भारी चिव चिव

वासंती सिधये
बुधवार, 20 मार्च 2019

आज जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांना आपल्या विश्वातून गमावून चालणार नाही हे स्वतःलाच बजावण्याचा दिवस.

आज जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांना आपल्या विश्वातून गमावून चालणार नाही हे स्वतःलाच बजावण्याचा दिवस.

"एक बाई चिमणी, भारी चिव चिव'... गात गात मोठे झालो आपण. चिमणीचं घर होतं मेणाचं, ही गोष्ट म्हणे बाराव्या शतकात चक्रधरस्वामींनी धानाई या छोटीला ऐकवली आणि आमच्या नातवंडांनाही आम्ही ती ऐकवतो. चिऊ-काऊचा घास घेत-देत आमची आणि आमच्या मुला-नातवंडांची पिढी मोठी झाली. आता मात्र मुलांना खिडकीबाहेरच्या चिमण्या साद घालत नाहीत. त्यांना कार्टून हवी असतात. कार्टून पाहिल्याशिवाय आपला बाळ्या किंवा बाळी जेवतच नाहीत असे आयाही कौतुकाने सांगतात. आमच्या घरांच्या वळचणीला चिमण्या घरटी बांधत. कधी कधी चिमणीचे पिलू खाली पडे. आम्ही भावंडे अंगणातल्या झाडाखाली खड्डा खणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत होतो. शुक्रवार पेठेतल्या आमच्या सोसायटीत विहिरीच्या काठावर कडुनिंबाचे झाड होते. झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चाले. जुने झालेले झाड पडले. चिमण्याही दिसेनाशा झाल्या. पुढे मी कांचन गल्लीत राहायला आले, येथे झाडे आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, पण चिमणीची चिव चिव क्वचितच ऐकू येते.

मध्यंतरी आम्ही नाशिकला बदली होऊन गेलो होतो. आम्ही पंचवटी पांजरपोळजवळ राहत होतो. आमची इमारत जुनी असल्यामुळे खिडक्‍या खूप मोठ्या होत्या. मी खिडकीत एक आरसा ठेवला होता. दोन चिमण्या सकाळपासून आरशावर टक- टक करीत बसत. आपल्याच प्रेमात त्या होत्या. मलाच वाटू लागले, यांना खायचे-प्यायचे भान आहे की नाही. मी थोडा वेळ आरसा उलटा करून ठेवीत असे. आरसा सुलट केल्यावर दोघी पुन्हा हजर होत. मध्येच आठवडाभर गावाला जाताना मी खिडकीतला आरसा काढून ठेवला होता. आल्यावर पुन्हा आरसा ठेवला, पण माझ्या गैरहजेरीत हिरमसून निघून गेलेल्या चिमण्या परत आल्याच नाहीत.

आपल्या चिमण्याही चारापाण्यासाठी परदेशी दूर जातात. वर्षा-दोन वर्षांनी दहा-पंधरा दिवसांसाठी येतात आणि परत उडून जातात. तेवढीही चिव चिव खूप असते आपल्यासाठी. हवीहवीशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasanti sidhaye write article in muktapeeth