जो आवडे देवाला

स्मिता अनिल भालेराव
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

ती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल.

ती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल.

माझी मुलगी अंजली घरात सगळ्यांची अत्यंत लाडकी होती. ती सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागे. तिची तिच्या आजीशी फारच गट्टी होती. तिला रांगोळी काढायची, वाचनाची फार आवड होती. तिला लोकांनी आपल्याकडे यावे आणि आपण त्यांचे आदरातिथ्य करावे याची भारी हौस! मनाने अत्यंत हळवी. एकदा शाळेत साधारण तिसरी-चौथीत असावी. स्नेहसंमेलनाच्या नाचात घेतले होते. परंतु पाय दुखायला लागल्यामुळे नाव कमी करावे लागले. तिच्या मैत्रिणीला ड्रेसचे पैसे भरता येत नव्हते, त्यामुळे नाचात जाता येत नव्हते. तर माझ्या मुलीने स्वतःचे भरलेले पैसे तिच्या ड्रेससाठी वापरण्यास सांगितले, तेही आमची परवानगी घेऊन.

पदवीनंतर तिला नोकरी लागली. तिचा विवाह झाला. त्या दोघांनी शून्यातून संसार थाटला. स्वतःचे घर घेतले. सगळे सुरळीत चालू झाले. परमेश्‍वराने तिच्या पदरात मातृत्वाचे दान टाकले. तिला मुलगी झाली. आम्ही सगळे आनंदात होतो. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. थोड्याच दिवसात तिचा उजवा हात दुखू लागला. तो हलवता येईनासा झाला. मग सगळ्या चाचण्या झाल्या. हाडातील कर्करोगाचे निदान झाले. औषधे आणि आयुर्वेदिक मसाजने बरे वाटू लागले. तिला आता बाळाशी खेळता येऊ लागले. त्यामुळे ती खूश होती. ती कामावरही जाऊ लागली, पण साधारण वर्षानंतर तिला परत त्रास सुरू झाला. प्रचंड खोकला येऊ लागला. मग परत सगळ्या चाचण्या झाल्या आणि निष्कर्ष निघाला "ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे एकाच वेळी दोन प्रकारचा कर्करोग. आमचे तर धाबेच दणाणले. पण हात-पाय गाळून चालणार नव्हते. शस्त्रक्रिया झाली. इतरही उपचार झाले. या सगळ्या उपचारांनी तिला खूप अशक्तपणा आला, पण औषधे चालूच होती. हळूहळू तब्बेत सुधारू लागली. ती कामावर रुजू झाली. दरम्यान, मुलगी आता थोडी मोठी झाली होती. ती चालायला लागली. थोडी-थोडी बोलायला लागली. तिच्या खेळाने, बोबड्या बोलाने तिची आई सुखावली. परंतु तिच्या नशिबात जास्त दिवस हे सुख नव्हते.

काही महिन्यानंतर परत त्रास होऊ लागला. परत प्रचंड खोकला येऊ लागला. दम लागायला लागला. परत दवाखान्याच्या वाऱ्या. या वेळी कॅन्सरने उग्र रूप धारण केले होते. परत सगळे उपचार सुरू झाले. सगळे उपचार होऊनसुद्धा बरे होण्याचे लक्षण दिसेना. कॅन्सर परत उलटला होता. त्यामुळे खूपच त्रास होत होता. अशक्तपणा खूप आला होता. पाठ प्रचंड दुखायची. आता कॅन्सरने यकृतात प्रवेश केला. तिला आता वरचेवर रक्त आणि प्लेटलेट द्याव्या लागत होत्या. पण गुण येत नव्हता. दमही खूप लागायचा. औषधांचा मारा चालूच होता. पण त्याचाही उपयोग होत नव्हता. खूप त्रास व्हायला लागला म्हणून रुग्णालयात दाखल केले. "आयसीयू'मध्ये ठेवले. दम लागतच होता. उपचार चालू होते. पण तब्बेत उपचाराला साथ देत नव्हती आणि अखेर काळाने तिच्यावर झडप घातली. तिचे लेकरू मातृसुखाला पोरके झाले.

एवढे सगळे उपचार आणि ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घेताना तिने कधीही कूरकूर, चिडचिड केली नाही. सगळे उपचार धीराने सोसले. कॅन्सरसारख्या रोगाला खचून न जाता धीराने सामोरी गेली. आपण यातून बरे होणार असा विश्‍वास धरून चालली होती. याही परिस्थितीत आनंदाने राहत होती. ना नशिबाला दोष देत होती, ना देवावर राग काढत होती. स्वामींचे नामस्मरण करत असे. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून मुकाट्याने सगळे सहन करत असे. तिने हे कसे सहन केले हे तिचे तिलाच ठाऊक? साडेचार-पाच वर्षांत तीन प्रकारच्या कॅन्सरवर उपचार, शस्त्रक्रिया झाले. प्रचंड अशक्तपणा होता, परंतु तिने तिच्या बाळाकडे बघून सगळे सहन केले. बाळाशी खेळता येत नाही, त्याचे काही संगोपन करता येत नाही याचे वाईट वाटायचे. पण तरीही ती आनंदात राहायची. खाण्याचे खूप पथ्य होते, पण जे समोर येईल ते आनंदाने आणि मुकाट्याने खाई. त्याबाबत कधी तक्रार नाही. ही अगदी शांत होती.
या सगळ्या प्रवासात तिच्या पतीने, भावाने खूप धावपळ केली. सारखे दवाखान्यात जाणे, रक्तासाठी, प्लेटलेटसाठी डोनर बघणे, त्यांना घेऊन दवाखान्यात जाणे सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केल्या. पण प्रयत्नांना यश नाही आले. जन्मापासून आई आजारी आणि दवाखान्यात, पण तिच्या एवढ्याशा लेकराने काहीही त्रास दिला नाही.

तिच्या स्वभावामुळे, सगळ्यांशी गोड वागण्यामुळे देवाला ती आवडली असावी. म्हणून तो तिला लवकर घेऊन गेला असावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita bhalerao write article in muktapeeth