सीमेवरचा मसी

श्रीकांत लेणे
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

देशासाठी मरणाऱ्या प्रत्येकाची इतिहासात नोंद होत नाही. आपण मोहऱ्यांची नावे लक्षात ठेवतो. खुर्दा किती गमावला, तो केवळ संख्येत मोजतो. तीही माणसेच असतात; पण त्याची इतिहास दखल घेत नाही की आपणही त्याची नोंद करीत नाही.

देशासाठी मरणाऱ्या प्रत्येकाची इतिहासात नोंद होत नाही. आपण मोहऱ्यांची नावे लक्षात ठेवतो. खुर्दा किती गमावला, तो केवळ संख्येत मोजतो. तीही माणसेच असतात; पण त्याची इतिहास दखल घेत नाही की आपणही त्याची नोंद करीत नाही.

जो लष्करात दाखल होतो, तो मृत्यूला भीत नाही. किंबहुना देशासाठी मरण पत्करायच्या तयारीनेच तो सैन्यात आलेला असतो; पण देशासाठी मरणाऱ्या प्रत्येकाची इतिहासात नोंद होत नाही. कुरूक्षेत्रावर धर्मयुद्ध झाले. त्यात काही अक्षौहिणी सैनिक लढताना मृत्यू पावले. 24 हजार 165 सैनिक कायमचे हरवले. हे सारे कोण होते? आपल्याला युद्धात मरण पावलेल्या महारथींची नावे माहीत आहेत; पण इतरही देशासाठीच मेलेले होते; पण इतिहास त्यांची नोंद ठेवत नाही. पानिपतच्या युद्धात पहिल्याच दिवशी दीड लाख सैनिक मारले गेले; पण विश्‍वासराव पेशवा, सदाशिवरावभाऊ, दत्ताजी शिंदे अशा मोजक्‍या वीरांची नावे वगळता आपल्याला इतर सारे अज्ञात राहिले आहेत. हे असेच असते. आपण मोहऱ्यांची नावे लक्षात ठेवतो, खुर्दा किती गमावला, तो केवळ संख्येत मोजतो. तीही माणसेच असतात; पण त्याची इतिहास दखल घेत नाही की आपणही त्याची नोंद करीत नाही. मसी हा आमचा मित्र असाच एक इतिहासाच्या पानात स्थान नसलेला, पण देशासाठी कुटुंबासह मरण पावलेला.

डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर. पंजाबमधील पठाणकोटच्या विमानतळावर भयानक थंडीचा दिवस. मी वायुयोद्धा. भारतीय हवाई दलाच्या अठराव्या विंगमधला. उड्डाण करून विमाने आली की त्यांची देखभाल करून ती पुन्हा उड्डाणासाठी सज्ज ठेवण्याची जबाबदारी होती. दुपारचे चार वाजलेले. थंडी वाढली होती. पाकिस्तान फक्त पंधरा किलोमीटरवर. युद्धाची शक्‍यता वाढलेली होती. त्यामुळे स्वयंपाकी, धोबी आदी कामासाठी दोन महिन्यांचे लष्करी प्रशिक्षण देऊन तळावर नेमले होते. अर्थात त्यांना पडेल ते काम करावे लागत होते. आमच्या सेक्‍शनमध्ये मसी नावाचा एन.सी. म्हणजेच नॉन्कॉम्बन्टट आला होता. सदा हसतमुख, उंची सहा फूट, पहाडी, लालबुंद चेहरा. हिमाचल प्रदेशातील एका खेडेगावातला. पाच मुलांचा बाप. बिडी कायमची तोंडात. पठाणकोटमध्ये राहणारा. एका झोपडीत. त्याची नोकरी मात्र पक्की होती. ""तुझे नाव मसी कसे काय?''
""मी मुसलमान. हिमाचल प्रदेशातल्या डलहौशी जवळच्या खेड्यातला.''

आम्ही सारेच वायुयोद्धे त्याला रागवायचो. ""बिडी पीना छोड दो.'' पण आमच्या रागवण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. आकाशात फटाकड्यासारखे काहीतरी उडत होते. सर्व परिसरात धूर दिसू लागला. नुकतीच दिवाळी होऊन गेली होती; पण ते दिवाळीचे फटाकडे नव्हते. पाकिस्तानची सेबरजेट विमाने आमच्या डोक्‍यावर घिरट्या घालू लागली होती. आकाशात पठाणकोट परिसरात त्यांनी बम्बार्डिंग सुरू केले होते. युद्धाला तोंड फुटले होते. पाकिस्तानच्या विमानांची रडारला चाहूल लागताच त्यांचा इरादा ओळखून इशाऱ्याचा भोंगा वाजू लागला होता. जे घरी निघाले होते, ते परत तळाकडे वळले. जे घरी होते, ते धावत तळाकडे निघाले. आम्ही सर्व विमान तंत्रज्ञ कम एअरमेन कामावर ताबडतोब हजर झालो होतो.
मसीला ऑर्डर मिळाली होती. मेसमधून जेवण आणण्याची. एअरमेन चोवीस तास काम करत होते. विमाने सरहद्दीवरून येत होती. वैमानिक त्यांचे कर्तव्य चोख बजावत होते. पहिल्या फटक्‍यातच शत्रूच्या हवाई दलाचे कंबरडे मोडण्यात आपल्या हवाई दलाला यश मिळाले होते. तरीही सारे सावध होते. सतत सज्ज होते. रात्री अपरात्री मसी आमच्या सेवेस हजर असायचा. सैन्य पोटावर चालते, म्हणतात. आम्ही मेसमध्ये पोचल्यानंतर मसी मोठ्याने ओरडायचा, "आओ मेरे शेर. गरमागरम रोटी खाओ.'' पाकिस्तानचे बॉंब जवळपास पडत होते. जिवाची पर्वा करण्यास कोणालाही वेळ नव्हता. आम्ही सारेच भारावून गेलो होतो. मरण आले तर ते वीरमरणच ठरणार ना! पाकिस्तानला योग्य धडा मिळाला. युद्ध संपत आले होते. एक-दोन दिवसांत युद्ध संपुष्टात येईल, असे वाटत होते आणि तो दिवस उजाडला. पाच डिसेंबर. मसी गेले पंधरा दिवस झोपलाच नव्हता. म्हणून त्याला सुटी देण्यात आली होती. तो संध्याकाळी घरी गेला. सकाळी येईल असे वाटले होते आणि ती भयानक बातमी आली. रात्री पाकिस्तानच्या विमानाने अचूक बॉंब टाकला होता एका वस्तीवर. त्यात मसी आणि त्याचे पाच छोकरे होते. जळून खाक झालेले. आम्ही सर्व वायुयोद्धे विमनस्क झालेलो होतो.

आपण युद्ध जिंकले. सिमला करार झाला; पण मसी व त्याचे कुटुंब काळाबरोबर संपले होते. सीमेवर केवळ सैनिकच लढतात असे नाही, तर सैनिकांच्या आसपासचेही कितीतरी जण लढत असतात. मसीसारखे. मोहरे गेले की त्यांची नावे झळकतात. ते योग्यच आहे; पण मसीसारखे कितीतरी चिल्लरमध्ये जमा होणारे असतात, त्यांची नोंद इतिहासात कोण ठेवणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shrikant lene's muktapeeth article