगा करून होस्टेल पाहिली, जागा नाही. टांगा रस्त्यात एका बाजूला उभा केला व एका बोळात शिरलो. श्री. जोशी (बी.ए. एलएल.बी. ऍडव्होकेट एचसी) असा नामफलक वाचला.

दरवाजावरील बेल दाबली. पन्नाशीतील एक सद्‌गृहस्थ आले व मला न्याहाळले वरून पायापर्यंत, काळ्या चष्म्याच्या भिंगातून ! मी घाबरलो, म्हणालो, "मी श्रीकांत कुलकर्णी, एअरफोर्समध्ये आहे. इंटरच्या परीक्षेकरिता बसावयाचे आहे, सोमवारपासून परीक्षा आहे. रोल नंबर माहीत नाही, परीक्षेचे सेंटर माहीत नाही. शहरात हॉस्टेलमध्ये जागा नाही, एक रात्र राहू द्या, लवकर सकाळी जाईन. शाळा, कॉलेज पाहीन, माझे नाव शोधेन, परीक्षा देईन.'' हे सर्व एका दमात त्यांना सांगितले. मान खाली घालून उभा राहिलो. ""आत या. सकाळी बोलू. ऑफिसमध्ये आराम करू शकता.''
पहाटे गळ्याभोवती मफलर व हातात चहा घेऊन आले. माझा दृढ निश्‍चय पाहून म्हणाले, ""इंदोर शहर मोठे आहे. शिवाय आज शनिवारी अर्धा दिवसच कामकाज चालते.'' ते वकील होते. त्यांनी माझा पहिला शब्द उज्जैन हा पकडला, म्हणाले, "पहिल्या बसने उज्जैनला जा, तेथे तपास कर.'

सामान तेथेच ठेवून मी उज्जैनला निघालो. बसमध्ये फक्त एक व्यक्ती होती. श्री. गुलगुले. त्यांना मी सर्व सांगितले. ते बांधकाम सुपरवायझर होते. त्यांच्या साह्याने सर्व शाळा बघितल्या. व्यर्थ, एक शाळा बाकी होती, पण बंद. त्या शाळेचे हेडमास्टर त्यांच्या ओळखीचे होते. घरी गेलो. श्री. गुलगुले यांनी सर्व सांगितले. पटनाईक सरांचे नाव ऐकताच पेपरांची बंडले काढून त्यातील सरांचे बंडल काढले. त्यात हेड मास्तरांना माझे नाव, क्रमांक कळले. माझा नंबर, शाळासहित लिहिलेले पत्रक शिक्‍क्‍यासहित स्टॅम्पपेपर मला दिला व परीक्षेस बसण्यास सांगितले. चार-पाच मित्रांसहित हॉटेलात जागा घेऊन इंदोरला सामान घेण्याकरिता आलो. वकीलसाहेब म्हणाले, ""असाच प्रसंग माझ्यावर तीस वर्षांपूर्वी दिल्लीला आला होता. एका सद्‌गृहस्थाने मला मदत केली होती. ते उपकार आज फेडले गेले.''

उज्जैनला आलो. सोमवारी पेपर दिला, इंग्रजीचा. ही परीक्षा उत्तीर्ण झालो. इन्टरपास. चीनबरोबरचे युद्ध संपल्यावर पुढल्या प्रशिक्षणाकरिता बंगळूरला आलो. नंतर पुन्हा एक-दोन ठिकाणी बदल्या होऊन बडोद्याला आलो. त्या वेळी एक माहिती समजली. जे इंटर पास झाले आहेत व शिक्षणात तीन वर्षांहून जास्त अंतर पडले आहे अशांना गुजरात युनिव्हर्सिटीमधून थेट बी. ए. पदवीसाठी परीक्षा देता येत असल्याचे कळले. ताबडतोब फॉर्म भरला. आधीच्या अनुभवामुळे सर्व काळजी घेतली होती. तोच 1965 चे पाकिस्तानबरोबरचे युद्ध सुरू झाले. माझी पठाणकोटला मिस्टीयर विमानावर बदली झाली. तातडीने तिकडे गेलो. त्या वातावरणातही वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करीत होतो. युद्ध संपले. परीक्षेकरिता रजा मिळाली. आता बी.ए. झाल्याचे अभिनंदन करणारे पत्र मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shrikant kulkarni write article in muktapeeth