दोन वर्षे 'शिक्षा'

सुभाष पाचारणे
बुधवार, 28 मार्च 2018

... त्या क्षणीच साहेब मला कामावरून हाकलून देऊ शकत होते. पण त्यांनी मला दोन वर्षांची शिक्षा दिली. खूप हाल झाले त्या दिवसांत. पण दोन वर्षांनी त्या शिक्षेचा अर्थ बदलला.

... त्या क्षणीच साहेब मला कामावरून हाकलून देऊ शकत होते. पण त्यांनी मला दोन वर्षांची शिक्षा दिली. खूप हाल झाले त्या दिवसांत. पण दोन वर्षांनी त्या शिक्षेचा अर्थ बदलला.

शिरवळला एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागलो. त्या वेळी आम्हाला कंपनीतून वर्षाला दोन गणवेश आणि एक "सेफ्टी शूज' मिळायचा. एकदा मला मिळालेला शूज खराब निघाला. शूजच्या पुढच्या बाजूला आतून पायाच्या सुरक्षिततेसाठी स्टीलची वाटी बसविलेली असते. त्यामुळे पायावर काही जड वस्तू पडली तरी पायाला इजा होत नाही. मला मिळालेल्या शूजची ती स्टीलची वाटी आतून शूजच्या चामड्यातून बाहेर आली होती आणि ती सारखी माझ्या पायाच्या अंगठ्याला लागायची. म्हणून मी आमच्या कार्मिक विभागातील अधिकाऱ्याकडे तो शूज बदलून मागितला. पण त्यांनी बदलून देण्यास नकार दिला. ""आपण जास्त शूज मागवत नाही. जेवढे कामगार तेवढेच शूज मागवलेले असतात. तुला आता पुढील वर्षीच दुसरा शूज मिळेल.'' मी त्यांना म्हणालो, ""अहो पण हा शूज खराब आहे. मला त्रास होतोय. त्या कंपनीकडून दुसरा बदलून घ्या.'' पण त्यांनी साफ नकार दिला. ""एक शूज आम्ही नाही परत पाठवू शकत,'' असे सांगून मला परत पाठवले. मी दोन दिवस तसेच काम केले, पण त्रास व्हायचा. बरे शूज काढूनही काम करू शकत नव्हतो. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो, विनंती केली. पण त्यांनी शूज बदलून दिला नाही. तीन-चार वेळा त्यांना विनंती केली, पण त्यांनी काही ऐकलेच नाही.

त्यांच्याकडे फेऱ्या मारून वैतागलो. शेवटी ठरवले, आता माघार घ्यायची नाही. शूज बदलून घ्यायचाच. पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि शूज बदलून देण्याची विनंती केली. त्यांनी नकार देताच मी पायातून दोन्ही शूज काढले आणि त्यांच्या टेबलावर ठेवले. म्हणालो, ""मी शूजच घालणार नाही.'' तसाच अनवाणी पायांनी माझ्या मशिनवर काम करू लागलो. काही वेळाने ते अधिकारी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ""चल, तुला साहेबांनी बोलावले आहे.'' मी त्यांच्याबरोबर निघालो.

त्या वेळी आमचे "पर्सोनेल मॅनेजर' स. मा. जगताप होते. मला त्यांच्यासमोर उभे करून अधिकारी म्हणाले, ""या माणसाने माझ्या टेबलवर शूज ठेवले. हा माणूस ग्रॅज्युएट आहे. याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.'' मी त्या वेळी एम.ए. करत होतो. साहेबांनी ते ऐकले व मला समोर खुर्चीत बसवले. विचारले, ""काय करतोस?'' एम.ए.च्या पहिल्या वर्षाला आहे म्हटल्यावर ते म्हणाले, ""मी सांगतो तसे कर..'' असे म्हणून त्यांनी कागदावर एक पत्ता लिहून दिला. पुण्यातल्या एका महाविद्यालयाचा पत्ता. म्हणाले, ""इथे जा आणि प्रवेश घे. "मॅनेजमेंट'ची पदवी घे. कंपनीसाठी उपयोगी पडेल.'' मी "हो' म्हणालो आणि बाहेर आलो. शूजची शिक्षा बाजूलाच राहिली.

त्या वेळी आम्हाला साप्ताहिक सुटी गुरुवारी असायची. शुक्रवारी कामावर गेलो, की ते मला बोलावून घ्यायचे आणि विचारायचे, ""गेला होता का काल?'' खरे म्हणजे मला आता काही करायची इच्छा नव्हती. पण तसे त्यांना सांगू शकत नव्हतो. मी काही तरी कारण सांगायचो. मग ते म्हणायचे, ""पुढच्या गुरुवारी जा. चौकशी कर. काही अडचण आली तर मला सांग.'' पण मी दरवेळी काही तरी कारण सांगत असे. शुक्रवार आला की मला "टेन्शन' यायचे. ते दर शुक्रवारी हमखास विचारायचेच. शूजचा विषय मात्र त्यांनी कधी काढला नाही. शेवटी एकदा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन आलो. चौकशी केली. प्रवेश प्रक्रिया आणि तारीख समजून घेतली. पुढे माझा तेथे प्रवेशही झाला. प्रवेश मिळाल्याचे मोठ्या अभिमानाने जगताप साहेबांना सांगितले. ते म्हणाले, ""क्‍लासला रोज जात जा. चांगला अभ्यास कर.'' तेथूनच माझे हाल चालू झाले.

कंपनीत पहिली पाळी करायची. मग दुपारी शिरवळवरून पुण्याला यायचे. संध्याकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत क्‍लास करायचे. रात्री दहाची शेवटची शिर्डी-भोर गाडी पकडायची. त्या वेळी आतासारखे रस्ते नव्हते. भोरला जायला साडेअकरा वाजायचे. कधी कधी बाराही. मग जेवण आणि झोप. पहाटे पुन्हा पाचला उठून कंपनीत कामाला जायचे. हे असे दोन वर्षे चालले होते. वेळ मिळेल तसा अभ्यास केला आणि शेवटी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.

पेढे घेऊन जगताप साहेबांकडे गेलो. त्यांनी पेढ्यांचा बॉक्‍स माझ्या हातून घेऊन टेबलवर ठेवला. मला समोर खुर्चीत बसवले आणि म्हणाले, ""तू शूज टेबलावर ठेवले होतेस, त्याच दिवशी मी तुला "सस्पेंड' करू शकलो असतो. तुला सस्पेंड करायला कुठलाही मॅनेजर चालला असता, पण तुझे भले करायला मात्र जगतापच पाहिजे होता.''

मी त्यांच्याकडे पाहातच राहिलो. शूज टेबलावर ठेवल्याची एक वेगळीच शिक्षा त्यांनी मला दिली होती. दोन वर्षे "शिक्षा'. शिक्षणाला हिंदीत शिक्षा म्हणतात हे त्या वेळी आठवले.

आज मी त्याच कंपनीत त्याच विभागात अधिकारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subhash pacharne write article in muktapeeth