'नो'चा अर्थ 'नो'

वैशाली धनंजय पंडित
शनिवार, 18 मार्च 2017

रावणाच्या लंकेला भेट द्यायला अचानक निमित्त मिळाले. रावणाला स्त्रीच्या नकाराचा अर्थ पाच हजार वर्षांपूर्वी कळला होता, आधुनिक समाजाला तो कधी कळणार?

रावणाच्या लंकेला भेट द्यायला अचानक निमित्त मिळाले. रावणाला स्त्रीच्या नकाराचा अर्थ पाच हजार वर्षांपूर्वी कळला होता, आधुनिक समाजाला तो कधी कळणार?

भारताचा दक्षिणेकडील शेजारी श्रीलंका. श्रीलंकेची प्रथम ओळख लंका अशी लहानपणी रामायणातून झालेली. अशी लंका बघण्याची उत्सुकता होती. तो योग आला एका वाढदिवसाच्या निमित्ताने. वाढदिवस होता डॉ. रणजित गलपत्ती यांचा. माझा नवरा आणि डॉ. रणजित यांनी काही प्रोजेक्‍ट्‌सवर बरोबर काम केलेले होते, त्यामुळे डॉ. रणजित आणि डॉ. जानकी या श्रीलंकन दांपत्याशी ओळख झाली होती. वयात जरी फरक असला तरी आमचे व्यवस्थित जमते. दोघेही पुण्यात आमच्या घरी येऊन गेलेले. आता डॉ. रणजित यांच्या सत्तराव्या वाढदिवसाचे खास आमंत्रण आल्याने आम्ही गेलो होतो.

कोलंबो विमानतळावर बहुतेक श्रीलंकन हिंदी मालिका बघण्यात व्यग्र होते. तिथे लोक हिंदी चित्रपटही बऱ्यापैकी बघतात.

दोन दिवस वाढदिवसाचा कार्यक्रम क्‍लब पाम बे माराविला येथे होता. ही जागा कोलंबोपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. बस केलेली होती. आम्ही साठ जण त्या बसमधून माराविला येथे जाण्यास निघालो. बसमध्ये आम्ही सगळे वेगवेगळ्या देशांतून आलेलो - इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, डेन्मार्क, फ्रान्स आणि भारत.
क्‍लब पाम बेला आम्ही चार वाजता पोचल्यावर वाजंत्री वाजवून पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले. सगळे तयार होऊन सायंकाळी सहा वाजता चहा पार्टीला हजर होते. तेव्हा सगळ्यांच्या ओळखी झाल्या. क्‍लब पाम बेचा परिसर खूप मोठा आहे. विशेष म्हणजे खूप स्वच्छता. पूर्ण देशच खूप स्वच्छ. ही जागा समुद्राला लागून आहे. आत लगून, स्वीमिंग पूल, प्ले एरिया आहे.

डॉ. रणजित स्वतः गाणी लिहितात व गिटार वाजवतात. रात्री त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. त्यांनी स्वतः गिटार वाजवत इंग्लिश व सिंहलीमध्ये गाणी गायली.
दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही व्हेल्स बघायला गेलो. बोटीच्या आजूबाजूने नाचत चाललेले व्हेल्स बघणे खूपच सुखद अनुभव होता. अर्थात तीन तास बोटीतून समुद्रात फिरणे फारसं आरामदायक नव्हतं; पण व्हेल्स बघून त्या त्रासाचं सार्थक झालं. रात्री परत सगळे आठ वाजता जमले. डीजे कार्यक्रम होता. सगळ्यांनी नाच करत बारा वाजेपर्यंत धमाल केली. बारा वाजता बर्थ डे बॉयने केक कापला.

त्यानंतर दोन दिवस आम्ही कोलंबोत राहिलो. एका गेस्ट हाउसवर. हे गेस्ट हाउस ज्या बाईंच्या मालकीचे होते, त्या खूपच अगत्यशील. तेथे आम्ही अगदी घरच्यासारखे राहिलो. भारतात फक्त पिवळ्या रंगाच्या रिक्षा दिसतात. श्रीलंकेत मात्र हिरव्या, लाल, पांढऱ्या, पिवळ्या व काळ्या रंगाच्या रिक्षा दिसतात. स्थानिक लोक रिक्षाला "टुकटुक' म्हणतात. श्रीलंकेला स्वातंत्र्य 1948 मध्ये मिळाले. ब्रिटिश काळातील बऱ्याच इमारती आणि किल्ले येथे बघायला मिळतात.

आपल्याला माहीत असलेले लंका-भारताचे संबंध रामायणापासूनचे. मी नाशिकची. नाशिक हे नावच मुळी पडले ते रामायणातील एका घटनेमुळे. (लक्ष्मणाने शूपर्णिकेचे नाक कापले, ती ही जागा. नाकाला संस्कृतमध्ये "नासिका' म्हणतात.) लहानपणापासून रावणाबद्दल खूप ऐकलेले व वाचलेले. पंचवटी, सीतागुंफा, काळा राम, गोरा राम बघत व रावणाचा द्वेष करतच मोठे झालो; पण खरंच रावण एवढा वाईट होता का? तो धार्मिक होता. शिवभक्त होता. तो शक्तिशाली व हुशार होता. तो वीणा वाजवत असे. सीता एक वर्ष अशोकवनात कैदेत होती. रावण तिला लग्नासाठी विचारत होता; पण सीतेने त्याला प्रत्येक वेळी नकार दिला. रावणानेही कधी जबरदस्ती केली नाही.

आजकाल तर आपण रोजच वर्तमानपत्रात वाचत असतो, की कलियुगातील राक्षस कसे तिचा उपभोग घेऊन तिला संपवतात. ते बहुतेक तिचे जवळचे मित्र, नातेवाईकच असतात. तिने विश्‍वास तरी कोणावर ठेवायचा? मुलींची प्रगती झाली. त्यांचे विचार प्रगल्भ झाले; पण अजून आपल्या समाजाची मानसिकता बदलली नाही. त्यांचे विचार प्रगल्भ झाले नाहीत म्हणून अशा घटना घडतात. घटना घडल्यानंतर लोक आपापल्या परीने त्याचा फायदा करून घेतात. काही दिवस त्यावर चर्चा होतात. सगळे आपापली मते मांडतात. तीन-चार महिने गेले की परत असेच काहीतरी वाचण्यात येते. हिंजवडीतील आयटीमध्ये काम करणाऱ्या मुलीला का जीव गमवावा लागला? तिचे स्वप्न, तिच्या आईवडिलांचे स्वप्न सगळे क्षणात धुळीला मिळाले.

रामायणातील रावणाचा पुतळा आपण जाळतो; पण रावणाला "नो'चा अर्थ "नो' हे माहीत होते. म्हणून सीता एक वर्ष त्याच्या बंदिवासात असूनही सुरक्षित राहिली. स्त्रीच्या होकार-नकाराची किंमत त्याला माहीत होती. स्त्रीचे प्रेम मिळवणे आणि स्त्रीला ओरबाडणे यातील फरक त्याला माहीत होता. त्याला प्रेमासहीत सीता हवी होती. जे आपल्यालेखी राक्षस असलेल्याला पाच हजार वर्षांपूर्वी कळले, ते आधुनिक समाजाला कधी कळणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaishali pandit write article in muktapeeth