रात्रीच्या अंधारात अनोळखी बेटावर

उल्हास हरी जोशी
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

बंडखोरांविषयी पुरेशी माहिती नव्हती. धावपट्टी कमी लांबीची. विमानतळ अनोळखी. अशा स्थितीत रात्रीच्या अंधारात धावपट्टीवरचे दिवे न लावताच विमान उतरवायचे होते. ते धाडस केले आणि "ऑपरेशन कॅक्‍टस' फत्ते झाले.

बंडखोरांविषयी पुरेशी माहिती नव्हती. धावपट्टी कमी लांबीची. विमानतळ अनोळखी. अशा स्थितीत रात्रीच्या अंधारात धावपट्टीवरचे दिवे न लावताच विमान उतरवायचे होते. ते धाडस केले आणि "ऑपरेशन कॅक्‍टस' फत्ते झाले.

परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिवांना तीन नोव्हेंबर 1988 रोजी मालदीवहून दूरध्वनी आला. बंडखोरांनी मालदीववर हल्ला केला असून, राष्ट्राध्यक्ष मॉमून अब्दुल गय्युम भूमिगत झाले आहेत. बंडखोरांशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला भारताची लष्करी मदत हवी आहे, अशी याचना करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी लगेच निर्णय घेतला आणि नौदल, लष्कर व वायुदल यांना ताबडतोब सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले. या जवानांचे नेतृत्व ब्रिगेडियर फारुख बलसारा आणि कर्नल सुभाष जोशी यांच्याकडे होते. दोन हजार किलोमीटर पार करून सैनिकांना मालदीवला पोचवण्याची जबाबदारी वायुदलावर होती.

आग्रा येथील भारतीय वायुदलाच्या 44 व्या स्क्वॉड्रनला तयार राहण्याचे आदेश देण्यात आले. या स्क्वाड्रनचे कमांडर ग्रुप कॅप्टन अनंत बेवूर होते. या स्क्वाड्रनकडे आय एल 76 एस विमाने होती. त्या वेळी भारतीय वायुदलाकडे ही वाहतूक विमाने होती. "गजराज' ही चार जेट इंजिने असलेली रशियन बनावटीची अवाढव्य विमाने होती. सकाळी दहा वाजेपर्यंत ही सर्व विमाने उड्डाणासाठी सज्ज झाली. पन्नासाव्या स्वतंत्र पॅराशूट ब्रिगेडमधील सहा पॅरा रेजिमेंट दुपारी बारापर्यंत तयार झाली. मालेजवळील हुलहुले येथील विमानतळावर उतरायचे होते. हा विमानतळ मालेजवळील एका छोट्या बेटावर होता. धावपट्टी फक्त 6800 फूट लांब. दुपारी साडेतीन वाजता लष्कराच्या मुख्यालयातील युद्धतज्ज्ञांचा एक गट या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आला.

त्यादिवशी सायंकाळी सहा वाजता "ऑपरेशन कॅक्‍टस' सुरू झाले. ग्रुप कॅप्टन अनंत बेवूर यांच्या नेतृत्त्वाखाली, दोन आयएल 76 विमानांनी चारशे कमांडोंसह आग्रा विमानतळावरून उड्डाण केले. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) सांगण्यात आले की, एकच विमान आग्र्याहून तिरुअनंतपुरमला चालले असून ती नेहमीची "रुटीन कार्गो फ्लाइट' आहे. दुसऱ्या विमानाने कॅप्टन बेवूर यांच्या विमानाच्या मागे एक किलोमीटर अंतर ठेवून यायचे आणि संपूर्णपणे रेडियो सायलन्स ठेवायचा, असे ठरले. के 2878 आणि के 2999 ही भारतीय वायुदलाची दोन विमाने जेव्हा तिरुअनंतपुरम विमान तळावरून 37 हजार फूट उंचीवरून निघून गेली, तेव्हा खळबळ उडाली. जे विमान तिरुअनंतपुरम तळावर उतरणार होते ते विमान कोठेतरी भरकटत जात असल्याचे दिसून आले. मागोमाग माहीत नसलेले विमानही जाते आहे. अखेर एटीसीला खरी माहिती देऊन संपूर्ण गुप्तता पाळण्यास सांगण्यात आले.
हुलहुले विमानतळावरील एटीसीसाठी "हुडिया' हा परवलीचा शब्द होता. बेवूर यांनी विमान हुलहुलेच्याजवळ वीस हजार फुटांवर आणले. एटीसीशी संपर्क साधला आणि संदेश पाठवला, "मी तुमचा मित्र बोलतो आहे.' लगेच उत्तर आले, "हुडिया! हुडिया! हुडिया!'

याचा अर्थ विमानतळ सुरक्षित होता. उतरायला हरकत नव्हती; पण विमानतळ खरोखरच सुरक्षित असेल की बंडखोरांच्या ताब्यात असेल, याविषयी काहीच खात्रीशीर माहिती नव्हती. ज्या एटीसीने उत्तर दिले होते, त्याच्यामागे कोणी बंडखोर पिस्तूल घेऊन उभा तर नसेल? ठाऊक नव्हते. रनवेवरचे दिवे लागले दहा सेकंदांसाठी. एटीसी रनवेवरचे दिवे चालू ठेवून बंडखोरांना सावध करू इच्छित नव्हता. विमानात बसवलेल्या ग्राउंड मॅपिंग रडारवर जोरात एको ऐकू येत होता. याचे कारण बेटाच्या आसपासचा समुद्र उथळ असून प्रवाळांनी (कोरल्स) भरलेला होता. हे कोरल्स बरेच अणकुचीदार असतात. रात्रीच्या अंधारात जर कमांडोजना "ड्रॉप' केले तर ते समुद्रात पडण्याची आणि त्यांना जखमा होण्याची दाट शक्‍यता होती. बंडखोरांकडून हल्ला होण्याचाही धोका होताच. आता काय करायचे याचा निर्णय घेण्याची जबाबदारी ग्रुप कॅप्टन बेवूर यांच्यावर होती.

रात्रीच्या अंधारात विमान लॅंड करायचा निर्णय बेवूर यांनी घेतला. हा निर्णय अत्यंत धाडसी होता. कारण, रात्रीच्या वेळी अनोळखी विमानतळावर रनवेवरील दिव्यांशिवाय लॅंडिंग करणे आणखी कठीण असते. तसेच हे बेट फारच छोटे असल्यामुळे अचूक लॅंडिंग होणे आवश्‍यक होते. नाहीतर विमान सरळ समुद्रात जाऊन कोसळण्याची शक्‍यता होती. त्या रात्री आकाशात चंद्रही नव्हता. विषुववृत्तावरून येणारे वारेही जोराचे होते. या सगळ्या गोष्टी विरोधात असतानाही बेवूर यांनी लॅंडिंगचा निर्णय घेतला.

दहा सेकंदांसाठी रनवेवरचे दिवे उजळले होते, तेवढ्यात बेवूर यांनी त्यांचे विमान रनवेच्या दिशेत आणले होते. त्यांनी विमानाच्या दोन अंबर लाइटच्या साहाय्याने विमान उतरवायला सुरवात केली. बेवूर यांचे विमान दीडशे फूट उंचीवर आले असताना त्यांनी रनवेचे दिवे लावायला सांगितले. त्यांच्या विमानाची चाके जमिनीवर टेकताच दिवे बंद झाले. लगेच विमानाच्या चारही इंजिनला "रिव्हर्स थ्रस्ट' देऊन आणि विमानाच्या ब्रेकवर बसून त्यांनी विमान थांबवले, तेव्हा रनवेचा काही फूट भागच शिल्लक होता. बेवूरांनी लगेच विमान वळवून विमानाची कार्गो डोअर्स आणि रॅम्प उघडून कमांडोजना बाहेर पडायला वाट मोकळी करून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ulhas joshi write article in muktapeeth