अतर्क्‍यच सारे!

उमेश उमराणी
शनिवार, 24 डिसेंबर 2016

आपण जाणार हे बाबांना आधीच कळले असेल का? त्यांनी जायचा दिवसही ठरवला असेल का? बाबा गेल्याचे आईला सांगितले नव्हते, तरी तिला ते ठाऊक झाले होते का? ठरवून जावे तसे ते दोघे गेले.
 

ते दोघेही काही तासांच्या अंतराने गेले. सुमारे साठ वर्षे त्यांचा प्रवास एकत्रच चालला होता आणि आता अखेरच्या प्रवासालाही ते दोघे एकत्रच गेले. आमच्यासाठी हे सारे अतर्क्‍यच आहे. माझे वडील नव्वद वर्षांच्या आयुष्यात कधीही खूप काही आजारी पडून अंथरुणावर आहेत असे झाले नाही. सात-आठ वर्षांपूर्वी ते घरीच पडले. खुब्यातील हाड मोडले म्हणून त्यांना रुग्णालयात न्यावे लागले आणि पायावर शस्त्रक्रिया करावी लागली; पण त्यानंतरही ते स्वतः एकटे काठीच्या आधाराने किंवा कधी कधी तर घरात काठीशिवायही चालायचे. शेवटपर्यंत त्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार असे कोणतेही आजार नव्हते. दादा खूपच बोलके होते. त्यांचे पहिल्या भेटीतच कुणाशीही जमायचे. त्यांना मित्रांमध्ये राहायला, गप्पा मारायला फार आवडायचे. 

गप्पांच्या मैफली रंगवणारे दादा शेवटचे चार-पाच दिवस वेगळेच काही बोलू लागले होते. जाण्याच्या अगदी आदल्याच दिवशीची गोष्ट. माझे काका त्यांना भेटायला आले होते, तेव्हा ते काकांना म्हणाले, ""बास झाले, आता कंटाळा आला.'' त्या आधी माझी मुलगी पल्लवी मुंबईला जायला निघाली, तेव्हा तिला म्हणाले, ""अगं नको जाऊस, नाहीतर आपली भेट नाही होणार.'' चार दिवस आधीच माझा चुलत भाऊ आला होता, त्याला म्हणाले, ""मी आता फक्त चार दिवस आहे.'' माझ्या धाकट्या भावाच्या पत्नीला, क्षितिजाला फोन करून म्हणाले, ""मी फक्त चारच दिवस आहे. तू दररोज घरी मला भेटायला ये.'' 
ते गेले, त्याच्या आदल्या दिवशी सकाळी वरच्या मजल्यावरून खाली आले. सोफ्यावर बसले. एका प्लास्टिकच्या पिशवीत कपडे होते. मी विचारले, ""इतक्‍या सकाळी कोठे चाललात?'' तर म्हणाले, ""तिकडे वडगाव तळेगावला एक वृद्धाश्रम आहे, तिकडे चाललो. मी त्या वृद्धाश्रमाच्या संस्थापक सदस्यांपैकी आहे. माझे तेथील मित्र मला सारखे बोलवत आहेत.'' त्यांना भ्रम झाला होता म्हणायचे, का मृत्यूची चाहूल लागली होती म्हणायचे? माझ्या आईला ते आधीपासून म्हणत की, "मी तुझ्या आधीच जाणार' आणि खरोखरच ते माझ्या आईच्या आधी गेले. माझ्या आईने आदल्याच महिन्यात वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली होती. तशी आईची तब्येत तोळा-मासाच होती; पण तीही शेवटपर्यंत हो- नाही इतपत बोलत होती. तिने साठ वर्षांचा संसार अतिशय काटकसरीने नेटकेपणाने केला. घराचे घरपण, पाहुण्यांचे आगत-स्वागत, मुलांचे शिक्षण, संस्कार, आजारपण या सर्व आघाड्या तिने अतिशय कुशलतेने हाताळल्या होत्या. आई- वडिलांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते; पण ते थोडेसे तुझे नि माझे जुळेना नि तुझ्यावाचून करमेना असेही होते. दोघेही सगळीकडे बरोबरीने जात-येत असत. दादांचा स्वभाव आक्रमक होता, तर आई थोडीशी मवाळ पण हट्टी होती. 

आई पोटाच्या आजाराने पंधरा दिवस रुग्णालयात होती. डॉक्‍टरांच्या उपचारांना यश येत नव्हते. शेवटी ती दररोज मला, माझ्या बायकोला "घरी घेऊन चल' म्हणायची. तिला घरी आणल्यावर ती जरा शांत झाल्यासारखी वाटत होती. तिच्या हालचाली खूपच सीमित झाल्या होत्या. वडिलांची तब्येत दहा ऑगस्टला संध्याकाळी सहाच्या सुमारास बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवले; पण उपचार सुरू होण्यापूर्वीच ते गेले. आमची गडबड आई फक्त मान हलवून डोळ्यांनी बघत असावी. पण, वडिलांवर उपचार करण्यात आमचे तिच्याकडे लक्षच नव्हते. वडिलांची पुढील तयारी चालू होती.

हळूहळू लोक येत होते. वरच्या खोलीत आईला भेटत होते. वडील गेल्याचे आम्ही आईला सांगितले नाही व नातेवाइकांनाही न सांगण्याबद्दल सांगत होतो. संध्याकाळी माझ्या पत्नीने तिला साबुदाणा खीर भरवली, औषधे दिली. ती तिने व्यवस्थित घेतली. रात्री साडेआठला तिने माझी मुलगी पायलला शेजारी बसवले आणि म्हणाली, ""आम्ही दोघे बरोबरच चाललो.'' रात्री पावणेअकराला भाऊ सांगत आला. ""अरे आई बघ कसे करतीय.'' मी वर तिच्या खोलीत गेलो. जवळ बसून तिच्याशी बोललो. माझ्याकडून थोडे पाणी प्यायली आणि शांत झाली. वडील गेल्याचे आईला कळले होते का? "आम्ही दोघे बरोबर चाललो' असे ती का म्हणाली? तिलाही स्वतःचा मृत्यू दिसला होता का? अजून एक धक्का पुढे बसला. ज्या विद्युत दाहिनीत वडिलांना अखेरचा निरोप दिला, त्याच विद्युत दाहिनीत आईचे क्रियाकर्म झाले. 
वडील तिथे तिची वाट पाहात थांबले होते का! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown all

टॅग्स