संयम, चिकाटी आणि सायास

संयम, चिकाटी आणि सायास

"श्रद्धा और सबुरी' असा साईबाबांनी मंत्र दिला आहे. ही सबुरी आयुष्यात खूप उपयोगी पडते, अशी श्रद्धा ठेवायला हरकत नाही. प्रगती साधायची असेल तर प्रयत्नवादी चिकाटी हवी.

प्रगतीसाठी कोणते गुण आवश्‍यक आहेत, याची यादी केली जाते, तेव्हा "चिकाटी' या गुणाला एवढे प्राधान्य मिळत नाही असे वाटते. तशी घरकामाची सवय आहे; पण परवा कोथिंबिरीची मोठी गड्डी निवडायचे काम घेतले, तेव्हा इतका वेळ लागला, संपता संपेना. शेवटी निवड झाली असे मानून सर्व गळाठा दिला फेकून. निवड-टिपण, स्वयंपाक या सर्वांची बायकांकडे करायची जी चिकाटी असते, त्याचे मला नेहमीच अप्रूप वाटते, तितकेच या चिकाटीला गृहित धरतो याचे.

काही वर्षांपूर्वीचा सोशिकपणाचा एक वेगळा अनुभव आठवला. आईला हॉस्पिटलमध्ये सलाइन लावले होते. तिला अशा उपचारांची सवय नव्हती व हात हलल्याने ते बाहेर गेले होते. रात्रीची वेळ. नर्सने सांगितले, तुम्ही त्यांचा हात धरून बसा. सुमारे दोन तास ती बाटली संपायला लागले. थेंब थेंब मोजत धीर धरायचा वेगळा अनुभव आला. मी कंपनीत नवीन इंजिनिअर्सच्या मुलाखती घेत असे. त्यांचे ज्ञान व कष्टाची तयारी तपासायचीच; पण एखाद्यात चिकाटी किती असेल, ते मला पाहायचे असे. थोड्या वेळात हे सर्व जोखणे अवघड असे; पण चिकाटी ओळखायची एक युक्ती ठरविली होती. रूममध्ये आत आल्यावर आठ बटणांचे एक पॅनेल होते. मुलगा प्रथम दारात उभा राहायचा व आत अंधार वगैरे पाहून बावचळायचा. त्याला आश्‍वस्त करून आम्ही सांगायचो की, त्या पॅनेलमधल्या एका बटनाने दिवा लागतो, तो लाव व बस. पहिले बटण दाबल्यावर मुलगा गोंधळून नुसता उभा राही. एखादा दुसरा मुलगा दुसरे- तिसरे बटण दाबे व आमच्याकडे पाहात असे. अगदी एखादा मुलगा सर्व बटणे दाबे. खरे म्हणजे कुठल्याच बटणाने दिवा लागत नसे. त्याचे स्विच आमच्याकडे टेबलाजवळ असे व योग्य वेळी ते आम्ही दाबत असू. यातून उमेदवाराच्या चिकाटीची व जिद्दीची थोड्या वेळात परीक्षा होत असे.

मला भावणारी चिकाटी ही साध्याकडे नेणारी, प्रयत्नवादी आहे. अल्पसंतुष्टांचा चिवटपणा नव्हे. तसे धीर धरणे, दम धरणे, संयम या चिकाटीच्याच छटा आहेत. सर्व काही "फास्ट' हवे असलेल्या नव्या जमान्यात या पायऱ्या सुटत चालल्या आहे. सणासुदीच्या स्वयंपाकाचा घरात घमघमाट सुटला तरी नैवेद्य व "वदनी कवळ' लहानपणी नको वाटे; पण तो संयमाचाच एक पाठ होता.

बांबूचे रोप लावले व त्याचवेळी गवताचे बी टाकले, तर गवत केव्हाच उगवून येते. दोन तीन महिन्यांत वाढून वाऱ्याबरोबर झोके घेते. त्या वेळी बांबूचा कोंब तिथेच असतो. वर्षानंतर बांबू वाढू लागतो, तोपर्यंत गवताचा भर संपून ते वाळून सपाट होते. पुढे देखणा बांबू उपयोगीही पडतो. त्याची मुळे खोल रुजविण्याची चिकाटी दाखवतात, वेळ घेतात; पण यशस्वी होतात. गवत आपण विसरूनही जातो.

प्रयत्नवादी चिकाटी म्हणूनच मला मोठा गुण वाटतो. शाळेत असताना नाना आगाशे सर आम्हाला एक गोष्ट सांगायचे. गावाकडच्या जत्रेत एक पाटील पहिलवानांना आव्हान देतो की, कोणी बैलाला उचलून दाखवेल का? कोणी नाही उचलू शकत. एक साधासा मुलगा पुढे येऊन म्हणतो, मी उचलीन; पण दोन वर्षांनी. सर्व लोक त्याला हसतात. दोन वर्षांनी जत्रेत पाटलांना आठवण होते व सर्वांना बक्षिसाचे आमिष दाखवतात; पण कोणी नाही उचलू शकत. शेवटी तो मुलगा पुढे येतो व बैलाला उचलतो. चकित झालेले पाटील त्याला विचारतात, तू हे कसे केलेस? तो सांगतो, ""त्या दिवसापासून मी रोज घरचे वासरू उचलायचा सराव केला. दोन वर्षांत वासराचा बैल झाला व सरावाने मला जमले. ध्येय मोठे व अशक्‍यप्राय वाटले तरी छोट्या पायऱ्या व चिकाटी कामी येतेच.

धीर, सबुरी, सोशिकपणा, संयम याबरोबरच जिद्द आणि निर्धार हवाच. खाली पडला म्हणून तुम्ही पराभूत होत नसता; तर पुन्हा उठून उभे राहत नाही म्हणून पराभूत होता. आपल्या भाषेलाही चिकाटीचे कौतुक आहे. म्हणूनच खारीचा वाटा, भगीरथ प्रयत्न, धीरापोटी फळे गोमटी, टिटवी आणि समुद्र अशा म्हणी, गोष्टी रूढ झाल्या; पण सर्वात उत्तम तुकोबांच्या ओळी, "असाध्य ते साध्य करिता सायास...' यातल्या "सायास' शब्दात प्रयत्न आणि चिकाटी दोन्ही आले.

कोथिंबिरीच्या गड्डीपासून सुरू झालेला विचारप्रवाह शेवटी इथे थांबला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com