इतरांच्या आयुष्यात उजेड पेरणारी माणसं

Social
Social

समाजात काही माणसं अशी असतात की, ज्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध चौफेर दरवळत असतो. आपले जगणे कठीण असूनही इतरांसाठी सतत धडपडत असतात. आपल्या पदरातील चांदणे इतरांच्या ओंजळीत टाकण्यात त्यांना धन्यता वाटते. सतत हसणारी, इतरांना हसवणारी माणसं, खरं तर आपले दुःख लपवत असतात. आतल्या वेदनेवरचं औषध त्यांना सापडलेलं असते. आयुष्य काळोखाने माखले असताना काही माणसं, आपले जगणे विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात. आदर्शाची स्थळ आपल्या अवतीभवती असतात. आपण उगाचच दूरवरच्या, न अनुभवलेल्या माणसांचे कौतुक करीत दाखले देत असतो. आत बाहेर निर्मळ असणारी माणसं अभावानेच आढळतात.

इतरांच्या आयुष्याला रंग देणारा फिनिक्‍स पक्षी मनोज बोबडे असाच एक कलंदर...जगण्याच्या वाताहतीत सर्वस्व गमावल्यावर त्याच्यातील जिद्द अनेकांना प्रेरणा देऊन जाते. फुलण्याचे वय फुलपाखरांसारखे असते. सतत नानाविध जीवनानुभवाचा आस्वाद घेत भिरभिरणारे. बहरण्याच्या वयात आपण किती स्वप्नाळू होतो. मनोज बोबडे सर्वसामान्य मुलांसारखा. उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण होऊन कॉलेजात जाऊ लागला. अभ्यासात हुशार. वणी राजुर कोलमाईनच्या परिसरात त्याच्या बालवयाची जडणघडण झाली.

अचानक त्याच्या शरीराने त्याची साथ सोडायला सुरुवात केली. चेतासंस्था निष्क्रिय व्हायल्या लागल्या. सर्व चाचण्या औषधोपचार सुरू झाले. हळूहळू आजाराने पाय घट्ट रोवले. दहा लक्ष लोकांमागे होणारा, जगात कुठेही उपचार न होऊ शकणारा पालीओसायमायटीस नावाचा आजार झाला आणि तो कायमचा बिस्तराला खिळवला. चालण्याचे, धावण्याचे मुक्‍त विहार करण्याचे जग चार भिंतीत बंद झाले. आई-वडिलांनी एखाद्या शिशुची सुश्रूषा करावी तसा दिनक्रम त्याच्या वाट्याला आला. तो आतल्या आत खचायला लागला.

आपण आई-वडिलाच्या म्हातारपणातील काठी होण्याऐवजी, धोंडा झालो. अशी भावना त्याच्या मनात सतत सलत होती. आजारानंतरची दहा वर्षे उपचाराच्या नानाविध पद्धती अजमावण्यात गेली. मनात आत्महत्येचा विचार घिरट्या घालत होता. त्याला कुणीतरी विवेकशील विचारांची पुस्तकं वाचायला दिली. त्यातून मनाला उभारी मिळाली. अख्ख जीवन बदलून गेलं. वाचन, लेखन, चिंतन करत जगण्याची वाटचाल कवितेचे बोट धरून सुरू केली. थरथरणा-या दोन हातांना कसाबसा जवळ आणतो. कवितेला जन्म देतो. बांबुकलेच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तुंच्या प्रतिकृती निर्माण करतो. त्याला चित्रकलेचा छंद बालपणापासून असल्याने आपल्या मनातील भावना कुंचल्यातून चित्तारतो. कलावंतांची पिढी घडवण्याचे काम करतो. एका बेफाम पावसात माझी आणि त्याची नाळ जुळली. ती आजतागायत जीवंत आहे. मुसळधार पावसात वादळासारखा मित्र गवसायला भाग्य लागते. सर्वांच्या हृदयी रुजू होणारे संवेदनशील मन निसर्गाने त्याच्या दिले आहे.

हे त्याचे आंगिक दुःख केवळ बघणा-यांच्या लक्षात राहिले. तो तर आपल्या शरीराला विसरून इतरांच्या आयुष्यात आनंद भरण्यात मश्‍गूल झाला. समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी त्याची संवेदनशीलता सजग असते. शेतक-यांच्या प्रश्‍नांसाठी आपली व्हीलचेअर घेऊन आंदोलनात सहभागी होतो. अक्षर साहित्य कला चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील लेखक घडावे, म्हणून सतत धडपडत असतो. साहित्य संमेलने, रक्‍तदान शिबीरे, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत निधी; आदी उपक्रमांकरिता आपल्या मिळकतीतील रक्‍कम टाकत कृतीशील माणसाचे दर्शन घडवितो.

सप्तरंग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्व निभावित असतो. सप्तरंग प्रकाशन संस्थेची निर्मिती करून आजवर दहा पुस्तकांचे प्रकाशनही केले. अनेकांच्या आयुष्याचा आधारवड म्हणूनही तो उभा राहिला. त्याचे मी आनंदी सुखी आत्मचरित्र प्रेरणादायी आहे. बालवयात बालकाचे संगोपन चुकीच्या दिशेने, समजुतीने झाले की; त्याच्यात निर्माण होणारा न्यूनगंड आजाराचे रूप कसे धारण करतो? कर्मकांड, धर्मांधता, अंधश्रद्धा यामुळे होणारे माणसाचे अधःपतन, परंपरेच्या जोखडातून समाजाला मुक्‍त करण्याचे प्रबोधन स्वानुभवाद्वारे विशद केले आहे. जगातील प्रेरणादायी लेखकांच्या तोडीचे लेखन सामर्थ्य त्याच्या आत्मकथनात दडले आहे. स्वतःची अशी वैचारिक भूमिका घेऊन जगणा-यांपैकी तो एक प्रतिभावंत कवी आहे.

स्त्री अनंतकाळापासून पृथ्वीची पालनकर्ती म्हणून भूमिका बजावत राहिली. दिव्यांग महिलांसाठी आत्मसन्मानाचे आधारवड म्हणून अर्चनाताई मानलवार चंद्रपूरात उल्लेखनीय कार्य करीत आहे. मागील वर्षी सप्तरंग संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने ज्ञानार्चना बहुउद्देशीय महिला दिव्यांग संस्थेला भेट देण्याचा योग आला.

अचर्नाताई दोन वर्षाची असताना पोलिओच्या विळख्यात सापडली, पाठीत खूप कळा यायच्या म्हणून वयाच्या बाराव्या वर्षी मणक्‍याची शस्त्रक्रिया झाली आणि कायमचे व्हीलचेअरशी नाते जुळले. आपल्या वाट्याला आलेले भोग इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती कामाला लागली. ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग महिलांना आत्मनिर्भर करीत आहेत. समुपदेशन, बचत गटांच्या माध्यमातून दिव्यांग महिलांना सक्षम करण्याचा वसा उचलला. दिव्यांग आहे म्हणून ज्यांना कुटुंबाने नाकारले अशा महिलांसाठी ती मसीहा आहे.

बॅग्ज, अगरबती, फिनाईल, मास्क, धूप, वाती, राख्या, भेटकार्ड, लिफाफे अशा अनेक वस्तुंची निर्मिती त्यांच्या संस्थेत केली जाते. समाजशील माणसे स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्चनाताईच्या संस्थेत जातात. अन्नधान्य देतात, पण रूम भाडे, महिलांचे आजारपण, व्हीलचेअर दुरुस्ती यासाठी त्यांना लोकांच्या आर्थिक मदतीची वाट बघावी लागते. दिव्यांग महिलांसाठी ती दीपस्तंभ आहे. तेथील प्रत्येकीची कहाणी निराळी. गळ्यातील गाण्याचा सूर निराळा. लोकांना मदतीचा हात मागत असताना लाचारी पत्करली नाही. स्त्री आत्मनिर्भर कशी होईल यासाठी सतत आटापिटा केला. समाजातील दुर्लक्षित दिव्यांग घटकांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक प्रश्‍न सोडविण्यासाठी अर्चनाताई तत्पर असतात. आजपावेतो चारशे पेक्षा अधिक दिव्यांगानी समुपदेशनाचा लाभ घेत; स्वकौशल्य विकसित केले आहे. अर्चनाताईच्या कार्याला सलाम.

आम्ही उगाचच अशा माणसांना विकलांग म्हणत असतो. काहींच्या घरात अशी बालके जन्माला येतात. कुटुंब त्यांना नाकारते. रस्त्यांवर भीक मागायला मजबूर करते. दिव्यांग महिलांवर झालेल्या अत्याचारांची उदाहरणे वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे रंगवत असतात. हातवाऱ्यांचे नैसर्गिक जग त्यांच्या वाट्याला आले असले तरी, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. जगाच्या इतिहासात हेलन केलर, स्टीफन हॉकिंग यासारख्या महामानवांनी आपल्या अपंगत्वावर मात करत, जगाला ज्ञान-विज्ञानाची नवी मूल्ये दिली आहेत. हे विसरून कसे चालेल.

नियतीने जरी, बांधियले पाय
पळविले भय, कर्तृत्वाने !
दुज्यांच्या पदरी, पेरले चांदणे
वैभव गोंदणे, त्यांना ठावे !
पलटून कधी, बघितले नाही
केल्या दिशा दाही, ऊर्जावान !

समाजात हात-पाय सुदृढ असणारी माणसे हताश, हतबल होऊन व्यसनाच्या आहारी जातात. जीवनात अपयश आले म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. शेवटी प्रश्‍न उरतो, समाजाच्या विकृत मानसिकतेचे काय?. समाजाच्या विकलांग मानसिकतेला बाजारात औषध सापडत नाही. स्वतःला सुदृढ म्हणवून घेणा-या माणसांपेक्षा अशी माणसं प्रभावशाली आहेत. जगण्याच्या कुठल्याही टप्प्यावर अपयश आले की, मनोजदादा आणि अर्चनाताईसारखी माणसं डोळ्यासमोरून पुस्तकांसारखी वाचली पाहिजे. त्यांनी स्वतःच्या दुःखाचे कधी भांडवल केले नाही. शरीराने साथ सोडली म्हणून कुढत बसले नाही. मनाचे सौंदर्य त्यांना कळले, म्हणूनच इतरांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचे काम ही माणसं करीत आहेत. त्यांच्यातील प्रतिभाशाली कौशल्याला खतपाणी घालण्यासाठी, आमच्या सहानुभूतीपेक्षा निखळ प्रेमाची गरज आहे. तरच सर्वांना धरतीच्या कल्याणाचे गीत गाता येईल.
 

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com