दुनिया रिक्षावाल्यांची!

श्रीरंग गोखले
सोमवार, 21 मे 2018

रिक्षावाल्यांकडून अडवणूक झाल्याच्या तक्रारी अनेकदा ऐकतो; पण चांगले रिक्षावालेही खूप भेटतात. आपल्याकडेही संवाद साधण्याची कला हवी, मग त्यांची ही दुनियाही समोर येते.

रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याशी गप्पा मारायची मला खोड आहे. नवसह्याद्रीच्या स्टॅंडवरचे रिक्षावाले कांतिलाल, राजू, माने, बांदल, वाघमारे माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. गप्पांतून रिक्षावाल्यांचे आयुष्य किती अवघड आहे, हे मला उमजते आणि मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू उलगडतात. 

असेच एका रिक्षावाल्याशी बोलताना त्यांनी दोन्ही मुली शिकून उत्तम नोकरी करत आहेत हे अभिमानाने सांगितले. एका मुलीने इंटेरियरची पदविका घेतली व आर्किटेक्‍टकडे नोकरीला आहे. त्याने मला विनंती केली, की मुलीचे ऑफिस इथेच आहे. तुम्ही जाऊन जरा तिचे काम पाहून या. ‘तुमच्यासारख्या’ लोकांनी बोललेले तिला आवडेल. मी जाऊन आलो. एका छोट्याशा कृतीने दोघांनाही किती बरे वाटले! मधुकर रिक्षावाल्याचा अनुभव तर आगळाच. आंत्रप्रेन्युअर क्‍लबच्या बैठकीसाठी मी त्यांच्या रिक्षात होतो. वाटेत गप्पा झाल्या. ज्ञानेश्‍वर-तुकारामांची वचने उद्धृत करून ते मला काहीबाही सांगत होते. नंतर ‘ट्रॅफिक जॅम’ झाला. त्या वेळात मी त्यांना त्यांचा जीवनप्रवास विचारला. लांबच्या गावातून पुण्यात, अपयश, परत गाव, परत पुणे, शिक्षण, मग शिंपीकामाचे शिक्षण, त्यातून रिक्षा. आता या भागात त्यांचे तीन मजली घर आहे. दोन रिक्षा आहेत. आध्यात्मिक वाचन ही त्यांची शक्ती असावी. परत येताना रिक्षा मिळेल का, काय अशा चर्चेतून त्यांनी ‘मी कुठे चाललो आहे’ वगैरे विचारले व तास-दीड तास थांबण्याची तयारी दाखविली. त्या दिवशीच्या बैठकीमध्ये माझ्यासह इतर पाच उद्योजक त्यांचा उद्योगप्रवास उलगडणार होते. शेवटी माझ्या भाषणात मी एक-दोन वाक्‍ये आजच्या रिक्षावाल्यांवर बोललो, तर सर्वांनी आग्रह केला की बोलवा त्यांना. मी मधुकरना पाच मिनिटे बोलण्यास सांगितले. आमच्या पाच उद्योजकांत या सहाव्या आगंतुक, पण सच्चा उद्योजकाची भर पडली! अर्थात, ही सलगी काही वेळा अंगाशीही यायची. एकदा सकाळी ऑफिसला मला नेणारा रिक्षावाला दर पाच मिनिटांनी डोके बाजूला घेऊन पिचकारी मारत होता. मला नुसते पेटीत पत्र टाकून परत यायचे होते; रिक्षावाल्याला दारात रिक्षा घ्यायला सांगितले. तो म्हणाला, ‘‘आपण लगेत परत जाणार आहात का?’’ मी ‘हो’ म्हणालो, जरा आगाऊपणाने, जोरात म्हणालो, ‘‘पण तुमच्या रिक्षाने नाही, दुसरी करीन. गुटखा खाऊन काय पचापच थुंकत होता! तुम्हाला काही... वगैरे.’’ पैसे काढेपर्यंत धाकधुकीतच उतरलो. चांगला धट्टाकट्टा रिक्षावाला एकदम वाकून पायाला हात लावू लागला, ‘‘साहेब स्पष्टपणे छान सुनावले मला. आजपासून गुटखा बंद!’’ माझ्या मते रिक्षावाल्याचे आयुष्य खडतरच आहे. हे तीन चाकी वाहन तसे ‘अनस्टेबल’ असूनही सध्याच्या बेशिस्त वाहतुकीतही रिक्षांच्या अपघाताचे प्रमाण कमी आहे. जवळच्या ठिकाणी न येणारे आणि संध्याकाळी घरी जायला बघणारे रिक्षावाले मलाही खूप भेटलेत. स्टॅंडवर गप्पात रंगून गेल्यावर सवारी आली म्हणून नाखूष होणारे किंवा खूप वेळ स्टॅंडवर थांबलोय म्हणून कुरकुरणारे मला नेहमी कोड्यात टाकतात. डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांची ‘रिक्षावाला’ ही एकांकिका बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकली होती, त्यांच्याच तोंडून. दोन प्रवृत्तींवरची ती एकांकिका होती. मध्यमवर्गीय माणूस कसा दहशतीत राहतो, याचे प्रत्यंतर देण्यासाठी त्यांनी रिक्षावाल्याचे प्रतीक उत्तम वापरले होते. तसे अनुभव येतच नाहीत, असे नाही. पण मला तरी बहुतेकवेळा ‘कोपऱ्यावरी वाट बघतोय रिक्षावाला’ असाच अनुभव येतो. रिक्षावाल्यांकडून अनेक वाईट अनुभव येत असतीलही, पण अनेक चांगले रिक्षावालेही भेटतात. फक्त त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्याच्यातील माणसाला प्रतिष्ठा दिली की तो मनापासून बोलायला लागतो. आपले कुणीतरी ऐकते आहे एवढेही त्याच्यासाठी आनंद देणारे असते. काही वेळा देवच चांगला रिक्षावाला गाठून देतो. कालच महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून सेनापती बापट रस्त्यावर एका अनोळखी पत्त्यावर जायचे होते. उशीर झाला होता. परत व्हाया घर, थांबणे, सामान असेही होते. आता हा रिक्षावाला भलताच चिडचिडेपणाने वागेल असे वाटत होते, पण घडले वेगळेच. कुसाळकर नावाचा रिक्षावाला मिळाला. प्रसिद्ध सामाजिक पुढारी कुसाळकरांचा पणतू. त्याने निगुतीने ठिकाणी पोचविलेच; पण उतरताना ‘परत जायची रिक्षा मिळाली नाही तर मला फोन करा, मी इथेच राहतो’ असे सांगितले! हॉस्पिटलमधले मदतनीस जसे मामा-मावशी असतात, तर रिक्षावालेही ‘काका़़’ असतात हे आपण विसरतो! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shrirang gokhale article mukatpeeth