फुलले मैत्रीफूल

फुलले मैत्रीफूल

आपल्यातील उणिवा स्वीकारून, समजून घेणारा मित्र प्रत्येकालाच हवा असतो. अशा परिपूर्ण मैत्रीचे गुण "स्नेहचौफुला'त पुरेपूर आहेत. मित्र म्हणून ते सदैव स्वतःला घडवीत राहिले आहेत. म्हणून ही अगाध मैत्री त्यांना लाभलीय. ही मैत्री केवळ एकत्रता नाही, तर मिलाफ आहे, हे मैत्रीचे मधुर गुंजन आहे.

सदैव मन जाणणारी, हृदयात वसणारी अन्‌ जिवाला जीव देणारी ती सच्ची मैत्री! अशी मैत्री प्रत्यक्ष घरातच अनुभवायचं भाग्य लाभलं. त्या खऱ्या मित्रांना मी "स्नेहचौफुला' म्हणते. हेमंत श्रोत्री, सुरेश शिंत्रे, शिरीष घाटपांडे आणि सुधीर मुकावार हे ते जीवलग मित्र. त्यांच्या सुंदर मैत्रीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली.

बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आजतागायतची प्रेम व विश्‍वासाच्या बळावरील "अखंड मैत्री.' कॉलेजच्या पहिल्या दिवशी अनोळखी असे चौघे जवळच्या दोन बाकांवर बसतात काय अन्‌ पुढे कायम एकत्र असतात काय! या चौघा मित्रांचे एकत्र जाणे-येणे, अभ्यास करणे, ट्रेकिंग व इतर उपक्रमांतला सहभाग सुरू झाला. कॉलेजमध्ये चौघांची मैत्री फार "फेमस' झाली. एखादे वेळी तिघेच एकत्र दिसले, की जो तो विचारी, ""आज चौथा कुठे विसरलात रे?'' एवढेच कशाला, त्यानंतरच्याही चाळीस-पंचेचाळीस वर्षांत कोणाचा मित्र भेटो, अगदी फोनवरही, तो विचारणारच, ""काय रे, तुझे कॉलेजमधले तिघे मित्र कुठे असतात?'' यावर चौघांचे एकच दणदणीत उत्तर असते, ""दर रविवारी सकाळी सात ते दहा पर्वतीवर एकत्र असतो.''

कॉलेजात असताना एकदा असा पाठ मिळाला, की व्यावहारिक जगाचे ज्ञान होण्यासाठी, आपल्या हिमतीवर उभे राहण्यासाठी सुटीमध्ये छोटे-मोठे काम करावे. घाटपांडेंच्या वडिलांनी स्वतःच्या पुस्तक-दुकानात काम करण्याची संधी मोठ्या प्रेमाने व कौतुकाने दिली. त्यांचे मार्गदर्शन पुढे आयुष्यभर मोलाचे ठरले. एन.सी.सी.मध्ये असताना नसरापूरला दहा दिवस चौघेही एकत्र होते. तेव्हा त्यांना एकमेकांचा खूप आधार वाटला. कुठल्याही कामाची भीती किंवा बाऊ वाटला नाही. कारण मित्रांचे हात व आश्‍वासक साथ सोबत होती. यातूनच त्यांच्यातील विश्‍वास अन्‌ आत्मविश्‍वासही वाढत होता.

आणि त्यांची दोस्ती घट्ट करणारा, मनाने कायमसाठी एकत्र आणणारा तो प्रसंग घडला! राजगडचे ट्रेकिंग! पहाटे साडेचारला चढायला सुरवात केलेली, अर्धा रस्ता चढून गेल्यावर श्रोत्री पाय घसरून पडले व हातातील बॅग पंचवीस-तीस फूट खोल एका झाडाला लटकली. कोणाला काही सुचेना. पण सुधीर यांनी (खरेच, धीर न सोडता) हळूहळू उतरायला सुरवात केली. ते कधी दिसायचे, तर कधी गायब व्हायचे. मध्येच काही तरी पडल्याचा आवाज झाला, तसे सगळे जाम घाबरले. देवाची प्रार्थना सुरू झाली. मग त्यांनी झाडावरून बॅग घेतल्याचे दिसले. कसेबसे ते वर चढले, पण खूप खरचटले होते त्यांना. ते सुखरूप वर आले आणि सर्वांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली! चौघांचे असे एकमेकांशी स्वभाव जुळल्याने सर्वांच्या घरी भावंडांसारखे प्रेम मिळाले; अन्‌ ते प्रेम सर्व नातेवाइकांच्या डोळ्यांत झळकताना दिसते. त्यामुळे आजपर्यंत कायमच कार्यक्रमप्रसंगी घरच्या आप्तांच्या यादीत मित्रांच्या कुटुंबीयांचा मान असतोच.

प्रसंगपरत्वे नंतर चौघा मित्रांपैकी कोणी नोकरीतील बदलीमुळे बाहेरगावी गेले तरी संपर्क सततच असे. अन्‌ पुण्यात पाऊल टाकल्यावर लगेचच या मित्र चौफुल्याची भेट नक्की ठरलेलीच! चौघांचा नेमच, की दर रविवारी सकाळी पर्वतीवर फिरायला जाणे. वर्षानुवर्षे त्यात खंड पडला नाही. नंतरच्या काळात आम्ही चार मैत्रिणीही त्यात सामील होतोच. आता सर्वांच्या साठीनंतर अधूनमधून बागांतही फिरतात. पण सर्वांचे आवडते ठिकाण "पर्वती'च! याबरोबर गाण्यांचे कार्यक्रम, नाटके, भाषणे यालाही एकत्र जाणे असतेच.

इतक्‍या वर्षांतले एकमेकांच्या सोबतीने अनुभवलेले अनेकानेक प्रसंग आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय आहेत. गेट टु गेदरचे कार्यक्रम ठरवण्यात सुनंदा मुकावारांचा पुढाकार. शिंत्र्यांच्या आंब्याच्या बागेत बच्चे कंपनीची पार्टी असली, की रंजना शिंत्र्यांच्या उत्साहाला उधाण येते. आमच्या छोट्या-मोठ्या सहली ठरवणार त्या शर्वरी घाटपांडे. कितीतरी धमाल संध्याकाळच्या खूप आनंदी आठवणी आहेत.

एक दिवस तर गंमतच झाली. मी ह्यांना अगदी जरुरीचे काम सांगितले. हे म्हणाले, ""आत्ता नाही. मग बघू.'' लगेचच माझ्या सासूबाई म्हणाल्या, ""आत्ता सुरेशचा फोन येऊ दे. अस्सा ताडकन्‌ उठेल बघ!'' त्यावर हे सुद्धा हसू लागले. खरं तर, चौघां मित्रांचे व्यवसाय वेगवेगळे. पण चौघेही स्वभावाने शांत, श्रद्धाळू, एकदम "पाक'दिल, अन्‌ स्वच्छ आरस्पानी मनाचे. मैत्रीचे जाणिक म्हणूनच "अहं'रहित. म्हणूनच हे जुळलेले रेशीमगाठी स्नेहबंध मौलिक आहेत. जीवनातल्या सुख-दुःखाच्या प्रसंगी मित्र आधारवडच असतात. आजारपण, अडचण असली की जबाबदारी घेऊन सर्व प्रकारे खंबीर आधार देणारे मित्रांचे हात "देवाचा वरदहस्त' वाटला तर नवल नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com