बॅंक लुटते आहे!

सुमंगला गोखले
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

एकीकडे बॅंकांना लुटून पळणाऱ्यांच्या बातम्या वाचायला मिळतात आणि दुसरीकडे बॅंका सर्वसामान्यांच्या खिशातून छोटी-मोठी लूट करीत राहतात. बॅंकांकडून ग्राहकहित कधी जपले जाईल?

एकीकडे बॅंकांना लुटून पळणाऱ्यांच्या बातम्या वाचायला मिळतात आणि दुसरीकडे बॅंका सर्वसामान्यांच्या खिशातून छोटी-मोठी लूट करीत राहतात. बॅंकांकडून ग्राहकहित कधी जपले जाईल?

राष्ट्रीयीकृत बॅंकेत कधी कोणता अनुभव येईल, हे सांगता येत नाही. एका बॅंकेत गेले. खाते नंबर सांगून चेकबुक मागितले. ""मोबाईल नंबर सांगा तुमचा.'' "मोबाईल नाहीय माझ्याकडे, लॅंडलाइन नंबर देऊ का?'' ""तुमच्याकडे मोबाईल नाही! मग तुम्हाला चेकबुक देता येणार नाही.'' ""चेकबुकसाठी मोबाईल असणे आवश्‍यक आहे का? मोबाईल नाही म्हणून चेकबुक मिळणार नाही, असा नियम आहे का?'' पलीकडून काहीच प्रतिसाद नाही. दुसऱ्या बॅंकेत गेले. चेकबुक घेतल्यावर त्याची किंमत व सेवाकर म्हणून साठ रुपये खात्यातून कापून घेतले. पुढे ते खाते मी बंद केल्यावर उरलेले चेकबुक बॅंकेने परत घेतले आणि धनादेश वापरले नाहीत म्हणून पुन्हा बारा रुपये खात्यातून कापून घेतले.

याच बॅंकेचा दुसरा किस्सा सांगते. माझ्या घराचा मिळकत कर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात मी धनादेशाने भरला. तो धनादेश महानगरपालिकेच्या खात्यात जमाही झाला आणि माझ्या खात्यात खर्चीही पडल्याची नोंद माझ्या बॅंकबुकमध्ये झाली. असे असतानाही बॅंकेने तो धनादेश परत आल्याचे दाखवून 104 रुपये माझ्या खात्यातून कापून घेतले. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर माझा परत आलेला धनादेश मी बॅंकेकडे मागितला, तर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मी शाखा व्यवस्थापकांना पासबुक दाखवल्यावर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून यांचा धनादेश वटल्यावरही तुम्ही पैसे कसे काय कापून घेतलेत, अशी विचारणा केली. त्यांना उत्तर देता येईना. कापून घेतलेले पैसे खात्यात जमा करायला शाखा व्यवस्थापकांनी सांगितल्यावर "उद्या या,' असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. "माझ्या खात्यावर रक्कम जमा झाल्याशिवाय मी येथून जाणार नाही,' असे ठामपणे सांगितल्यावर दहा मिनिटांनी मला नोंद करून मिळाली.

मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे पंधरा एच फॉर्म दोन प्रतीत, त्याला पॅन कार्डची झेरॉक्‍स जोडून बॅंकेत वेळेत दिली. माझ्याकडील प्रतीवर संबंधित फॉर्म मिळाल्याचा बॅंकेचा शिक्का घेतला होता. वेळेत फॉर्म देऊनही बॅंकेने टीडीएस कापल्याचे बॅंकबुक भरून घेतल्यावर मला समजले. "टीडीएस कसा काय कापला' याची विचारणा केल्यावर उत्तर मिळाले, "तुम्ही वेळेत फॉर्म भरला नाहीत म्हणून'. "माझ्याकडे फॉर्म भरल्याची कॉपी आहे.' "कॉपी घेऊन बॅंकेत या.' म्हणजे वयाच्या अठ्ठयाहत्तराव्या वर्षी मी केवळ ती कॉपी देण्यासाठी बॅंकेत जायचे काय? ते फॉर्म भरल्याची कॉपी मी बॅंकेला इमेलने पाठवली. बॅंकेकडून प्रतिसाद नाही. पाच-सहा वेळा फोन केल्यावर कापलेला टीडीएस परत मिळाला.

आणखी एक किस्सा सांगते. पहिले पासबुक भरल्यावर मला नवीन पासबुक भरून दिले. पण, त्यावर बारकोड चिकटवून मिळाला नाही. बारकोडशिवाय यंत्रात बॅंकबुक भरून कसे मिळणार? पण, बारकोडचे सॉफ्टवेअर हॅंग झाले होते. केव्हा दुरुस्त होणार माहीत नव्हते. काही दिवसांनी, बारकोड चिकटवून मिळतो कळल्यावर मी या बॅंकेच्या दुसऱ्या शाखेत गेले. तर, त्यादिवशी बारकोड चिकटवून देणारा कर्मचारी उपस्थित नव्हता. बॅंकबुक भरून देणारा कर्मचारीही रजेवर होता. कोणत्याही शाखेत पैसे भरण्याची सुविधा या बॅंकेत असल्याने एकाने पुण्यातीलच दुसऱ्या शाखेतील आपल्या खात्यावर साडेसातशे रुपये भरले, तर त्यातील पन्नास रुपये प्रशासकीय खर्च म्हणून कापून घेण्यात आले. त्या शाखेत जाऊन येण्यासाठी पेट्रोललाही कमी पैसे लागले असते.

परवा नेहमीप्रमाणे घरून स्लीप भरून बॅंकेत पैसे भरायला गेले. तर, आता असे खिडकीवर पैसे भरता येणार नसल्याचे सांगण्यात आले. शाखा व्यवस्थापकांना भेटल्यावर त्यांनी एक अर्ज भरायला सांगितला. आधारकार्ड, पॅनकार्ड यांची एकेक प्रत, छायाचित्र मागण्यात आले. अर्ज व वीस रुपये शुल्क दिल्यावर तुम्हाला एक कार्ड दिले जाईल, त्याआधारे तुम्ही पैसे भरायचे, असे सांगण्यात आले. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय असा बदल कसा काय केला जाऊ शकतो? मी माझे पैसे केवळ स्लीप भरून बॅंकेत का जमा करू शकत नाही? त्यासाठी अजून एक कार्ड विकत का घ्यायचे? रिझर्व बॅंकेने सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना घरपोच बॅंकिंग सेवा द्या, असा बॅंकांना आदेश दिला आहे. अशी घरपोच सेवा सोडाच, पण सेवा हवी असेल, तर घरी जाऊन कागदपत्रे आणून द्या, असे सांगितले जाते, हे कसे? अलीकडे बॅंकेत चेक एका पेटीत टाकायला सांगितले जातात. आपल्याकडे काहीच पुरावा नसतो. अशा वेळी चेक गहाळ झाल्याने आपल्यालाच भुर्दंड पडतो. मनस्तापही सहन करावा लागतो.

पटकन लक्षात येणार नाही, अशा पद्धतीनेही बॅंक सर्वसामान्यांना लुटत राहते आणि बॅंकेला लुटणारे सहज पळून जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sumangala gokhale write article in muktapeeth