आंबे.. आंब्याच्या रेसिपी.. आणि स्वर्गीय सुख!

Mango Recipes
Mango Recipes

आपण जेव्हा अतिशय दमलेले असतो, तेव्हा काहीतरी थंड पेय घ्यावेसे वाटते. उन्हाळ्यात थंड पेये आणि हिवाळ्यात गरम पेये घ्यावीशी वाटतात. त्यामुळे शरीराला स्वास्थ्य मिळते आणि शरीर ताजेतवाने होते. काही वेळेस पाणी प्यायल्यानेसुद्धा बरे वाटते. 
 

उन्हाळ्याचा दाह शमविणारे कैरी-आंबा सरबत 
सुनिता मिरासदार

  • आंब्याचे टिकाऊ सरबत 

साहित्य : पिकलेल्या आंब्याचा रस चार वाट्या पाणी न घालता काढावा. दोन वाट्या साखर, अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड, अर्धा चमचा पोटॅशियम - मेटा - बाय सल्फाइड 

कृती : आंब्याचा रस जाड चाळणीने गाळून घ्यावा. साखरेमध्ये एक वाटी पाणी घालून पक्का पाक करावा. पाक थोडा थंड झाला, की गाळलेला रस घालावा. सायट्रिक ऍसिड, पोटॅशियम - मेटा - बाय सल्फाइट घालून मिसळावे. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. वर्षभर चांगले टिकते. सरबत करताना पुरेसे पाणी, बर्फ, चवीला मीठ, मीर पूड भुरभुरावी. ऐनवेळी पटकन करता येते. 
* कच्च्या कैरीचे टिकाऊ सरबत वरील कृतीप्रमाणे करावे. रसाच्या दुप्पट साखर घालावी. सायट्रिक ऍसिड वापरू नये. बाकी कृती वरीलप्रमाणे. 

  • मॅंगो शॉट

साहित्य : अर्धा कि. गोड तयार आंबे, अर्धा कि. साखर, आल्याचा तुकडा, एक चमचा वेलदोडे पूड, अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड ऍसिड, मीठ 

कृती : पाणी न घालता आंब्याचा रस काढावा. रस, आले, साखर एकत्र करून मिक्‍सरमधून एकजीव करावे. मिश्रण गॅसवर ठेवून पाच मिनिटे चांगले शिजवावे. मिश्रण थोडे दाट झाले, की खाली उतरवून वेलदोडे पूड, सायट्रिक ऍसिड घालून मिसळावे. थंड झाल्यावर भरून ठेवावे. वर्षभर चांगले राहते. ग्लासात थोडा बर्फाचा चुरा घालावा. तयार रस घालावा. चवीला मीठ घालावे. बर्फाचे पाणी होईल. वरून पाणी घालू नये. मॅंगो शॉट दाटसर छान लागते. दिसायलाही छान दिसते. चवीला सुमधूर लागते. वर्षभरासाठी जास्त प्रमाणात करून ठेवता येते. 

  • कोयाडं (कोकणी पेय)

साहित्य : लोणच्यासाठी कैरी चिरल्यावर कोयीला थोडा गर शिल्लक राहतो. गर मऊ असल्यामुळे लोणच्यात वापरता येत नाही. तो गर वापरून सुमधूर पेय करता येते. 
एक वाटी गर विळीने चिरून काढावा. एक वाटी सायीसकट दूध, एक वाटी साखर, केशर, वेलदोडे पूड. 

कृती : गर, साखर एकत्र करून मिक्‍सरमधून बारीक वाटावे. सायीसकट दूध घालून पुन्हा वाटावे. मिश्रण एकजीव होते. मिश्रण स्टीलच्या पातेलीत काढून वेलदोडे पूड, केशरकाड्या घालाव्यात. ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालून मिश्रण घालावे. पाणी वापरू नये. दुधामुळे कोयाडं चवदार लागते. वरून 4-6 चारोळ्या पसराव्यात. साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे ठेवावे. 

  • उकडलेल्या कैरीचे पन्हे (सरबत)

साहित्य : दोन कैऱ्या, एक वाटी साखर/ गूळ, चवीला मीठ, वेलदोडे पूड, केशरकाड्या 

कृती : कैऱ्या मऊ उकडाव्यात. गर काढावा. गर साखर / गूळ एक वाटी पाणी घालून मिक्‍सरमधून फिरवावे. रस गाळून घ्यावा. आवडत असेल तर रस न गाळता सरबत करावे. कैरी गराचे बारीक कण सरबत पिताना छान लागतात. ग्लासमध्ये बर्फाचा खडा त्यावर अर्धा ग्लास कैरी रस आणि पाणी घालून सरबत तयार करावे. थंडगार सरबताने तहान भागते. वेलदोडे पूड, केशरकाड्या घालाव्यात. पन्हे प्यायल्यावर शांत वाटते. तहान भागते. 

  • मॅंगो मोहितो

साहित्य : दोन गोड हापूस आंबे, एक हिरवी मिरची, 5-6 पुदिना पाने, अर्धी वाटी साखरेचा पाक, बर्फाचा चुरा, सोडा वॉटर 

कृती : आंब्याची साल काढून बारीक फोडी कराव्यात. 10-12 फोडी बाजूला ठेवाव्यात. वरून सजावटीसाठी वापराव्यात. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करावेत. साखरेचा पाक, हिरवी मिरची, आंबा फोडी, पुदिना पाने एकत्र करून मिक्‍सरमधून फिरवावे. फार बारीक करू नयेत. आंब्याचा गर (लहान फोड) दिसेल इतपत बारीक करावे. ग्लासमध्ये थोडा बर्फाचा चुरा, आंब्याचे मिश्रण घालावे. सोडा वॉटर घालावे. वरून 3-4 आंबा फोडी, 2-3 पुदिना पाने घालून सजवावे. मोहितोला हिरवी मिरची, पुदिना यांचा स्वाद छान लागतो. वेगळ्या पद्धतीचे चवदार पेय तयार होते. पाहुण्यांना वेगळ्या पद्धतीचे थंडगार पेय द्यावे. 

मॅंगो पंच आणि मॅंगो स्लॅशची मजा..

उन्हाळ्यात निरनिराळ्या चवीची, स्वादिष्ट पेये घ्यावीशी वाटतात. फळांचे पेय करताना नेहमी ताजी फळे घ्यावीत. फळांमधून व्हिटॅमिन्स मिळतात. फळांच्या स्वादिष्ट रसापासून पचनशक्ती सुधारते. शरीराची वाढ होऊन ताकद टिकून राहते. फळापासून शरीराला मोठा फायदा होतो. 

ममता कळमकर 

  • आंबा पंच 

साहित्य : पिकलेल्या आंब्याचा रस 1/2 ग्लास, संत्री व अननसाचा रस प्रत्येकी 1/2 ग्लास, लिंबाचा रस 2 टेबल स्पून, पिण्याचा सोडा 1 बॉटल, पुदिना पानं, बर्फाचा चुरा. 
 

कृती : आंब्याचा रस मिक्‍सरवर फिरवून गाळून घ्यावा. संत्र्याचा रस, अननसाचा रस व आंब्याचा रस एकत्र करून त्यात लिंबाचा रस मिक्‍स करून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावा. 

सर्व्ह करताना : मॉकटेल ग्लासमध्ये निम्मा ग्लास एकत्रित रस, त्यावर बर्फाचा चुरा व सोडा वॉटर घालून पुदिनाची 1-2 पाने घालून सर्व्ह करावे. 

  • आंबा स्लॅश 

साहित्य : आंब्याची प्युरी 1 ग्लास, आयसिंग शुगर दीड टेबल स्पून, बर्फाचा चुरा, 2-3 पुदिनाची पाने चिरून. 

कृती : आंब्याचा रस मिक्‍सरवर काढून चाळणीने गाळून घ्यावा. त्यामुळे आंब्यातील रेषा निघून स्मूथ प्युरी तयार होईल. ही आंब्याची प्युरी फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्यावी. मिक्‍सरवर आंब्याची प्युरी, आयसिंग शुगर व बर्फाचा चुरा घालून घुसळून घ्यावी. आवडत असल्यास वरून पुदिनाची पाने घालून थंडगार सर्व्ह करावे. 

  • फाइव्ह इन वन 

साहित्य : आंब्याचा रस, अननस, संत्र, सफरचंद, रासबेरी, ज्युसेस 150 मि.लि. 
व्हॅनिला आइस्क्रीम छोटा मिनी पॅक, बर्फाचा चुरा, पिण्याचा सोडा, पुदिना पानं, सजावटीसाठी : संत्र व सफरचंदाच्या फोडी. 

कृती : एका मोठ्या ग्लासमध्ये सर्व ज्यूसेस व आइस्क्रीम मिसळून वरून संत्र, सफरचंदाच्या चकत्या व पुदिनाच्या पानांनी गारनिर्श करावे. 

  • ज्यूस विथ आइस्क्रीम 

साहित्य : आंब्याचा रस, अननसाचा रस, मोंसबीचा रस प्रत्येकी एक ग्लास, मॅगो आइस्क्रीम एक ग्लास, पाव ग्लास संमिश्र चिरलेली फळे, अर्धा लिंबाचा रस, एक टेबल स्पून बारीक साखर. 

कृती : सर्व चिरलेली फळे एका बाउलमध्ये घेऊन त्यावर लिंबाचा रस व बारीक साखर भुरभुरून फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावी. सर्व रसदेखील फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावा. 
सर्व्ह करताना : सर्व रस, कुटलेला बर्फ व पाव पेला आइस्क्रीम मिक्‍सरमध्ये टाकून फिरवा. ग्लासमध्ये सर्व्ह करताना सर्वांत पहले सर्व मिश्रण त्यावर आइस्क्रीम, चिरलेली फळे घालून लगेच थंडगार सर्व्ह करावे. 

  • व्हाइट बॉल्स विथ मॅंगो पल्प 

साहित्य : 1 ग्लास खवा, दीड ग्लास पनीर, 1 ग्लास दूध पावडर, 1 टे. स्पून व्हॅनिला इसेन्स, 3-4 गोड पिकलेले आंबे, 2 मोठे चमचे साखर, सजावटीसाठी कोणतेही फ्लेवरचे आइस्क्रीम. 

कृती : आंब्याचा पल्प काढून त्यात साखर घालून फ्रिजमध्ये थंड करून त्यात खवा व पनीर किसून त्यात दूध पावडर व व्हॅनिला इसेन्स घालून व्यवस्थित चांगले छोटे छोटे बॉल्स बनवावे. घट्ट झालेल्या आइस्क्रीमचा स्कूप तळहातावर पसरवून मधोमध ठेवावा. मग आपल्या आवडीनुसार आकार देऊन रंगीबेरंगी चेरीने सजवून फ्रिजमध्ये सेट करावे. 

सर्व्ह करताना : दोन्ही बॉल्स ठेवून आंब्याच्या थंडगार गरासह सर्व्ह करावे.

(सौजन्य : सकाळ साप्ताहिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com