मैतर जिवाचे...

सुचित्रा रमाकांत कवठेकर
मंगळवार, 18 जुलै 2017

बकुचे मित्र आले आणि बकुच्या बाबांच्या मित्रांच्याही आठवणी निघाल्या. एखादा माणूस त्याच्या मित्रांमध्ये कसा वागतो, कसा असतो यावरून त्याचे माणूसपण उमगते.

बकुचे मित्र आले आणि बकुच्या बाबांच्या मित्रांच्याही आठवणी निघाल्या. एखादा माणूस त्याच्या मित्रांमध्ये कसा वागतो, कसा असतो यावरून त्याचे माणूसपण उमगते.

आज माझ्या बकुचे मित्र घरी आले. बकु म्हणजे माझा मुलगा. "पंढरीच्या वारी'तला विठोबा. तो सात-आठ वर्षांचा होता. वाड्यामध्ये एक वासरू चुकून आले. गाय त्याला शोधून व्याकूळ झाली असेल. बकुने प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला घरी आणले. वासराला गाईची आठवण येऊ नयेइतके त्याचे लाड सुरू झाले. सगळी मुले घरून खाऊ आणून त्याला घालू लागली. फुले आणून त्याचे बारसे केले व त्याचे नाव "शांताराम' ठेवले. मी शाळेत जाताना स्वयंपाक करून जायचे. एक-दीड वाजता घरी आल्यावर आम्ही सर्व जेवायचो. त्या दिवशी जेवायला वाढायला घेतले तर डब्यात एकही पोळी नाही.

ते म्हणाले, ""अगं, बकुला बोलव.'' तो "शांताराम'च्या जवळच होता. खूप आनंदी होता. मी तेथे गेल्याबरोबर मला म्हणाला, ""अगं आई, शांतारामला खूप भूक लागली होती. मी त्याला आपल्या घरातल्या पोळ्या दिल्या. हे बघ, त्याला पाणी पण दिले. आता तो मला शेकहॅंड द्यायला लागला.'' किती निर्व्याज, निरागस. केवढे प्राण्यांवरचे प्रेम. मी यांना सांगितले, बकुने सर्व पोळ्या शांतारामला घातल्या. हे म्हणाले, ""जाऊ दे, त्याला रागाऊ नकोस. आपण पाव आणून खाऊया.'' असाच एकदा रुसून बसला होता. मला काही समजेना, काय झाले? एका कोपऱ्यात भिंतीवरून मुंग्यांची रांग चालली होती. मी तिथे औषध मारले होते, तर त्याला वाईट वाटले होते. त्याने रडतच विचारले, ""तू त्यांना का मारलं? त्या काही तुला त्रास देत होत्या का?'' एक मुंगी मारली तरी त्याला आवडायचे नाही. मी त्याची माफी मागितली. "परत असे करणार नाही' कबूल केल्यावरच बाळाचे रडणे थांबले.

आमच्या घरात फिश टॅंक होता. त्यातील माशांना वेळेवर खायला घालणे, देखभाल करणे अशा गोष्टी अर्थातच तोच करत असे. तो टॅंकजवळ गेला की माशांशी बोलायचा. तो ज्या बाजूला जाईल त्या बाजूला सर्व मासे जायचे. कितीतरी वेळ त्याचा खेळ चालायचा. पक्षी-प्राणी सर्वांवर अतिशय प्रेम. त्याचे प्राण्यांवरचे प्रेम बघूनच "पंढरीची वारी' चित्रपटात यांनी (रमाकांत कवठेकर यांनी) एक दृश्‍य टाकले होते. बकु सापाला उचलतो व तंबूच्या बाहेर सोडतो, त्या वेळी त्याच्या अंगावरून हात फिरवतो. त्याला त्या सापाची सवय व्हावी म्हणून सात-आठ दिवस त्या सापाशी खेळण्यासाठी तो गारुडी सापाला घेऊन यायचा. दृश्‍य चित्रित झाल्यानंतर आमचा विठोबा रुसला. पुरता रडून गोंधळ. का तर, "सापाला न्यायचे नाही. मला खेळायला पाहिजे,' म्हणून.
बकुचे सगळे मित्र या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमले होते.

बोलता बोलता यांचा विषय निघाला. आता बकुचे सगळे मित्र पस्तीशी-चाळीशीतील समजदार झाले आहेत. त्यांनी मला विचारले, ""बाबा कॉलेजमध्ये असताना कसे होते?'' तेव्हा एक किस्सा त्यांना सांगितला. हे ड्रॉइंग टीचर कोर्सला असताना त्यांच्या वर्गात एक अत्यंत गरीब मुलगा होता. त्याचे नाव शिवाजी. हा शिवाजी यांचा जवळचा मित्र. घासातला घास देणे ही त्यांची सर्वांत आवडती गोष्ट होती. शिवाजी खेडेगावातला असल्यामुळे पुण्यात आमच्याकडेच राहत असे. त्याचा धाकटा भाऊसुद्धा खूप हुशार होता. त्या भावाला डॉक्‍टर व्हायचे होते. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला खरा; पण राहण्याची सोय नसल्यामुळे तो महाविद्यालयासाठी येऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याचा अभ्यास बुडण्याची शक्‍यता आहे, हे जेव्हा यांना समजले, तेव्हा ते हसायला लागले. म्हणाले, ""पुण्यात कवठेकर निवास असताना तू कशाला कुठे राहयचे याची काळजी करतोस?'' मग तो नारायणदेखील आमच्याच घरी येऊन राहिला. प्रत्येक वर्षी चांगला अभ्यास करून तो डॉक्‍टर झाला.

अत्यंत दारिद्रयात वाढलेला, पुण्यात राहायचे कुठे या चिंतेत असलेला नारायण डॉक्‍टर झाल्यानंतर आमचे घर सोडताना त्या दोन्ही भावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. शिवाजीने निघताना हट्ट धरला, की यांच्या चपला पाहिजेत. तो ऐकेचना म्हणून अखेर तो वेडा हट्ट पुरवण्यासाठी यांनी त्यांच्या चपला त्याला देऊन टाकल्या.

मध्ये काही काळ गेला. एकदा अचानक शिवाजी आला व आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. घरात पाऊल टाकताच देवाची पूजा करावी तसे आमचे दुधाने पाय धुतले. आरती केली व कौतुकाने यांच्या आवडीचे जेवण केले. आता घरी निघणार तर तो म्हणाला, ""थांब, तुला एक गोष्ट दाखवायची आहे.'' तेथे त्याच्या देवघरात यांच्या चपला होत्या. ते सर्व जण रोज त्या चपलांची पूजा करत. नारायण खूप मोठा डॉक्‍टर आहे. त्याचा मोठा दवाखाना आहे; पण त्या सर्वांचे दैवत मात्र एकच आहे. असा हा माणूस, त्याच्या आठवणीसुद्धा आठवणीत ठेवण्यासारख्याच ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suchitra kawthekar write article in muktapeeth