काही सकारात्मक, थोडे नकारात्मक, दोन्हींचा विचार महत्त्वाचा

positivity.
positivity.

आपण सतत-सतत गोड पदार्थ खात असलो की, लवकरच आपल्याला गोड पदार्थांचा वीट येतो आणि ते अगदी साहजिक आहे. मग यावर उपाय काय, तर आपण झणझणीत तिखट खातो आणि चव बदलण्याचा प्रयत्न करतो. हीच परिस्थिती सध्या आपल्या समाजाची झाली आहे. समाजातील बहुसंख्य लोकांना गोड-गोड बोलण्याचा पुळका आलेला आहे. म्हणजे काय, तर समाजातील आणि अवतीभवती होणाऱ्या फक्त सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष द्यायचं किंवा दखल घ्यायची आणि बाकी गोष्टी जणू अस्तित्वातच नाही आहे, हे धरून चालायचं. या लेखमालेच्या सुरुवातीला समाजातील वर्गवारीवर प्रकाशझोत टाकण्याची गरज नमूद केल्याप्रमाणे असं हे सकारात्मक-सकारात्मक किती दिवस चालेल आणि अशा प्रवृत्तीमुळे समाजाचे किंवा आपले वैयक्तिक किती भले होईल? किंवा फक्त सकारात्मक बाबींकडेच लक्ष दिल्या गेलं, तर नकारात्मक बाबींमध्ये अडकलेले लोकं आणि त्यांच्या प्रश्नांच काय होईल?

उदाहरणार्थ मला अभ्यासक्रमात भूगोल, गणित, विज्ञान आणि इतिहास हे चार विषय आहेत. या चार दिलेल्या विषयांपैकी भूगोल, इतिहास आणि विज्ञान या तीन विषयांत मला नेहमी छान गुण पडतात म्हणजेच ही झाली सकारात्मक बाजू. गणितात मात्र छान गुण मिळत नाही, ही झाली नकारात्मक बाजू. गणितात छान गुण मिळवायचे असतील, तर सगळ्यांत आधी मी गणित या विषयात थोडा कमकुवत आहे हे मला मान्य करावं लागेल. त्यानंतर विशेष लक्ष देऊन आणि अतिरिक्त अभ्यास करून गणित या विषयात नेमकी कमकुवत असलेली बाजू कोणती, हे समजून तिला भक्कम करावी लागेल आणि त्यानंतरच मला गणित या विषयात छान गुण मिळणे सुरू होईल. मी फक्त सकारात्मक बाबींकडे म्हणजे भूगोल, इतिहास आणि विज्ञान याकडेच लक्ष दिलं आणि बाकी बाबींकडे दुर्लक्ष केलं, तर गणित या विषयात सुधारणा कधीच होऊ शकणार नाही.

वेगवेगळ्या कामांमुळे सामाजिक क्षेत्रातील आणि विशेषत: युवावर्गातील विविध लोकांशी नेहमी चर्चा होत असते, तर सर्वांचा बऱ्यापैकी सूर असाच असतो की, आपण फक्त सकारात्मक बाबीकडेच लक्ष द्यायला हवं आणि जे काही चुकीचं होत आहे किंवा जिथे सुधारणेची गरज आहे त्यावर फार लक्ष द्यायची गरज नाही. कारण असे केल्याने आपण उगाच नकारात्मक ऊर्जेला वाव देत असतो आणि त्यामुळे सकारात्मक बदल होत नाही. किंवा जे सकारात्मक आहे तेच अंगीकृत करायचं आणि बाकी गोष्टींबाबत बोलायचंसुद्धा नाही. मग या धर्तीवर तर ओसामा बिन लादेन आणि हिटलर यांच्या पण फक्त सकारात्मक बाबींकडेच बघायला हवं आणि त्यांच्या नकारात्मक बाबींबद्दल चर्चा पण नको व्हायला. पण, प्रश्न हा आहे की, नेहमी सकारात्मक गोष्टींचा इतका आग्रह का असावा? सहजरीत्या वस्तुस्थिती ज्याप्रकारे अस्तित्वात आहे तिला त्याचप्रमाणे स्वीकारली का जात नाही? किंवा सकारात्मक आणि नकारात्मक अशी नवीन वर्गवारी तयार करून एका विशिष्ट वर्गातील लोकांना आणि त्यांच्या प्रश्नांना का डावलले जाते?
कुठलेही रचनात्मक कार्य करायचे असल्यास त्या कामाबद्दलच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो.

दोन्ही बाजूंचा सखोल अभ्यास न करता आपण समोर जाऊ शकत नाही. आपण कुठे कमी पडतो आणि आपल्याला नेमकी कुठे सुधारणा करायची आहे, हे त्याशिवाय कळणार नाही. त्याचप्रमाणे संघर्ष (नकारात्मक) आणि निर्माण (सकारात्मक) या दोन्ही प्रक्रिया नेहमीच हातात हात मिळून सोबत जात असतात व बहुतांश वेळा संघर्ष ही प्रक्रिया निर्माण या प्रक्रियेसाठी समाजात नवीन जागा तयार करत असते. पण, हल्ली संघर्ष वगैरे सगळं गौण झालं आहे. आपण समाज आणि देश म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत किंवा काहीतरी चूक होत आहे, याचा स्वीकार करण्याची इच्छाशक्तीच आपण विसरून बसलो आहे. त्यामुळे होणाऱ्या चुकांना सुधारणे हा प्रश्नच निर्माण होत नाही. सगळ्यांना सकारात्मक नवनवीन बाबी निर्माण करण्याची ओढ लागलेली आहे त्यामुळे संघर्षातून प्राप्त होऊ शकणाऱ्या गोष्टींकडे सर्वांचे दुर्लक्ष होत जात आहे. भारत देशाला स्वातंत्र्य हे संघर्षातूनच मिळाले आहे, हे आपण इथे विसरून जाता कामा नये. संघर्ष, निदर्शनं हे आपल्याला कितीही नकारात्मक वाटत असले, तरी ते बहुतेकदा लोकांच्या हिताचेच असते.

आम्ही फक्त सकारात्मक-सकारात्मक खेळू नकारात्मक बाबींबद्दल बोलायचं नाही, लोकांकडून छान ते घ्यायचं आणि वाईट ते सोडायचं, असं बोलणं हा गोड-गोड वाटणारा पोरकटपणा आहे आणि यातून उथळ गोष्टींशिवाय काहीच साध्य होत नाही. त्यामुळे वस्तुस्थितीला असेल त्या स्वरूपात स्वीकार करून त्याबद्दल चर्चा करणे, लिहिणे आणि आवश्‍यक तो बदल घडवून आणणे हे सकारात्मक आणि नकारात्मक अशी वर्गवारी तयार करण्याऐवजी कधीही चांगलेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com