esakal | सहजची सुंदर! 
sakal

बोलून बातमी शोधा

sujata.jpg

लोकव्यवहाराचे शहाणपण वेगळेच असते. साधी सामान्य माणसे आयुष्याचे सार सहजच हाती सोडून जातात.  

सहजची सुंदर! 

sakal_logo
By
सुजाता आल्हाद लेले

लोकव्यवहाराचे शहाणपण वेगळेच असते. साधी सामान्य माणसे आयुष्याचे सार सहजच हाती सोडून जातात. रोज गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचते, त्यातून मला जेवढे कळते ते मी माझ्या शब्दांत, सुविचारातून लिहिते. पण लोकव्यवहाराचे शहाणपण वेगळेच असते. साधी सामान्य माणसे त्यांच्या व्यावहारिक अनुभवातून सापडलेले आयुष्याचे सार सहजच हाती सोडून जातात आणि आपल्यालाही आयुष्याचे वेगळे भान येते. आता हेच पाहा ना! आषाढी एकादशीच्या दिवशी मी काही वाचत होते. त्या वेळी आमच्याकडे काम करणारी मीना आसपासच वावरत होती. तिला बोलायला आवडते. मी वाचत बसले होते, तरी ती माझ्याशी बोलत होती. बोलण्याच्या ओघात तिने मला सहजसे, सुंदर; पण संस्मरणीय असे सांगितले. तिचे ते सांगणे म्हणजे तो त्या दिवशीचा सुविचारच होऊन गेला माझ्यासाठी. 

ती म्हणाली, "वहिनी, पंढरपूरला आषाढी एकादशीपासून ते पुढे पंधरा दिस पार गोपाळकाला होईस्तवर लई गर्दी असतीया. जो तो वारकरी ईठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेला असतो बघा, पन त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत न्हाय की त्यांच्यातच ईठ्ठल हाय. एवढी मोठी वारी अशी उगाच व्हती काय! आवं, तो पांडुरंगच परत्येकाच्यात आसतो आन तोच आणतो सर्वांना वाजत-गाजत पंढरीला. आवो, ज्या भक्ताला वारी करावीशी वाटती ना, त्यांनाच तो प्रिरना देतो, आपल्याला निस्तचं वाटतं, जावं एक बार तरी पंढरीला, पण आतून कुटं वाटतंय? त्यामुळं आपण पंढरीच्या ईठू माउलीचं दर्सन टीवीतून घेतो. पन हे दर्सन खरं नाय. चालत.. टाळ कुटत, भजन, कीर्तन करत जो वारकरी पंढरपूरला जातो... तोच खरा भक्त असतो. ज्याच्या मुखी सतत नाम आसते, तिथच भगवंत असतो. काम आणि नाम एकाच वेळी चाललं तर ईठू कुटंबी भेटतो.'' 
मी तिच्याकडे कौतुकाने बघत बसले अन्‌ तिला म्हणाले, "'मीना, किती छान, सहजसुंदर बोलून गेलीस गं! जणू विठू माउलीच तुझ्या मुखातून बोलून गेली बघ!'' खरेच, काही वेळा.. नव्हे, बऱ्याचदा हा घरकाम करणारा मावशीवर्ग आपल्याला खूप काही मोलाचे सांगून जातो. 
 

loading image