पानगळ नव्हे, पर्णसळसळ

श्रीकांत कुलकर्णी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पानगळ दरवर्षीच यायची आयुष्यात. एकेक पान गळावया लागले, की निराशा दाटायची मनात. पण अमेरिकेत पानगळ पाहिली आणि पानगळीकडे पाहायची एक नवी सकारात्मक दिशा मिळाली.

पानगळ दरवर्षीच यायची आयुष्यात. एकेक पान गळावया लागले, की निराशा दाटायची मनात. पण अमेरिकेत पानगळ पाहिली आणि पानगळीकडे पाहायची एक नवी सकारात्मक दिशा मिळाली.

नुकताच, ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये आम्हाला वॉशिंग्टन-मेरीलॅंडला माझ्या मेव्हण्याकडे तीन आठवडे राहण्याचा योग आला. हे दिवस म्हणजे तेथे थंडी सुरू होण्याचे आणि झाडांची पाने गळून पडायचे. आपण ज्याला पानगळ म्हणतो, त्याला तेथे "फॉल सीझन' म्हणतात. या काळात अमेरिकेमध्ये "हॅलो विन' व "थॅंक्‍स गिव्हिंग्ज' असे मोठे सण असतात. त्याच दरम्यान भारतामध्ये दिवाळी- दसरा असे मोठे सण असतात. या वर्षी आमची दिवाळी मुलीकडे कॅलिफोर्नियामध्ये झाली, त्याचा आनंद चार भिंतीच्या आतच लुटला. पण दिवाळीनंतर आम्ही लॉस एंजिलकडून माझ्या मेव्हण्याकडे मेरीलॅंडला आलो, तेव्हा तेथे पानगळ होती. फॉल सीझनला झाडांची पाने पिकून गळून पडतात. त्या पूर्वी सर्वच झाडांच्या पानांचा रंग बदलतो. मुळातली हिरवी पाने लाल, गुलाबी, पिवळी, केशरी होऊन झाडावर पंधरा-वीस दिवस राहतात. मग ती हळूहळू पडतात. या दोन्ही अवस्था पाहता निसर्गामध्ये दिवाळी चालू असल्याची जाणीव झाली. कारण सर्वच झाडे रंगीबेरंगी झालेली. त्याचे नेत्रसुख कॅमेरामध्ये टिपायचे म्हटले तरी कठीण. कारण गर्द झाडी व सर्वच झाडांच्या पानांचे अनेक रंग, टिपायचे तरी कसे, केवढे? ती रंगउधळण पाहताना मन प्रसन्नही झाले व ते दृश्‍य पाहून एक नवीन विचारांची दिशा मिळाली.

आपण भारतात, म्हाताऱ्या माणसांना पिकलेले पान म्हणतो व त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहताना, त्यांची म्हातारपणातील अवस्था पाहताना मनाला वेदना होतात. माणूस काय किंवा वृक्षवेली काय, या दोघांनाही जीव असतो. जीवनातल्या तीनही अवस्था पाहताना माणसांची तिसरी अवस्था म्हणजे म्हातारपण, हे नक्कीच सुखदायी वाटत नाही. त्यातही म्हातारे माणूस नकारात्मक विचारांचे असेल तर अजूनच त्रासदायक. याच्या उलट मला या पानगळीमध्ये जे दिसले त्याने माझ्या मनाला उभारीही दिली व विचारांना दिशांही दिली.

विचारांची दिशा म्हणजे पानगळीमध्ये जशी झाडांची पाने रंगीबेरंगी होतात व सर्वांनाच नेत्रसुख देतात, ही पानगळ पाहायला जगातील व त्या देशातीलही मुद्दाम येतात. मैलो-न्‌-मैल ही रंगाची उधळण पाहून भारतातील दिवाळीमध्ये रंगीबेरंगी शोभेची दारूची जी मजा लुटतो, तशीच, तीच किंवा तसाच आनंद निसर्ग काही दिवस देतो. ती पाने जमिनीवर पडली तर अनेक रंगाच्या पानांमुळे विलोभनीय असे दृश्‍य दिसते, त्यामुळे नेत्र तर सुखावतातच, पण त्यामुळे मनही प्रफुल्लीत होते. आल्हाददायी वातावरण असते. ते दृश्‍य पाहिल्यावर मनातील सर्व मरगळ कुठच्या कुठे निघून जाते. रात्री शांतपणे विचार करू लागल्यावर असे मनात येते, की निसर्गापासून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे.

म्हातारपणी जर आपण आपल्या अनुभवांचा किंवा आपल्यापाशी आपण साठवून ठेवलेल्या संपत्तीचा वापर गरजूंना किंवा योग्य अशा सेवाभावी संस्थेला केला, तर आपण ही गरीब लोकांची दिवाळी सुखात व आनंदात घालवू शकतो. आपल्या अनुभवांची वाटप जर योग्य ठिकाणी केली तर अनेकांच्या संसारात आनंद निर्माण करू शकू.

आपल्या म्हातारपणाची गाऱ्हाणी सांगण्यापेक्षा आपण इतरांच्या व आपल्या मुलांच्या संसारात निःस्वार्थीपणे सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आपले पिकले पान इतरांनाही ऊर्जा मिळवून देऊ शकेल. अहंकार व अभिमान सोडून आपण कोणालाही मदत केली तर आपल्या या पिकल्या पानांनाही जरूर किंमत असेल. या फॉल सीझनमध्ये मी जे दृश्‍य पाहून भारावून गेलो, त्याच दृश्‍याने मला एक नवीन दिशा दिली. मी हीच दिशा व विचार घेऊन भारतात परतलो. रंगीबेरंगी पानगळ छायाचित्रांमध्ये पाहून मला एका विचारांने ती खिळवून राहिली. खरोखरच अवधूतांना चोवीस गुरू निसर्गातून मिळाले होते. निसर्गाकडे अभ्यासू वृत्तीने पाहिले, की मिळणारे ज्ञान व विज्ञान पाहून मनातील सगळी अनुत्साह निघून जाईल. तसेच आपले वय विसरून आपण समाजासाठी काय देऊ शकतो, याच सकारात्मक विचाराने एक नवचैतन्य निर्माण झाल्यासारखे वाटते.

मी घेतलेला अनुभव खूप जणांनीही घेतला असेल, पण मला या अनुभवाने एक नवीन दिशा दिली, म्हणून सर्वांमध्ये तो वाटावासा वाटला. खरेच ही पानगळ ही ईश्‍वराची एक लीला आहे. नवी पालवी अवतरण्याला जागा देण्यासाठी ही पानगळ असते. सारी सृष्टी अंगावरची कात उतरवून ठेवते, असे म्हणावे वाटते. ही पानगळ नव्हे, तर नवीन येणाऱ्या पल्लवांची ही पर्णसळसळ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shrikant kulkarni write article in muktapeeth