देवाचिये दारी

उमा राजंदेकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले.

नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले.

येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो.
सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी' या जागी येशूचा जन्म झाला. इस्रायलचा विसा येथे चालतो. जेरुसलेमपासून अवघे दहा किलोमीटर अंतरावर बेथलेहेम आहे. बस, रेल्वे अथवा टॅक्‍सीने जाता येते. दर्शन सुलभ व्हावे यासाठी 24 डिसेंबरच्या "मध्यरात्रीची प्रार्थना' यासाठीचे आरक्षण संकेतस्थळावरून केले. पण नकारघंटा ऐकू आली. रात्री विनातिकिट प्रवेश मिळू शकतो असे उत्तर आले. आता आम्हाला तेथे जाऊन प्रयत्न करणे आवश्‍यक होते.
डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता देत, अमेरिकेचे इस्रायलमधले दूतावास जेरुसलेमला स्थलांतरित करत असल्याचे घोषित केले. या मुद्द्यावरून अरब आणि जगातील बहुतेक राष्ट्रांमध्ये खळबळ उडाली. मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने आम्हाला परत असुरक्षिततेची जाणीव करून दिली, पण आमचा निर्धार पक्का होता. तेल अविवच्या विमानतळावर सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन आटोपून आम्ही जेरूसलेमला सुरक्षित पोचलो. तेथील वातावरण शांत होते.

आम्ही 24 डिसेंबरला दुपारीच बेथलेहेमकडे प्रयाण केले. साडेचारलाच दिवे लागणीची वेळ झाली होती. रस्त्यात पॅलेस्टाइन सुरक्षा चौकीवर तपासणी झाली नाही, तरी आम्ही आमचे पासपोर्ट तयार ठेवले होते. बेथलेहेममध्ये संध्याकाळी साडेपाचला पोचलो. वाटेत टॅक्‍सी ड्रायव्हरने एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबून दोन अरबी युवतींना "मरहबा' अशी हाक मारून हॉटेलचा पत्ता विचारला. मरहबा म्हणजे "हॅलो'. हॉटेलवर चेक इन केले. हॉटेलच्या मालकाने आमचे कॉफी देऊन स्वागत केले व सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. त्याला भारतीय पदार्थ करता येत होते.
येशूचे जन्मस्थळ आमच्या हॉटेलपासून अंदाजे दोनशे मीटरवर होते. फक्त दहा मिनिटांचे अंतर. आता आमच्या सत्त्वपरीक्षेस सुरवात झाली. निसर्गाने उच्छाद मांडला. एकदम जोरदार पावसास सुरवात झाली. हॉटेलसमोर बंदूकधारी पॅलेस्टाइनी सैनिकांचा कडक पहारा. त्यांच्या गाड्यांचे सायरनसारखे वाजत होते. निसर्गाची अवकृपा अजून वाढायच्या आत आम्ही चर्चला जाऊन दर्शन घ्यायचे ठरवले. दरम्यान पाऊस पण कमी झाला. हॉटेलमालकाने "जा बिनधास्त' सांगितले. छत्री घेऊन आम्ही चर्चच्या दिशेने निघालो. पावसामुळे दगडी रस्ता निसरडा झाला होता. थंडी होतीच. अंधार वाढत होता.

चर्चच्या रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. एक चिनी दांपत्य मुलांसहित चर्चहून परतताना भेटले. तेही आमच्याच हॉटेलवर मुक्कामी होते. पोलिस चर्चभोवती आहेत व आत जाऊ देत नाहीत असे त्यांनी सांगितले. आम्ही आमची वाट सोडली नाही. चिंचोळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अरबांची घरे, दुकाने होती, पण ती हळूहळू बंद होत होती. जागोजागी दिव्यांची सुंदर रोषणाई. चर्चजवळ पोचलो. पाऊस सुरूच होता. चर्चच्या दर्शनी भागासमोर सशस्त्र पोलिस. समोरच एक लोखंडी जाळ्यांचे तात्पुरते कुंपण उभारलेले. या कुंपणाजवळून लोकांना पोलिस पिटाळून लावत होते. चर्चच्या समोरच "मेंजर स्क्वेअर' आहे. तेथे भला मोठ्ठा एलईडी टीव्ही चर्चच्या आतील व बाहेरील सगळी दृष्ये दाखवत होता. ख्रिसमस ट्री चमकत होता. चर्चभोवती विद्युत दिव्यांच्या माळा, लायटिंग केलेले होते. वातावरण एकदम भारावलेले.

आम्ही परत एकदा पोलिसांना विनंती करून पाहिली, पण फायदा झाला नाही. शेवटी जवळच्याच बेथलेहेम पीस सेंटरच्या आश्रयाला थांबलो. दरम्यान पाऊस आणि वारा कमी झाला होता. आता मात्र आमचा धीर सुटला होता. दरम्यान आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थोडे खाऊन घेतले. कॉफी घेतली. थोडा आराम केला. रात्र वाढत होती आणि भीतीही. रात्रीचे साडेदहा वाजले होते. आता आम्ही परत लोखंडी जाळ्यांपाशी गेलो. परिस्थिती थोडी शांत झाली होती. "मिडनाइट मास'ची मंडळी एव्हाना तिकीट दाखवून चर्चमध्ये गेली होती. पोलिसही बदलले होते. आम्हाला एक इंग्रजी बोलणारा पोलिस सापडला. त्याला आम्ही विनवणी केली. कपाळीचे कुंकू पाहून तो म्हणाला, "यू इंडियन?'' आम्ही "हो' म्हणताच तो भारावला. तो बंगळूरला कमांडोजचे प्रशिक्षण घेऊन आला होता. त्याच्याशी आम्ही दोस्ती केली. थोड्या वेळाने तो आम्हाला चर्चच्या आत प्रवेश देण्यास तयार झाला. लोखंडी जाळी बाजूला झाली. धावतच आम्ही चर्चच्या दाराशी गेलो. आत परत पोलिसांनी सुरक्षा तपासणी केली. आम्ही आत गेलो. "मिडनाइट मास'ची मंडळी चर्चच्या बाजूच्या हॉलमध्ये बसली होती. त्यामुळे येशूच्या जन्मस्थळापाशी काहीच गर्दी नव्हती. चर्चच्या डाव्या बाजूने खाली एका गुहेत येशूचे जन्मस्थळ आहे. सरळ तेथेच गेलो. अपेक्षेपेक्षा गर्दी फारच कमी होती. पायऱ्या उतरून आत जात होतो. पायऱ्यांवर दोन्ही बाजूस अनेक सिस्टर्स बसल्या होत्या. त्या मंजुळ स्वरात हिब्रू भाषेत येशूच्या प्रार्थना म्हणत होत्या. हळूहळू आम्ही जन्मस्थळापाशी पोचलो. साक्षात परमेश्‍वराचे दर्शन झाले. माथे टेकून नमस्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uma rajandekar write article in muktapeeth