esakal | प्रस्थानत्रयी : ज्ञानाचे तीन मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

GYAN

ब्रह्मसूत्रांची रचना बादरायण व्यास यांनी केल्याची आख्यायिका आहे. प्रत्येक उपनिषदात असलेले वेगळे तर्क व उपनिषद आणि भगवद्गीतेतील विसंगती व भेद यांच्या समाधानासाठी केलेले सुसंगत तर्क व युक्तिवाद हे ५५५ सूत्र यांना वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र म्हणतात.

प्रस्थानत्रयी : ज्ञानाचे तीन मार्ग

sakal_logo
By
डॉ. अनुपमा साठे

‘प्रस्थान' या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे सांगितला आहे. पहिला अर्थ विशेषत: वेदांताच्या संदर्भात प्रस्थान म्हणजे विद्येचे स्रोत. सर्व विद्येचे आद्य स्रोत वेद आहेत. वेदांचे ढोबळमानाने दोन भाग आहेत. कर्मकांड व ज्ञानकांड. कर्मकांडांमधे यज्ञ, उपासनेच्या पद्धती, तप इत्यादीचे वर्णन आहे. ज्ञानकांड हे वेदांमधील तत्त्वज्ञानाचे सार आहे. हे सार उपनिषदांमधे एकवटलेले आहे. वेदार्जित ज्ञानाची उच्चतम पातळी म्हणून उपनिषदांना वेदांत असे म्हणतात. हे गूढ व समजायला कठीण आहेत व यांच्यावर अनेक विद्वानांनी टीकाग्रंथ लिहून हे ज्ञान सोप्या रीतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व उपनिषदांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता महाभारताचा एक भाग असून सुद्धा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून तिची महती आहे. उपनिषदांमधे निर्माण झालेले प्रश्न तसेच उपनिषद व गीतेमधील विसंगती स्पष्ट करून त्यांचे निराकरण करण्याची गरज लक्षात घेता बादरायण व्यास यांनी ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली. उपनिषद, ब्रम्हसूत्र व भगवद्गीता या तीन ग्रंथाना प्रस्थानत्रयी म्हणतात. यापैकी उपनिषद हे श्रुती प्रस्थान कारण त्यांचा उगम वेदांतून अर्थात श्रुतींमधून झाला आहे. भगवद्गीता ही स्मृतिप्रस्थान व ब्रह्मसूत्र न्याय प्रस्थान होय. ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यास हे तीन मुख्य ग्रंथ आहेत. ‘प्रस्थान’ शब्दाचा दुसरा व प्रचलित अर्थ आहे जाण्याचा मार्ग. स्वत:च्या शोधात निघालेल्या साधकाचा मार्ग या तीन ग्रंथांमधून जातो म्हणून यांना प्रस्थानत्रयी म्हणत असतील! प्राचीन काळात आचार्य किंवा गुरू यांना स्वत:च्या मताचे प्रतिपादन करावयाचे असल्यास या तिन्ही ग्रंथावर भाष्य करणे आवश्यक होते. निंबकाचार्य, आदि शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादींनी प्रस्थानत्रयींवर भाष्यग्रंथ लिहून आपल्या मतांचे प्रतिपादन केले.

उपनिषदे वेद व वेदांगामधील भाग आहेत. एकशे आठ उपनिषदे असल्याचा मौक्तिक उपनिषदात उल्लेख आहे व यात प्रमुख अकरा उपनिषदांवर शंकराचार्यांचे भाष्य आहे. ऋग्वेदीय साहित्याशी निगडीत १०, यजुर्वेदीय ५१, सामवेदीय १६ व अथर्वेदात सापडणारे ३१ असे १०८ उपनिषदे सांगण्यात येतात. ब्रह्मविद्येचे वा आत्म व ब्रह्म यांचे शोधपर हे ग्रंथ गोष्टी किंवा गुरू शिष्याच्या प्रश्नोत्तर स्वरूपात ब्रह्मविद्येचे निरूपण करतात. प्रसिद्ध महावाक्ये-‘अहं ब्रह्मास्मि’, ‘तत्वंमसि’, ‘प्रज्ञान: ब्रह्म’ व ‘अयम् आत्मा ब्रह्म’, अनुक्रमे बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद व माण्डूक्य उपनिषदात सापडतात. फक्त भारतीयच नाही तर पाश्चात्य अभ्यासकांनाही, वैज्ञानिक असो वा तत्त्ववेत्ता, उपनिषदीय तत्त्वज्ञानचे अप्रूप व प्रचंड आकर्षण आहे. अनेक पाश्चात्य अभ्यासकांनीही उपनिषदांवर टीकाग्रंथ लिहिले आहेत. विज्ञान व अध्यात्म एकमेकांपासून फार लांब नाहीत.

ब्रह्मसूत्रांची रचना बादरायण व्यास यांनी केल्याची आख्यायिका आहे. प्रत्येक उपनिषदात असलेले वेगळे तर्क व उपनिषद आणि भगवद्गीतेतील विसंगती व भेद यांच्या समाधानासाठी केलेले सुसंगत तर्क व युक्तिवाद हे ५५५ सूत्र यांना वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र म्हणतात. हे तर्क सूत्रांचा रूपात चार अध्यायात व्यासांनी मांडले आहेत. कुठल्याही सिद्धांताचे सत्य पारखायचे असेल तर तर्क व प्रमाणाची आवश्यकता असते म्हणून या न्याय प्रस्थानाचे महत्त्व प्रस्थानत्रयीमधे अद्वितीय आहे. सूत्ररूप असल्यामुळे हे अतिशय संक्षिप्त आहेत व व्याख्येशिवाय समजायला अतिशय अवघड. अनेक आचार्यांनी यावर विवेचनपर ग्रंथ लिहून सामान्यजनांसाठी समजायला सोपं करण्याचे प्रयत्न केले आहेत.

भगवद्गीतेचं माहात्म्य सांगताना आदि शंकराचार्य म्हणतात, ‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:’. भगवद्गीता सर्व उपनिषदांचे सार आहे. सर्व उपनिषद गाईसमान आहेत व श्रीकृष्ण हे गवळी होऊन त्यांचे दोहन करताहेत. त्यातून जी अमृततुल्य धार निघत आहे ती आहे भगवद्गीता. जरी या गाईचे दूध आपल्या वासरासाठी, अर्जुनासाठी होते, परंतु या अमृत धारेने सर्व मनुष्यमात्र आपली तहान भागवू शकतात. श्रीकृष्णाचे हे संपूर्ण मनुष्य जातीवर उपकार आहेत.

उपनिषदेतील बरेच श्लोक शब्दश: गीतेत दिसून येतात.
उदाहरणार्थ कठोपनिषदेतला श्लोक
न जायते म्रियते वा विपश्चिन् । नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् ॥

अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो । न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

हाच श्लोक भगवद्गीतेत आहे
न जायते म्रियते कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो । न हन्यते हन्यमाने शरीरे ॥(२.२०)

सर्व वेदांमधील सर्वोच्च तत्त्वज्ञान गीतेतील अठरा अध्यायांमधे सामावलेलं आहे. आयुष्यात येणारे अडचणींचे प्रसंग असोत किंवा कठिण परिस्थिती. मनाच्या संभ्रमावस्थेत बरेच प्रश्न निर्माण होतात. या सर्वांचे उत्तर कोणत्यातरी स्वरूपात गीतेत नक्कीच सापडतात. विनोबाजींनी म्हटले आहेच,
‘गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी’.
वय कुठलंही असो, आई नेहमी प्रियच असते, तशीच भगवद्गीता सुद्धा सर्व वयांच्या लोकांसाठी उपयोगी आहे. सर्वसामान्य समज असा असतो की हे ग्रंथ निवृत्तीनंतर, सर्व जवाबदाऱ्यांमधून मोकळे झाल्यावर, वेळ घालविण्यासाठी किंवा पुण्य प्राप्तीसाठी वाचावे. परंतु, गीतेचा उपदेश करणारा कोण होता? श्रीकृष्ण. गृहस्थ धर्माचे पालन करणारा. उपदेश प्राप्त करणारा कोण होता? अर्जुन. युद्धासाठी संपूर्ण सैन्यासह सज्ज असलेला एक राजा. हा उपदेश कुठे दिला गेला? कुठल्याशा अरण्यात किंवा आश्रमात झाडाखाली बसून नव्हे तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर. अर्जुनाला त्याचा कर्तव्याची जाणीव करून देणारा त्याला युद्धासाठी उद्युक्त करणारा, ‘कर्म कर’, आपल्या धर्माचे पालन कर, असे सांगणारा हा उपदेश होता. आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणींशी चार हात करून त्यावर मात करा हा भगवद्गीतेचा उपदेश सर्व वयांचा लोकासाठी उपयुक्त आहे. म्हणून लहान वयातच गीता वाचायची सवय लावायला पाहिजे. वाढत्या वयासोबत, वाढत्या प्रगल्भतेबरोबर त्याचे नवीन अर्थ उलगडत जातात.
प्रस्थानत्रयीं पैकी ब्रह्मसूत्र व उपनिषद समजायला अवघड असले तरी भगवद्गीता हा सामान्यांचा ग्रंथ आहे. तरी सर्वोच्च तत्त्वज्ञान असण्याचा दावा गीताच करू शकते. भगवद्गीता सोबतीला घेतली तर आयुष्याचे मार्गक्रमण मोहक व आनंददायक नक्कीच होणार.