चल रे भोपळ्या...

चल रे भोपळ्या...

लहानपणी ऐकलेल्या गोष्टींत हडळी, चेटकिणी होत्या, भोपळ्यातून जाणारी म्हातारी तर त्यात कशी बसली असेल, हा प्रश्‍न सातत्याने पडायचा. त्याचे उत्तरही मिळाले...

लहानपणी मला ज्या गोष्टी आवडायच्या त्यात "चलरे भोपळ्या टुणूक टुणूक' ही गोष्ट असायची. एका खेडेगावातील गरीब आजीबाई सासरी गेलेल्या आपल्या एकुलत्या मुलीला भेटायला भोपळ्यात बसून जातात. त्यांनी "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असे म्हटले की, भोपळा चालायला लागतो, अशी ती गोष्ट असायची. त्या वेळी आजीबाई भोपळ्यात बसून कशा गेल्या असतील, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. कारण त्या वेळी मी पाहिलेले भोपळे हे फारच लहान, म्हणजे एखाद्या फूटबॉल किंवा त्याच्या दुप्पट आकाराचे असायचे. अशा या छोट्या भोपळ्यात बसून आजीबाई कशा गेल्या असतील? कदाचित त्या ठेंगण्या, म्हणजे अंगठ्याएवढ्या किंवा वितभर उंचीच्या असाव्यात, असे वाटे. पण तसा काही उल्लेख त्या गोष्टीत नसायचा. मग पाच फुटांच्या आजीबाईंना घेऊन जाणारा भोपळा किती मोठा असेल आणि असा भला मोठ्ठा भोपळा आपल्याला कधी पाहता येईल का, असे वाटायचे. तसेच मला आवडलेल्या बहुतेक कथांमध्ये भुते-खेते, हडळी आणि चेटकिणी असायच्या. त्यात हडळींपेक्षा चेटकिणीच भारी असायच्या. हडळी नुसतेच घाबरवायचे काम करायच्या तर चेटकिणींना जादूटोणा येत असायचा. बहुतेक चेटकिणी काळा लांब झगा घालणाऱ्या असायच्या. त्यांचे नाक पोपटाच्या चोचीसारखे बाकदार, हातापायांची नखे वाढलेली आणि डोक्‍यावर टोकदार गोल टोपी असायची. त्यांचा चेहेरा कुरूप, भयाण, विद्रूप किंवा भीतीदायक असायचा. डोळे मोठे अणि गरगरीत असायचे. तोंडातून दाताचे दोन सुळे बाहेर आलेले असायचे. या चेटकिणी विकट किंवा भेसूर हसायच्या आणि किरकिऱ्या किंवा कर्कश्‍श आवाजात बोलायच्या. या अशा चेटकिणी मला कधी बघायला मिळतील का, असेही वाटायचे.

अमेरिकेने या माझ्या दोन्हीही इच्छा पूर्ण केल्या. अमेरिकेत गमतीदार सण असतो- त्याला "हॅलोविन' असे म्हणतात. "हॅलोविन'चा अर्थ येणाऱ्या हिवाळ्याचे स्वागत. इथे साधारणपणे ऑक्‍टोबरनंतर हिवाळा सुरू होतो. त्याचे स्वागत करणारा हा सण आहे. आपल्याकडे ज्या धूमधडाक्‍यात दिवाळीचा सण साजरा केला जातो, तेवढ्याच धूमधडाक्‍यात अमेरिकेत हॅलोविन साजरा होतो. हॅलोविनचा आणि भोपळ्यांचा फार जवळचा संबंध आहे. येथे भोपळ्यांना पम्पकीन म्हणतात. या दिवसात बाजारपेठा भोपळ्यांनी भरून जातात. जिकडे पाहावे तिकडे भोपळेच भोपळे नजरेस पडतात. ते आपल्याकडच्या भोपळ्यांपेक्षा वेगळे असतात. हे भोपळे लालसर पिवळ्या, शेंदरी किंवा भगव्या रंगाचे असतात. ते आतला गर काढून आतून पोकळ केलेले असतात आणि उन्हात भाजून चांगले कडक केलेले असतात. आपण दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे घराघरांत आकाशकंदील लावतो त्याप्रमाणे घराघरांवर हे भोपळे टांगलेले दिसतात. काही भोपळ्यांना माणसाचे डोळे, नाक, तोंड या आकाराची भोके पाडून त्यांना मानवी चेहरा देण्यात येतात. या भोपळ्यांची रंगीबेरंगी दिवे लाऊन आरास पण करण्यात येते. येथे अनेक ठिकाणी "पम्पकीन फेस्टिवल्स'देखील असतात. यांमध्ये नारळाच्या आकारापासून ते भल्या मोठ्या पिंपाच्या आकाराचे भोपळे पाहायला मिळतात. असे भले मोठ्ठे भोपळे पाहिल्यानंतर आजीबाई नक्कीच भोपळ्यात बसून गेल्या असतील, याची खात्री पटते.

अंधश्रद्धा हे या उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य आहे. अंधश्रद्धा काही फक्त भारतातच असते असे नाही, तर ती अमेरिकेतदेखील आहे. भारतामधील लोक ज्याप्रमाणे या अंधश्रद्धा कसोशीने पाळत असतात तसेच अमेरिकेतील लोक पण ही अंधश्रद्धा कसोशीने पाळत असतात. हिवाळ्यामध्ये भुता-खेतांचे, हडळी आणि चेटकिणींचे राज्य असते, असे समजले जाते. हा त्यांचा हंगाम असतो आणि सर्वत्र त्यांचा धुमाकूळ असतो, असे मानण्यात येते. या भुताखेतांचा, हडळी आणि चेटकिणींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना "शांत' करायची येथे प्रथा आहे. त्यांना शांत करायचे म्हणजे चक्क त्यांच्या पोषाखात त्यांच्यासारखे मिरवायचे. त्यामुळे या दिवसांत भुताखेतांच्या, हडळी आणि चेटकिणींच्या पोषाखाला फार मागणी असते. भुताखेतांचे पोषाख पुरुष घालतात; तर हडळी आणि चेटकिणीच्या पोषाखात महिला मोठ्या दिमाखात वावरताना दिसतात. तसेच भुताटकी असलेली अनेक खेळणी पण बाजारात येतात. पुरुषांच्या काळ्या पोषाखांवर हाडांच्या सापळ्याचे तर चेहेऱ्याच्या जागी मानवी कवटीचे चित्र रंगवलेले असते. तसेच अनेक भयाण मुखवटे म्हणजे मास्क पण मिळतात. महिलांमध्ये चेटकिणींचा पोषाख फार प्रसिद्ध आहे. या काळात तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये गेले तरी चेटकिणीच्या वेषातील दोन-चार महिला कर्मचारी तरी दिसतात. अनेक महिला तर चेटकिणीच्या पोषाखाबरोबरच मेकअप करून आपला चेहेरा मोठ्या हौसेने भयाण, विद्रूप किंवा कुरूप करून घेत असतात. यात आबालवृद्धांसह सगळेच हौसेने सामील होत असतात. हॅलोविनच्या दिवशी संध्याकाळी बच्चे मंडळी भुताखेतांचे आणि चेटकिणींच्या वेषांत घरोघरी जाऊन "ट्रिक ऑर ट्रिट?', असे म्हणतात आणि "ट्रिट' म्हणत या मुलांना खाऊ द्यावा लागतो. काही वर्षांपूर्वी मी हॅलोविनच्या दिवशी एका "सीनियर सिटिझन होम' म्हणजे वृद्धाश्रमात गेलो होतो. तेथे ऐंशी वर्षांच्या एक आजीबाई चेटकिणीचा पोषाख घालून रुबाबात व्हीलचेअरवर बसून सगळीकडे फिरत होत्या, तर अनेक आजोबा भुतांच्या पोषाखांमध्ये वावरत होते. गोष्टींत ऐकलेल्या अनेक बाबी येथे या स्वरुपात का होईना पाहून माझ्या बालविश्‍वाची मला पुन्हा सफरच घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com