जपानमधील रक्षाबंधन

तानाजी एकोंडे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता. पण जपानमध्ये राखी कोण बांधणार? केवळ विचारानेच मनाला खिन्नता आली.

रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता. पण जपानमध्ये राखी कोण बांधणार? केवळ विचारानेच मनाला खिन्नता आली.

तांत्रिक प्रशिक्षणासाठी मी जपानला गेलो होतो. तिथे असताना रक्षाबंधनाचा सण आला. बहिणीने भावाला राखी बांधून प्रेमभाव व्यक्त करण्याचा हा सण. एका छोट्याशा रेशमी धाग्यामुळे हे बंधन अनंत काळपर्यंत टिकून राहते. ज्याना सख्खी बहीण नसते ते मानलेल्या बहिणीकडून राखी बांधून घेऊन अथवा ज्यांना सख्खा भाऊ नसतो त्या मानलेल्या भावाला राखी बांधून हा सण साजरा करतात. काही शाळा, महाविद्यालये, अनाथाश्रम, तुरुंग अशांसारख्या विविध ठिकाणी सामूहिक रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. काही स्वयंसेवी महिला मंडळे, सामाजिक संस्था सीमारेषेवर जाऊन देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांनाही प्रेमभराने राखी बांधतात. नारळी पौर्णिमेला मच्छीमार बांधव समुद्राचे पूजन करतात. हे सारे मला जपानमध्ये आठवत होते. आणि त्याचवेळी जपानमध्ये मला कोण राखी बांधणार, या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. दोन दिवसांनंतर येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या भगिनींची आठवण मला सतत येत राहिली. या वर्षी आपण रक्षाबंधनाला मुकणार, या भावनेने मन खिन्न झाले होते. एकेदिवशी मी माझ्या सहकारी मित्राला तसे बोलूनही दाखविले. ते ऐकून तोही भावविवश झाला आणि माझ्याकडे पाहत तो निःशब्द झाला. दोघांच्याही नेत्रकडा ओल्या झाल्या.

काही वेळानंतर आम्ही चहाच्या निमित्ताने वसतिगृहाच्या काउंटरकडून स्वयंपाकघराकडे जात असताना तेथील व्यवस्थापकाने आमचे सहकारी दामोदर चव्हाण यांना मायदेशातून आलेले एक पाकीट दिले आणि काय आश्‍चर्य! त्यामध्ये त्यांच्या मुलीने पाठविलेल्या दोन राख्या होत्या. ते पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमच्या ग्रुपमधील आणखी एका मित्रासाठीही काही राख्या आल्या होत्या. मग आम्ही राखी पौर्णिमेदिवशी या एकमेकांच्या हातात बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला; तेव्हा सर्वांची मने द्रवली. भावविभोर वातावरणात साजरा झालेला हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम माझ्या स्मरणात अजूनही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanaji yekonde write article in muktapeeth