समस्या शालेय प्रवेशाची

सुधीर शरद दाते
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून आपण मोकळे होतो. शाळांकडून लूट... शिक्षणसंस्थांकडून प्रवेशासाठी लूट... अशा आशयाच्या बातम्या वाचायला मिळतात; पण असे का? याचा कधी कोणी विचार करत असेल का ? असा प्रश्‍न मनाला पडतो.

गेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून आपण मोकळे होतो. शाळांकडून लूट... शिक्षणसंस्थांकडून प्रवेशासाठी लूट... अशा आशयाच्या बातम्या वाचायला मिळतात; पण असे का? याचा कधी कोणी विचार करत असेल का ? असा प्रश्‍न मनाला पडतो.

खरे तर आजच्या काळात मूल जन्माला आले, की पहिला विचार होतो त्याच्या शाळेच्या प्रवेशाचा. पूर्वीचे पालक शाळा निवडताना आपल्या बुद्धिमत्तेचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करायचे; पण हल्ली मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओघ वाढलेला आहे. त्यामुळे पालकही स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला उतावीळ असतात. मग त्या पालकांना स्वतःला इंग्रजी येत नसले तरी त्यांना चालते. आपल्याला इंग्रजी येत नाही, तर आपण मुलांना कसे शिकवणार? हा प्रश्‍न त्यांना बहुधा पडतच नाही. कारण आजकाल लहानपणापासूनच शाळांबरोबर क्‍लासचीही सोय झाली आहे. त्यामुळे एकदा मुलाला क्‍लासमध्ये घातले की झाले, असे या पालकांना वाटते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला तरच मुले मोठी होतात असा गैरसमज सध्या प्रचिलत आहे, असे वाटते. यातूनच मराठी माध्यमाची शाळा का इंग्रजी माध्यमाची शाळा? असा संभ्रम पालकांना पडत राहतो.

आजकाल अनुदानिक शाळांना मिळणारे अनुदानही वेळेत मिळत नाही. पुढील काळातही ते वेळेत मिळेल, अशी शाश्‍वती नाही. यामुळे शाळांचा सर्व इतर खर्च हा शैक्षणिक संस्थांना सोसावा लागतो. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी तुलना करता येथे मिळणारे वेतन हे कमी असले तर चांगला शिक्षकवर्गही शाळांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना देण्यात येणारे वेतन हेही इतर क्षेत्राएवढे नसले तरी पुरेसे असणे आवश्‍यक असते. या सर्व गोष्टींचा विचार करता, हा खर्च योग्य प्रमाणात फी आकारूननच चालवला जातो. तसेच शाळांच्या इमारतीचा देखभाल खर्च व इतर खर्चही शैक्षणिक संस्थांना करावा लागतो. पालक वर्गाने या गोष्टींचाही जरूर विचार करावा, असे वाटते.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा या विनाअनुदानित असतात. साहजिकच त्यांची फीही सर्वसामान्यांना परवडणारी नसते. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती पाहून मगच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा की नाही, हे ठरवायचे असते; पण तसे न करता बेताची परिस्थिती असतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला तर मग फी जास्त घेतात, असे ओरडून काहीही उपयोग नाही. आपली परिस्थिती जेव्हा दुचाकी वाहन घेण्याचीच असते आणि अशा परिस्थितीत आपण चारचाकी वाहन घेतले, तर मग आपण असे थोडेच म्हणतो की चारचाकी वाहन कंपन्या या आपली लूट करत आहेत? नाही, आपण असे म्हणत नाही. आपण आपल्याला मिळेल तेथून कर्ज काढून ही आपली हौस पूर्ण करतो. मग फक्त आपल्या पाल्याच्या प्रवेशाच्या वेळी पैसे द्यावे लागले, तर मग एवढा आरडाओरडा का? त्यावर तर आपल्या मुलाचे भवितव्य ठरणार असते. मग ही गोष्ट सामान्य तर नक्कीच नाही आणि आपली जर आर्थिक परिस्थिती नसेल, तर मग इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रवेशाचा हट्ट कशासाठी करायचा ?
लहान मुलांची मने ही संस्कारक्षम असतात. त्यामुळे लहान वयात केलेले संस्कार हे चटकन त्यांच्या मनावर रुजले जातात. लहान वयापासूनच आपली संस्कृती मुलांमध्ये रुजली, तर भावी काळातील यशस्वी नागरिक बनायला ही शिदोरी त्यांना पुरेशी नक्कीच आहे. तसेच मराठी माध्यमांच्या शाळांच्या माध्यमातूनच आपण आपली संस्कृती पटकन मुलांपर्यंत पोचवू शकतो, असे मला वाटते.

मूल आपला पहिला शब्द उच्चारते तो म्हणजे "आई'. म्हणजे शब्द उच्चारण्यापासून त्यांची आपल्या संस्कृतीशी ओळख सुरू होते. मराठी माध्यमाच्या शाळांमधून सण-समारंभ, जयंती, पुण्यतिथी, सांस्कृतिक समारंभ अशा विविध माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी बरोबरच लहानपणापासूनच श्‍लोक, स्तोत्रे, ओव्यांच्या माध्यमातून संस्कृत भाषेचीही मुलांना सवय होते आणि आपली सगळी संस्कृती ही मराठी आणि संस्कृत या भाषांशीच निगडित आहे. त्यामुळे मराठी शाळांमुळे आपल्या संस्कृतीची जास्त ओळख होते.

आज काल इंग्रजी येणे अत्यावश्‍यक आहे, हेही खरेच आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जायचे आहे, सैन्यात जायचे आहे, परदेशात ज्यांना आपले करिअर करायचे आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप छान आहे, अशा सर्वांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणे आवश्‍यकच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे या विद्यार्थीवर्गाला आपले उच्चशिक्षण घेताना काहीही समस्या निर्माण होत नाहीत. त्यांना संभाषण कौशल्य हे लहानपणीच प्राप्त होते; पण ज्यांना शक्‍य नाही अशा पालकवर्गाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा हट्ट करा करायचा? मराठी माध्यमाच्या शाळात प्रवेश घेणाऱ्यांना इंग्रजी येत नाही, असे पालकांना का वाटते ? याआधीच्या पिढीनेही मराठी माध्यमाच्या शाळांतच शिक्षण घेतले आहे आणि ती यशस्वीही झाली आहे. अगदी टिळक, आगरकर, सावरकर यांच्यासारखे महान नेतेही याला अपवाद नाहीत. पुढे या सर्वांनी मराठी माध्यमाचे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्याच ना! या महान लोकांचेही इंग्रजी माध्यमाच्या शाळांशिवाय काहीच अडले नाही, याचा विचार कोणीच कसे करत नाही. बरं, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकवत नाहीत का? तर तसेही नाही. उलट आजच्या काळात बालवाडीपासूनच इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. तसेच मराठी शाळांमध्येही सेमी इंग्रजीच्या वर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मुलांनाही इंग्रजी विषयाची भीती वाटेनाशी होते आणि इंग्रजीची गोडी त्यांच्यात निर्माण व्हायला निश्‍चितच मदत होते. ही मुलेही त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. तरी मराठी माध्यमाच्या शाळांत प्रवेश घ्यायची पालकांना एवढी भीती का वाटते? हेच एक न उलगडलेले कोडे आहे.

माझा मराठाचि बोलू कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके।। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या ज्ञानेश्‍वरांच्या उक्तीप्रमाणे मराठी भाषेची गोडी अवीट आहे. खरे तर आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असणे आवश्‍यक आहे आणि आपणच आपल्या मातृभाषेचा आदर करण्याची, मातृभाषेचा प्रसार करण्याचीही आवश्‍यकता आहे; पण आज काल असे कुणालाच वाटत नाही. केवळ वरवरच्या सुविधांना बळी पडून इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश वाढतात आणि मराठी शाळा मात्र ओस पडू लागल्या आहेत, असे चित्र आज तरी दिसत आहे. हे चित्र बदलण्याची आणि राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एक जबाबदार पालक आणि नागरिक म्हणून ही जबाबदारी आपलीच म्हणजेच समाजाचीच आहे. चला तर मग, ही जबाबदारी आपणच समर्थपणे पेलूया आणि आपल्या मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार व्हायला मदत करूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir date write article in muktapeeth