बोलणे : एक कला

सुरेखा पेंडसे
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

जिभेवर साखर ठेवून राहा, असं मोठी माणसं नेहमी सांगतात. तो त्यांचा व्यावहारिक अनुभव असतो. बोलण्याची कला साध्य असेल तर माणसं जोडली जातात, हे विसरून चालणार नाही.

जिभेवर साखर ठेवून राहा, असं मोठी माणसं नेहमी सांगतात. तो त्यांचा व्यावहारिक अनुभव असतो. बोलण्याची कला साध्य असेल तर माणसं जोडली जातात, हे विसरून चालणार नाही.

आपल्याला दररोज कितीतरी माणसं भेटतात. काही ओळखीची, काही अनोळखी. ओळखीची माणसं भेटल्यावर "काय कशा आहात?' असं सहज विचारलं जातं. मग, "बरं आहे. ठीक आहे, चाललंय आपलं रडतखडत,' अशी उत्तरे मिळतात. मध्यंतरी वाचनात आलं, "काय, कशा आहात?' असं विचारल्यावर "मस्त! छान!' असं उत्तर द्यावं, मनात असलं तरी किंवा नसलं तरी. त्यामुळे सकारात्मक लहरी निर्माण होतात, समोरचाही आपल्याशी उत्साहाने बोलू लागतो. समोरची व्यक्ती निराश असेल, तरी दोघांच्यामध्ये हसतखेळत संवाद सुरू होतात. मग मनात आलं, आपणही इतके दिवस "ठीक. बरं!' असंच म्हणत होतो. आता बदलायला हवं.

खरं तर प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला देवानं सुख-दुःख ही समप्रमाणात दिली आहेत. कधी कुणाच्या वाट्याला सलग सुख येतं- तर कुणाच्या वाट्याला सलग दुःख. हे दोन्ही आहे म्हणून जगण्यात गंमत, मजा आहे. पण आपण आनंदात असताना दुसऱ्यालाही आनंदाची गरज आहे, हे लक्षात ठेवून वागणं आणि बोलणं हे माणुसकीचं खरं लक्षण आहे, विशेषतः ज्येष्ठांनी हे लक्षात घ्यायला हवं. प्रत्येक ज्येष्ठाची तब्येतीची काहीतरी तक्रार असते. घरातलं वातावरण वेगळं असतं. तरीसुद्धा ""मी मस्त आहे. आता वयानुसार तब्येतीची थोडी कुरकुर चालते एवढंच.'' असं म्हणून वातावरण हलकं करता येतं.
कधी कधी वाटतं, थोडा संयम बाळगला तर किती तरी कटू शब्द बोलायचे टाळता येतात. कटू शब्द बोलण्याने समोरचा तर दुखावतोच, पण आपल्यालाही फारसा आनंद होत नाही. उलट काही वेळानं वाईटंच वाटतं. मग अशावेळी "सॉरी' म्हणून टाकावं. त्यापेक्षा मला वाटतं, बोलण्यापूर्वी एक क्षण विचार केला तर किती छान होईल.

बहुतेक वेळेला आपल्याला पक्कं माहीत असतं, की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना दुसऱ्याकडून घडते, तेव्हा ती जाणूनबुजून किंवा आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने केलेली नसते. तर नकळत घडलेली असते. तेव्हाही बोलण्यावर संयम ठेवला तर...
साधंच उदाहरण पाहा. सिग्नलला उभे असताना हिरवा सिग्नल लागला तरी पुढचा हलत नाही आणि आपण लगेच हॉर्न वाजवतो. मात्र त्याचवेळी आपल्या मागच्याने हॉर्न वाजवला की त्याच्यावर ओरडतो. "आम्हालाही जायचं आहे. इथे काही राहायला नाही आलो.' मग आपल्या पुढच्याच्या बाबतीत तुम्हाला काय अडचण आहे? गाडी बंद पडली किंवा काय हा अजिबात विचार करत नाही.

हल्ली कोणी कोणाकडे कळविल्याशिवाय जात नाही. पण एखादी आपली आवडती मालिका चालू असताना कोणी आलं, तर "यांना हीच वेळ बरी सापडली यायला,' असं म्हणून नाइलाजाने गप्पा होतात. मग अर्ध लक्ष मालिकेमध्ये व अर्ध लक्ष गप्पांमध्ये असतं. काही वेळा घरी आलेल्या पाहुण्याला बोलू न देता माणसं स्वतःच बोलून त्याला नको करतात. तर काही वेळा आलेल्या पाहुण्याशी फारसं न बोलता फक्त "हो, नाही' एवढंच बोलून गप्प बसतात, वरील सर्व प्रकारात आपण उगाच आलो की काय, असं मात्र पाहुण्याला नक्की वाटतं.

काहीही विचार न करता बोलणारी माणसं फार धोकादायक असतात. आता हेच पाहा- ही माणसं जेव्हा आजारी माणसाला भेटायला जातात त्या वेळेला "अरे बापरे! हा आजार का? सांभाळा हं. मध्यंतरी आमच्या ओळखीतला एक माणूस याच दुखण्याने गेला,' आता सांगा अशा बोलण्याने आजारी माणूस उभारी धरले की आणखी खचून जाईल?
खरंच ! कुठे, कसं बोलावं ही सुद्धा एक कला आहे. एखादीने नवीन वस्तू, गोष्ट खरेदी केली तर त्याला चांगला म्हणणं आपल्याला जमत नाही, पण काहीतरी नावं ठेवून मोकळे होतो. सर्वांच्या आवडीसारख्या नसतात, दाखवणारीच्या मनातील भावना ओळखता यायला हवी. तिच्या उत्साहावर आपण विरजण घालतो. ती गोष्ट चांगली म्हणण्यानं आपण खोट्या आहोत हे काही लगेच सिद्ध होत नसते. पण लक्षात कोण घेतं?

परवाचीच एक गोष्ट. आमच्या ग्रुपमधली एक मैत्रीण मॉरिशसला चालली होती. तिने खूप आनंदात सर्वांना सांगितले. त्यावर एकजण म्हणाली, "मॉरिशसला? मी आताच जाऊन आले. आम्हाला अगदी बोअर झालं. सर्व पैसे वाया गेला. खूप कंटाळा आला. बुकिंग करायच्या आधी मला विचारायचं तरी!' आता या बोलण्याला काय म्हणावे?
"शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा' असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो. त्याचा व्यवहारात उपयोग केला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने बोललो तर सर्वांचं जगणं आनंददायी होईल. माणसं आपल्यापासून दोन हात दूर न जाता, जवळ येतील. दोन गोड शब्द बोलून जे साध्य होतं, ते इतर कशानंही नाही, हे समजून घ्यायला हवं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surekha pendse's muktapeeth article