आईने मायेमुळे सोडला दहशतवादी मार्ग

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

ट्‌विट
माजिद घरी पतरण्याची घटना आशादायी आहे. छळाला सामोरे न जाता तो पुन्हा सामान्य जीवन जगू शकेल, अशी आशा वाटते
उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्‍मीर

"लष्करे'ची साथ सोडून काश्‍मीरमधील फुटबॉलपटूची शरणागती

श्रीनगर: दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला माजिद अर्शिद हा आईच्या मायेमुळे पुन्हा घराकडे परतला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग येथे राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजिद हा गेल्या आठवड्यात लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तो आता शरण आल्याचे सुरक्षा दलांनी शुक्रवारी सांगितले.

दक्षिण काश्‍मीरमधील सुरक्षा छावणीत माजिद गुरुवारी रात्री (ता.16) पोचला. शस्त्र व दारूगोळ्यासह त्याने शरणागती पत्करली. त्याला आज सकाळी अज्ञात स्थळी नेण्यात आले. माजिद हा अनंतनागमधील स्थानिक संघातून फुटबॉल खेळतो. गोलरक्षक म्हणून तो ओळखला जात. जवळील मित्राचा चकमकीत मृत्यू झाल्यामुळे दुःखी झालेला माजिद "लष्करे तैयबा'त सहभागी झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचे मित्र व कुटुंबाशी सातत्याने संपर्कात होते. माजिदने घरी परतावे, यासाठी त्याच्यावर दबाब टाकण्याची विनंती पोलिसांनी त्यांना केली होती.

माजिदने दहशतवादाचा मार्ग स्वीकारल्यापासून त्याची आई आशिया खान (वय 50) सतत रडत होती. तिने खाणे-पिणेही सोडले होते. त्याने परत यावे, यासाठी ती प्रार्थना करीत होती. माजिदने शरणागती पत्करावी, असे आवाहन त्याच्या पालकांनी दूरचित्रवाहिनी व सोशल मीडियावरून केले. ""मी त्याची वाट पाहत आहे. मला तो परत यावा असे वाटत आहे. त्याला पुन्हा फुटबॉल खेळताना पाहायचे आहे,' असे म्हणताना त्याची आई रडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर माजिदने परत यावे, असे आवाहन करणारे हजारो संदेश सोशल मीडियावर फिरत होते.

वडिलांचा विश्‍वास
कुलगाममधील चकमकीत आपला मुलगा अडकल्याचे ऐकून माजिदचे वडील इर्शाद अहमद खान (वय 59) यांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. ""माजिद फक्त आपला मुलगा नाही तर चांगला मित्रही आहे. आमचे आवाहन ऐकून तो नक्की परत येईल,'' असा विश्‍वास त्यांनी काल व्यक्त केला होता. माजिदने हा मार्ग का स्वीकारला हे समजत नाही, असेही ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: srinagar news Football player surrender in Kashmir