मासवडी आणि आई...

सोनल जाधव
शुक्रवार, 16 जून 2017

मुलीला मुलगी झाली तरी आईसाठी तिची मुलगी लहानच असते. आपल्या मुलीने थकू नये ही तिची काळजी असते; पण त्याचवेळी कुटुंबासाठी कष्टताना आईच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा दिसत नाही.

मुलीला मुलगी झाली तरी आईसाठी तिची मुलगी लहानच असते. आपल्या मुलीने थकू नये ही तिची काळजी असते; पण त्याचवेळी कुटुंबासाठी कष्टताना आईच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा दिसत नाही.

या आई लोकांचे एक भारी असते. जरा कष्टाच्या गोष्टी स्वयंपाकात केल्या, की त्या खूष पण होतात आणि रागवतातही. कारण आपण कितीही मोठे झालो तरी त्यांना सतत काळजीच असते आपली. आता हेच पाहा ना, परवा आईच्या हातची मासवडी खावीशी वाटली. आता मी इथे ऍमस्टरडॅमला आणि आई पुण्यात, मग कसे काय जमायचे? आईला सविस्तर रेसिपी विचारली आणि केली मासवडी. रेसिपी सांगून झाल्यावर आईचा नेहमीच डायलॉग. "कशाला अट्टहास एवढे अवघड करण्याचा. साधे करत जा आणि खात जा.' पण मासवडीची छायाचित्रे पाहिल्यावर उत्तरादाखल शाबासकी आली. पुढचा रिप्लाय मात्र तोच आला - कशाला एवढा खटाटोप?
थोडे जास्तीचे प्रयत्न आपले दिसले, की आपल्याऐवजी आईलाच त्रास होतो. तिला एकच काळजी. आपण खूप दमलो तर? तसे पाहिले तर आयुष्यभर आईने एवढे केलेले असते... पण त्याचा थकवा तिच्या चेहऱ्यावर नसतो. सहजच विचार करता करता मागच्या सगळ्या आयुष्याला मी वळून पाहिले, तर आईने एवढे केले आहे; पण त्याची ना कोणती फेसबुक पोस्ट आहे, ना इन्स्ट्राग्रामवर हॅशटॅग. अर्थात या गोष्टी तेव्हा नव्हत्या, पण तरीही कुटुंब पोटभर जेवले की तिच्या डोळ्यांत आपसूकच आनंद दिसायचा. हॅशटॅगच तो, पण आता जाणवतोय.

अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मातृत्व अशा टप्प्यांवर स्त्री असते, तेव्हा तिचे आणि आईचे नाते नेहमी वेगवेगळी कलाटणी घेत असते. या नात्यामध्ये लग्न होईपर्यंत "आईच्या हातचे खाणे' हा भाग कधी लक्षातच येत नाही. कारण आई इतक्‍या सहजरीत्या मुलांचे लाड पुरवत असते. आई कधी मुलांचे लाड करताना थकत नसते. एक गोष्ट त्यात कायम असते ती म्हणजे तिच्या प्रेमाचा ओलावा. मासवडी, पुरणपोळी, शेंगुळे, दिवाळीचा फराळ असो किंवा मांसाहारी जेवण. ती न कंटाळता कोणतेही पदार्थ अगदी सहज बनवते.

व्हाइट सॉस पास्ता, चीज गार्लिक ब्रेड, नूडल्स या पदार्थांना आता फारच ग्लॅमर आहे... पण फोडणीचा भात किंवा झटपट होणारे थालीपीठ या पदार्थांची मज्जा काही औरच. मुगाचे धिरडे, फोडणीची पोळी हे अगदी साधे पदार्थ खरेच भाव खातात. आईच्या हातचा फोडणीचा भात आजही मला पास्तापेक्षा जास्त आवडतो. कितीही कुरकुरीत डोसा करा, पण आईच्या हातचा तो गुबगुबीत उत्तपा मला आवडतो. विशेष म्हणजे आईच्या हातचे खाताना डाएट, कार्ब्स, असले शब्द माझ्या आसपासही फिरकत नाहीत. आई जे बनवते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असायचा. तुपाचा शिरा, भाताची खीर अशा गोष्टीसाठी तर भावंडांमध्ये चढाओढ असायची.
अगदी माझ्या मुलीला आई ऑम्लेट बनवून देते, तर दुसरा हट्ट लगेच माझा असतो. ""आई गं, मला पण एक कर ना. तुझ्या हातचे खाऊन खूप दिवस झाले.. '' आई विचारायची, ""नुसते मीठ आणि तेल टाकून बनवायला सांगतेस. काय वेगळे आहे, यात कोणती विशेष रेसिपी आहे माझी.'' ""तुला नाही कळणार गं आई तुझ्या हातात कोणती जादू आहे ते. किती करतेस गं आमच्यासाठी! एवढे करूनही मी हे केले आहे, ते केले आहे, असे कधी म्हणून पण दाखवले नाहीस. कसे जमते गं एवढे तुला?'' तेव्हा आई म्हणायची, ""कळेल हो तुला आई झाल्यावर...''

आई एक सांगू, आज तू आजी आहेस; पण तुझा उत्साह वाढतोच आहे. एवढी अफाट शक्ती येते कुठून तुझ्यामध्ये? स्वतःच्या मुलांचे करताना तू थकली नाहीस, नातवंडाचे करायलाही तू सदैव उत्साही असतेस. एवढे प्रेम दिलेस भरभरून तू प्रत्येकाला... त्या प्रेमामधला "तुझ्या हातचे खाणे' हा अविभाज्य घटक आहे. हे सगळे तू फार जपलेय आणि आमच्यातही रुजवलेस. या सगळ्यासाठी मी तुला कधीच "थॅंक्‍यू' म्हणाले नाही. कारण, मला अजून शिकायचेय तुझ्याकडून खूप काही.
आपली मुलगी परदेशी असली तरी घरचा मसाला, हळद, लाल तिखट आवर्जून पाठवणारी आई. एवढ्या दूर आहेस, पण तुझ्या प्रेमाची उब कायम आहे माझ्यासोबत जणू या मसाल्यांच्या स्वरूपात...

मासवडीने मला पुन्हा एकदा तू केलेल्या कष्टांची आठवणच करून दिली. तुझे कुटुंबावर असलेले प्रेम मला सारे शब्दांत मांडता येणार नाही. शब्द कमीच पडतील जणू. तसे पाहिले तर आजच्या युगात प्रत्येक गोष्ट इंटरनेटवरून शिकता येते. पण आई, माझ्यासाठी तूच माझी खऱ्या अर्थाने "गुगल' आहे जणू... कोणतीही समस्या, प्रश्न मांडा उत्तर तर मिळतेच... आमच्या भाषेत म्हणायचे तर हॅट्‌स ऑफ यू, आई, लव्ह यू ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonal jadhav wirte article in muktapeeth