समाजातील सर्वच घटकातून कार्यकर्ते पुढे यावेत

social worker
social worker

गेल्या ८-९ वर्षांत समाजात कळत नकळत होणाऱ्या विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या भरपूर व्यक्तींसोबत आणि सामाजिक संस्थांसोबत अगदी जवळचा संबंध आला. यातील काही व्यक्तींची किंवा संस्थांची पद्धती ही संघर्षाची तर काहींची नवनिर्माणाची. पण जवळपास प्रत्येक व्यक्तीचं आणि संस्थेचं काम हे उल्लेखनीय आणि तितकेच समाजाच्या हिताचे आहे.

याप्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीला समाजात “कार्यकर्ता” किवा “सामाजिक कार्यकर्ता” म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील काही लोक स्वतंत्र म्हणजेच कुठल्याच संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या नावाखाली काम न करण्याला पसंती देतात. तर काही लोकांना संस्थेसोबत काम करणे पटते. स्वतंत्र व्यक्तिगत काम करण्याचे तसेच संस्थेमार्फत काम करण्याचे साहजिकच काही फायदे तसेच काही तोटेसुद्धा असतात. स्वतंत्र काम करत असताना तुमचे काम जर प्रस्थापितांच्या हितसंबंधांना उघड करीत असतील किंवा प्रस्थापितांद्वारे होणाऱ्या अन्यायाला उघड करणारे असतील तर तुमचे दैनंदिन जगणे अवघड होऊ शकते.

दिवसेंदिवस ज्याप्रकारे असहिष्णुतेचे वातावरण भारतात वाढताना दिसत आहे, अशा परिस्थितीत तर याप्रकारच्या कामात स्वतःला झोकून देणे म्हणजे जिवाला धोका ओढवून घेणेच आहे. म्हणून बरेचदा संस्थेमार्फत किंवा संस्थेसोबत काम करणे हे कार्यकर्त्यांच्या पसंतीस पडते.

प्रत्येक संस्थेमध्ये काही निवडक कार्यकर्ते असतात ज्यांना स्थानिक लोकांची आणि त्यांच्या प्रश्नांची छान ओळख असते आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा दांडगा अनुभव सुद्धा असतो. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी आणि समाजसुधारकांसाठी हे कार्यकर्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. बऱ्यापैकी होणारे मूलभूत काम हे त्यांच्यामार्फतच होत असते.

उत्तम नेतृत्व क्षमता आणि लोकांना बोलकं करण्याच्या गुणांमुळे हे कार्यकर्ते बऱ्याच सफाईने काम करतात. पण इतके सगळे असूनही या कार्यकर्त्यांना समाजातील दुर्बल घटकांचे, स्थानिक गावपातळीवरील सोडले तर इतर ठिकाणी प्रतिनिधित्व करायला मिळाले अशी उदाहरणे फार क्वचितच. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये या कार्यकर्त्यांना व त्यांच्या कामाची किंवा लोकसमूहाच्या प्रश्नांची मांडणी करायला संधी मिळताना दिसत नाही.

जुन्या रूढी आणि परंपरेने ग्रासलेल्या आपल्या समाजात विविध प्रकारची वर्गवारी सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. एका विशिष्ट जातीवर्गाचा आणि श्रीमंत व अतिश्रीमंतांचा पगडा हा सर्वच क्षेत्रात अगदी ठळकपणे दिसून येतो. या पगड्यामुळे साहजिकच काही लोकसमूह हे दुर्बलच राहतात. अशा दुर्बल लोकसमूहांना आवश्यक असलेल्या विकासात्मक कामांमध्ये आपल्याला सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते काम करताना दिसतात.

उदारमतवादी विचार घेऊन सर्वांना समाजातील मुख्य धारेत आणण्याचे या सर्वांचे ध्येय असते. पण याच उदारमतवादी विचारांचा उपयोग दुर्बल घटकांमधून आणि जमीन पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून नवीन नेतृत्व तयार करण्यास होत नाही. एकीकडे आपला हा हट्ट असतो की गुणवत्तेच्या आधारे सर्वच लोकांना काम आणि व्यासपीठ निवडीचे समान स्वातंत्र्य असावे. दुसरीकडे आपल्याला प्रस्थापित असलेली मंडळीच फक्त नेतृत्व करताना दिसतात. प्रस्थापित मंडळी सोडून इतर नेतृत्व असेल तर ते वंशवादातून आणि जातिवादातूनच का असते ? प्रस्थापितांना सोडून इतर कोणत्याच व्यक्तीमध्ये नेतृत्व क्षमता किंवा गुणवत्ता नाही, ही तर अशक्यप्राय बाब आहे. तरी मग इतर लोकांना प्रतिनिधित्व करायला का मिळत नाही ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.

एखाद्या चळवळीमध्ये किंवा संस्थेमध्ये असे क्वचितच घडले असेल जिथे दुर्बल समाजातील नेतृत्व हे प्रस्थापित नेतृत्वाच्या तोडीचे आणि समांतर निर्माण झाले. लोकांना स्वतःचे प्रश्न स्वतः मांडता येतील याप्रकारचे ज्ञान आणि कौशल्य त्यांना देता येईल काय ? किती दिवस आपण स्वतःला दुर्बल घटकांचे कैवारी म्हणून मिरवून घेऊ ? ज्या जटिल आणि अमानवी वर्गवारीच्या व्यवस्थेला झुगारून आपण समाजात समता आणायचा प्रयत्न करतो, त्याचेच आपण गुलाम आहोत का ? व त्याचे अनुकरण आपल्यामार्फत होत आहे यापासून अनभिज्ञ आहोत काय ? का बहुसंख्य समाजसुधारक आणि सामाजिक संस्थांचे प्रमुख हे एका विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक वर्गातील असतात? कुठल्याच चळवळीमध्ये दुर्बल घटकामधून समांतर नेतृत्व का निर्माण होत नाही ? एका क्षेत्रातील वर्गवारी संपवायच्या नादात आपण दुसऱ्या क्षेत्रात जुनीच जातीव्यवस्था आणि अर्थव्यस्थेला चिकटून असलेली वर्गवारी ही नवीन बाटलीत टाकून पुन्हा तिची मुळं तर मजबूत करत नाही आहोत हे तपासण्याची आज गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com