गोष्ट तशी छोटीशीच!

muktapeeth
muktapeeth

एरवी जरा देखील हरायला सुरवात झाली तरी चिडणारी, खेळ विस्कटून टाकणारी माझी नात स्वतःला मुद्दाम हरवून घेत होती तेही आनंदानं... तिच्या या आगळ्या-वेगळ्या बाळलीलांमुळे मनावरचं खिन्नतेचं सावट कधी आणि कुठंच्या कुठं पळालं ते कळलंच नाही.

माझ्या आयुष्यातील खूप घडामोडींचा तो दिवस ठरला. त्या दिवशी काही गमावलं तर बरंच काही कमावलं. त्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी केलेली ऐतिहासिक घोषणा बरीच उलथापालथ करून गेली. अचानकपणे आर्थिक व्यवहारातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली गेली. एरवी देवघरात तेवत असलेल्या नंदादीपासारखी शांत असलेली संध्याकाळ दूरचित्रवाणीवरील बातम्या, चर्चा, व्हॉट्‌सऍपची टिकटिक, दूरध्वनीच्या घंटा यांनी दुमदुमली. त्यातच अचानकपणे एक वाईट बातमी देणारा फोन वाजला. माझ्या शेजारी राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीचे वडील वारले होते. मी आणि माझ्या इतर शेजाऱ्यांनी त्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. एवढा वेळ बाहेर होणाऱ्या गलबलाटाचा इथे मागमूसही नव्हता. एक उदासीन शांतता पसरलेली. रात्र बरीच झाली होती. त्यामुळे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरलं. त्यामुळे आम्ही सर्व थोड्या वेळानं आपापल्या घरी परतलो. मन उदास होतं. तसं पण या वयात मन थोडं हळवंच होतं. त्यातच कोणाचा मृत्यू पाहिला की मनात थोडी भीती पण दाटून येते. आम्ही सर्वच काकांना गेली दहा-बारा वर्षे ओळखत होतो. नव्वद वर्षांच्या काकांना असं निपचित पडलेलं कधी पाहिलंच नव्हतं.

माझ्या खोलीत मी खिन्न मनानं बसले होते. तेवढ्यात तिथं माझ्या चिमुकल्या नातीनं धावत येऊन मला मिठी मारत विचारलं, ""आजी, लुडो खेळूया?'' तिच्या प्रश्‍नाचा अर्थ आणि तिच्या मिठीचा स्पर्श बरंच काही सांगून गेला. शेजारच्या घरात जे काही घडलंय त्यामुळे गप्प झालेल्या आपल्या आजीचे मन वळवण्याची तिची धडपड पाहून मन गहिवरलं. आजीला नेहमी नातीबरोबर बैठे खेळ खेळायला आवडतात आणि आता ती माझ्याबरोबर खेळली तर तिला बरं वाटेल एवढंच तिच्या बाळमनाला कळत होतं. आज माझी नात माझी आजी झाली होती आणि मी तिची नात. एरवी जरा देखील हरायला सुरवात झाली तरी चिडणारी, खेळ विस्कटून टाकणारी माझी नात स्वतःला मुद्दाम हरवून घेत होती तेही आनंदानं... तिच्या या आगळ्या-वेगळ्या बाळलीलांमुळे मनावरचं खिन्नतेचं सावट कधी आणि कुठंच्या कुठं पळालं ते कळलंच नाही. आजी नातीचा खेळ अगदी रंगात आला आणि अचानक तिनं मला विचारलं, ""आजी, कोणालाही मृत्यू का येतो?'' तिच्या या अकस्मात प्रश्‍नानं मी क्षणभर स्तब्धच झाले. तिला काय आणि कसं समजवावं कळेना. शेवटी मानवाच्या जीवनचक्राबद्दल तिच्या बाळमनाला समजेल उमजेल असं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर ती म्हणाली, ""ते मला काही ठाऊक नाही. पण, मला मात्र तू, आजू, दिदा-दादू (तिच्या वडिलांचे आईवडील) मला नेहमीच माझ्याबरोबर राहायला हवे आहात.'' तिची इच्छा म्हणजे तिची आज्ञाच, असा सूर होता. ""तुम्ही सगळे मला खूप खूप म्हणजे हंड्रेड इयरस्‌ जगायला हवे आहात.'' माझ्याही नकळत माझ्या ओठावर हसू फुटलं. मी तिला परत एकदा समजवायचा प्रयत्न केला. ""बेटा आम्ही जर खूप वर्षे जगलो तर वयाप्रमाणे आम्हाला काही त्रास सुरू होतील. ज्याचा त्रास तुला आणि तुझ्या आई-बाबांना होईल.'' माझी नात मनकवडीच जणू, ""आय डोंट केअर, तुमच्या तोंडात एक पण दात नाही राहिला, तुझ्या चेहऱ्यावर कितीही सुरकुत्या आल्या तरी मला नाही काही फरक पडत.''

""अग, पण तेव्हा आमची काळजी कोण घेणार? आमच्या दैनंदिन कामासाठी सुद्धा आम्हाला कोणाची तरी मदत लागेल.''
""मी असेन ना'' तिच्याकडे उत्तरं तयारच होती. ""अगं आजी तोपर्यंत मी मोठी होऊन खूप खूप पैसे कमवीन. मग आपण तुम्हाला मदत करण्यासाठी माणसे ठेवू. तुम्ही फक्त बसून मजा करायची.''

आता मात्र माझ्या ओठावरचे हसू जाऊन डोळ्यातून आसवं गळत होती. एका प्रसिद्ध नाटकात लेखकानं संवादातून खूप सुंदर विचार मांडलेले मला आठवले. ""आई-वडिलांच्या वृद्धापकाळी त्यांना केवळ तुमचा पैसा नाही, तर तुमचा वेळ द्या. त्यांना केवळ डॉक्‍टरांचा स्पर्श नाही, तर तुमच्या हाताचा पण स्पर्श होऊ द्या, जो स्पर्श त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी औषधापेक्षाही जास्त लाखमोलाचा ठरेल.'' एवढ्या मोठ्या लेखकाने सांगितलेले तत्त्वज्ञान या चिमुरडीनं किती निरागसपणे मांडलं होतं. तिनं मारलेली मिठी "मी असेन ना' या आश्‍वासक शब्दांपेक्षाही व्यक्त होत होती.
गोष्ट तशी छोटीशीच, पण लाख मोलाची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com