स्माईल प्लीज!

सुशील राठोड
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले.

एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक वीज गेली. कामच थांबले. माझे लक्ष
भिंतीवरील माझ्या गुरूदेवांच्या प्रतिमेकडे गेले. मी लक्षपूर्वक पाहात होतो. माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो, कसा घडलो आणि आज कुठे पोचलो आहे, असा जीवनपटच डोळ्यासमोर उलगडत गेला.

सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले.

एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक वीज गेली. कामच थांबले. माझे लक्ष
भिंतीवरील माझ्या गुरूदेवांच्या प्रतिमेकडे गेले. मी लक्षपूर्वक पाहात होतो. माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो, कसा घडलो आणि आज कुठे पोचलो आहे, असा जीवनपटच डोळ्यासमोर उलगडत गेला.

लहानपणी घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडील पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍समध्ये कामाला, प्रसंगी रस्त्यावर बसून मफलरी विकण्याचेही काम त्यांनी केले. हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स स्कूलच्या शिक्षकांमुळे इयत्ता सहावीला असताना स्वावलंबनाचे संस्कार मिळाले. शिक्षकांनी मनावर बिंबवले होते की, कोणावरही अवलंबून न राहता आपण आपल्या पायावर उभे राहावे. मी सहावी उत्तीर्ण झाल्यावर मनाचा निश्‍चय केला की, आपला खर्च आपणच भागवायचा. माझे मित्र सचिन शहा यांचा त्या काळात ध्वनीफितीमध्ये गाणी रेकॉर्डिंग करून देण्याचा व्यवसाय होता. मी त्यांच्याकडे काम करू लागलो. त्यांच्याकडून गाणी ध्वनीफितीमध्ये भरून द्यायला शिकलो. दहावीपर्यंत हे काम केले. त्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लहानमोठी बरीच कामे केली. पण मनात सतत यायचे की, एखाद्या कलेच्या क्षेत्रात आपण असायला हवे, आपल्याला छायाचित्रे घेणे जमेल. म्हणून मी सातारा रस्त्यावरील एका फोटो स्टुडिओत काम करू लागलो.

मी त्या स्टुडिओत पडेल ती सर्व कामे, अगदी साफसफाईसुद्धा करीत होतो. मालक छायाचित्रे घेत असत, तेव्हा व कृष्णधवल छायाचित्रे "प्रिंटिंग' करताना मी निरीक्षण करीत असे. जमेल तसे शिकण्याचा प्रयत्न करीत असे. पिंपरीवरून सातारा रस्ता येथील स्टुडिओपर्यंत येण्याजाण्यासाठी बस भाडे 180 रुपये महिना असे. ते पैसे मिळवण्यासाठी अजूनही मी दारोदारी फिरून रेकॉर्डिंगसाठी ध्वनिफिती जमवीत असे. विविध मासिके, पुस्तके वाचून त्यातून छायाचित्रणकलेचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा असेच एका समारंभात मालक आणि मी छायाचित्रे काढत होतो. माझ्याकडून काहीतरी चूक झाली. मालकाने मला जोरात मारले. मी मंचावरून खाली पडलो, कुठे चुकले हे विचारून परत माझ्या कामाला लागलो. तीन वर्षे मी या स्टुडिओत विनापगारी काम केले. तेथे जमेल तेवढी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या कलेवरच तर मी इथवर पोचलो आहे.

काही दिवस मुंबईतही काम केले, पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. माझे गुरू देवाजीमहाराज यांनी माझी पत्नी संगीता हिला सांगितले की, ""सुशील को फोटोग्राफीमेही करियर करना चाहिए !'' त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परत पुणे गाठले. मनाशी ठरवले की, आता फक्त फोटोग्राफीचं. पुढे मित्र, आईवडील यांच्या सहकार्याने माझा स्वतःचा पहिला 'पेन्टॅक्‍स' कॅमेरा विकत घेतला. अनेकांना जाऊन भेटत असे, काम देण्याची विनंती करीत असे. काही कामानिमित्ताने मी त्या वेळचे खासदार सुरेश कलमाडी व मीरा कलमाडी यांच्या संपर्कात आलो. मीरा कलमाडी यांनी मला खासदार कलमाडी यांचे कार्यक्रम "कव्हर' करण्याची संधी दिली. त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो. त्यांनी "पुणे फेस्टिवल'चे काम मला दिले. हा माझ्या आयुष्यातील "टर्निंग पॉईंट" ठरला. या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार, राजकीय नेते जवळून पाहता आले. त्यांच्याशी दोन-चार शब्द बोलता आले. अमिताभ बच्चन, हेमामालिनी, लता मंगेशकर, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग, केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा महनीयांची अगदी जवळून म्हणजे तीन फुटांच्या आत छायाचित्रे घेण्याची संधी मिळाली. माझ्या ऑफबीट, हटके फोटोंना पत्रकारितेच्या क्षेत्रात न्याय दिला तो दैनिक "सकाळ"ने. "सकाळ'मध्ये माझ्या नावासह छायाचित्रे प्रसिद्ध झाली. लाखो वाचकांना माझ्या छायाचित्रांनी आनंद दिला.

मॉरिशियसच्या सांस्कृतिक मंत्री शीला बापू व सुप्रसिद्ध गायिका पिनाझ मसानी या मी काढलेल्या छायाचित्रावर व बातमीवर बेहद खुश झाल्या होत्या. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचा कार्यक्रम रात्री बारा वाजता संपला आणि त्याच रात्री अडीच वाजता त्या कार्यक्रमाची छायाचित्रे मी त्यांच्या हातात ठेवली. त्याकाळी आजच्या सारख्या सुविधा नव्हत्या. साहजिकच ते आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी रात्री अडीच वाजता ज्युसबार उघडायला लावला व मला ज्यूस पाजले. हीच माझ्या कामाची पावती व हीच कमावलेली माझी संपत्ती.

एवढ्यात वीज आली. प्रकाश पसरला. माझ्या आजवरच्या संघर्षमय अंधारातील जीवनात "प्रकाश' आला जणू. भानावर येत संगणक सुरू केला आणि टिपलेल्या छायाचित्रांमधे "जिवंतपणा' आणण्याचे काम करू लागलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushil rathod write article in muktapeeth