राजासंगे चाललो!

सुरेश नातू
बुधवार, 11 जुलै 2018

काही पावले. मोजके क्षण. पण, मी राजाबरोबर चाललो होतो.

काही पावले. मोजके क्षण. पण, मी राजाबरोबर चाललो होतो.

काही वर्षांपूर्वी मी जागतिक बॅंकेच्या कामासाठी कैरोला नाईलच्या किनाऱ्यावर एका आलिशान हॉटेलमध्ये उतरलो होतो. माझी खोली तिथे "विशेष महत्त्वाच्या' अठराव्या मजल्यावर होती. माझा तीन आठवड्यांचा मुक्काम सहा आठवड्यांपर्यंत लांबला. नुसता कंटाळा आला होता. एके दिवशी सकाळी खोलीबाहेर पडलो, तर मधल्या पॅसेजमध्ये दर पन्नास फुटांवर स्टेनगनधारी पहारेकरी बसलेला. मी दुर्लक्ष करून निघून गेलो. पण, दिवसभरात कधीही पाहावे, पहारेकरी आहेतच. न राहवून एका पहारेकऱ्याकडे चौकशी केली. त्याने संशयाने माझीच चौकशी सुरू केली. त्याचे समाधान झाले, तसे म्हणाला, ""या पॅसेजच्या शेवटच्या विशेष कक्षात स्वीडनच्या राजांचे, किंग गुस्टॉव्ह द सेकंड यांचे, वास्तव्य आहे.''

माझ्या डोळ्यासमोर आयर्विंग वॅलेसच्या "प्राईझ' कादंबरीमधील स्वीडनच्या राजघराण्याच्या वैभवाची, तिथल्या शाही मेजवान्यांच्या थाटांची, तिथल्या परंपरांची दृश्‍ये नाचायला लागली. हा राजासुद्धा तशाच थाटात, मुकुट वगैरे घातलेला असेल का? रात्री जेवायला बाहेर पडलो. लिफ्टपाशी गेलो, तर एक सुरक्षारक्षक धावत आला आणि म्हणाला, ""थांबा, थोड्या वेळाने राजेसाहेब येणार आहेत. त्यांना लिफ्टने जायचे आहे.'' मी आधीच जरा वैतागलेला होतो. मी त्याला म्हटले, ""ते अजून आलेले नाहीत ना? आणि इथे एकूण चार लिफ्ट आहेत.'' तेवढ्यात "बा आदब, बा मुलाहिजा' अशा घोषणांच्याशिवायच दस्तूरखुद राजेसाहेब आणि त्यांचे सहकारी तिथे दाखल झाले. आम्हाला बघितल्यावर त्यांनी "काय चालले आहे' अशी चौकशी केली. "या गृहस्थांना खाली जायचे होते. पण, मी त्यांना थांबवले आहे,' असे तो सुरक्षारक्षक कसेबसे म्हणाला. त्यावरच त्याचे उत्तर खरे औदार्याचे होते. "हे माझ्याबरोबर येऊ देत की!' माझा खरेच कानावर विश्‍वास बसत नव्हता. मी, राजा आणि त्याच्या मंडळाबरोबर त्या लिफ्टमधून खाली उतरलो. लिफ्टबाहेर पडताना राजेसाहेबांचे मनापासून आभार मानले. भारतात परत आल्यावर माझ्या मुलाला अभिमानाने म्हणालो, ""येस, आय रोड विथ द किंग!''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh natu write article in muktapeeth