थॅंक्‍यू अंजली!

डॉ. कपिल झिरपे
सोमवार, 26 डिसेंबर 2016

एरव्ही अतिदक्षता विभागातील एखादी लढाई आम्ही हरतो तेव्हा हतबल झाल्यासारखे होते. त्या दिवशीही ती कोवळी पोर समोर होती आणि मी अस्तबल. तेवढ्यात अवयवदानाची कल्पना समोर आली आणि सहा जीव वाचवण्याची नवी लढाई सुरू झाली.

मला तो दिवस आठवतो. रुबी हॉलच्या अतिदक्षता विभागात रोजच्याप्रमाणे कामात असतानाच मला रडण्याचा जोरात आवाज आला. मी इन-चार्ज असणाऱ्या सिस्टरला बोलावून काय झाले असे विचारले. ती म्हणाली, ""अंजलीची आई रडते आहे....''
अंजली (काल्पनिक नाव) सुमारे 14 वर्षांची गोड मुलगी, दोन दिवसांपूर्वीच बेशुद्धावस्थेत आमच्याकडे दाखल झाली होती. ती दहावीत शिकत होती. अभ्यासात अत्यंत हुशार. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर आईला सांगून झोपण्यास गेली. पाच- दहा मिनिटांतच डोके खूप दुखतेय अशी तक्रार करत ती आली आणि बेशुद्ध झाली. तिच्या पालकांनी तातडीने तिला रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल होईस्तोवर तिची तब्येत आणखीच बिघडली, गंभीर झाली होती. तातडीने सीटी स्कॅन टेस्ट झाली. त्यात तिच्या मेंदूमध्ये आतील भागात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे आढळून आले. हे प्रमाण इतके होते, की ती पुन्हा शुद्धीवर येण्याची शक्‍यताच नव्हती. अंजली... घरातील एकुलती एक मुलगी. आम्ही सारे हतबल होतो.

आम्ही शिक्षण घेताना जीव कसा वाचवायचा एवढेच शिकलेलो असतो आणि मृत्यूनंतर अथवा मृतमय अवस्थेनंतर जीवन नसते, ही आमची धारणा असते. मात्र, हे कटुसत्य अंजलीच्या आई-बाबांना कसे समजावून सांगायचे, हा मोठा यक्षप्रश्न माझ्यापुढे आला होता. त्याचवेळी माझा एक सहकारी माझ्या कानात कुजबूजला... ""सर, आपण अवयवदानाचा विचार करू शकतो?'' मी त्याच्याकडे पाहून एवढेच म्हणालो... ""शक्‍य आहे.'' त्या एका प्रसंगाने, अंजलीच्या केसकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलून गेला. या पूर्वी बहुतांश वेळा जेव्हा एखादा रुग्ण ब्रेनडेड अवस्थेत असे, तेव्हा आम्ही लढाई हरलेल्या योद्‌ध्यागत संपूर्ण शरणागती पत्करत होतो. मात्र, इथे अवयवदान हे शब्द कानी पडताच आम्ही हरलेली लढाई पुन्हा एकदा नव्या आव्हानात रूपांतरित करण्याचे ठरविले. या परिस्थितीत अवयवदान घडले तर आणखी सात-आठ जणांचे जीव वाचविता येतील, या विचारांनी नवा हुरूप आणला.
मी आमच्या टीमला सांगितले... ""चला, आपण आता पुन्हा कामाला लागू. आपण कोणतीही लढाई हरलेली नाही. उलट, आपणास नवी लढाई जिंकायची आहे. या लढाईमध्ये पूर्वीपेक्षाही अधिक आव्हाने आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या लढाईतील यश समाजासाठी नवा संदेश देणारे ठरणार आहे.''

ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांशी संवाद साधणे, ही डॉक्‍टरांच्या दृष्टीने अत्यंत कठीण, संवेदनशील बाब. रुग्णाच्या आप्तेष्टांपुढे वस्तुस्थिती, त्यातील वैद्यकीय सत्य उलगडून दाखवतानाच त्यांना धीर देणे खरोखर अग्निदिव्य असते. आता अवयवदान संकल्पनेनंतर, या पार्श्वभूमीवर आम्ही रुग्णाच्या कुटुंबीयांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो, की तुमची प्रिय व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या ब्रेनडेड आहे. मात्र, तिचे अस्तित्व जगामध्ये अजूनही दरवळू शकते. कुणा गरजू व्यक्तीच्या डोळ्यांतून, हृदयातून, किडनीतून, फुफ्फुसांतून... दुःखद क्षणातही काहीसा दिलासा देऊ शकणारी कल्पनाच नव्हे का ही? डॉक्‍टर म्हणून व्यवसाय करीत असताना, एक प्रकारचे बहुमोल असे सामाजिक कार्यही आपल्या हातून घडू शकते, ज्यातून आपण अनेकांच्या चेहऱ्यांवर हसू आणू शकतो. म्हणून आपण खूप सुदैवी आहोत, असे मला नेहमी वाटते.

आता, माझ्यावर मोठी जबाबदारी आली होती. मी अंजलीच्या आई-बाबांना समुपदेशनासाठी बोलावले. त्यांना सांगितले, की ती आता ब्रेनडेड आहे. सुरवातीला त्यांना हे कटुसत्य स्वीकारणे अत्यंत जड गेले. नंतर, आणखी काही वेळा झालेल्या समुपदेशनातून मला त्यांना तिच्या ब्रेनडेड अवस्थेबाबत समजूत घालण्यात यश आले. मात्र, यापुढचे आव्हान मोठे होते. त्यांना मी अवयवदान संकल्पनेविषयी माहिती दिली. आपली प्रिय अंजली आता वैद्यकीयदृष्ट्या ब्रेनडेड आहे व तिचे अवयवदान होऊ शकते, हे स्वीकारायला विशेषतः तिच्या आईला खूप जड जात होते, जे स्वाभाविकही होते. अखेर अंजलीच्या बाबांनी तिच्या आईची समजूत काढण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली. काही काळाने, जड अंतःकरणाने का होईना, तिने त्यास मान्यता दिली. अखेर, ब्रेनडेड अंजली अवयवदाता बनली आणि तिच्यामुळे सहा रुग्णांना जीवनदान लाभले.

आपल्या कामगिरीवर आम्ही खूप खूष होतो... पण या घटनेचा अनपेक्षित अंत अजून यायचा होता. दुसऱ्या दिवशी, अंजलीचे बाबा मला भेटावयास आले आणि ते म्हणाले, ""माझ्या ब्रेनडेड झालेल्या मुलीने सहा जणांना नवे जीवन दिले, याचे आम्हाला विलक्षण समाधान लाभले आहे. यापुढे, तुम्हाला ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी माझी कोणतीही मदत लागली, तर कोणत्याही क्षणी हक्काने बोलवा, मी हजर असेन.''
या अनपेक्षित वाक्‍याने, मी अक्षरशः निःशब्द बनलो....!
त्या गोड मुलीचा चेहरा आठवून मन म्हणाले, थॅंक्‍यू अंजली!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thank you anjali