तिचाकीवर उतारवयात

वीणा विद्वांस
शनिवार, 24 मार्च 2018

वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता "अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकीवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले.

वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता "अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकीवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले.

साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षी मुले तिचाकी सायकल चालवतात. आमच्या वेळी महाविद्यालयात गेल्यावर सायकल मिळत असे; परंतु त्या वेळी पुण्यात सायकल चालवायला खूप मजा येत असे. मैत्रिणीबरोबर हिराबाग, लक्ष्मी रस्ता सर्वत्र बिनदिक्कत भटकत असू. तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता "अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकी सायकलवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले. मॅनहटन बघण्यासाठी जगभरातून प्रवासी येत असतात. न्यूयॉर्कचा हा भाग मस्त दुकानांनी वेढलेला, माणसांची भरपूर वर्दळ असलेला हा रस्ता आहे. मुंबईसारखे पायी चालणारे लोक इथे भरपूर आहेत. त्यामुळे रुंद पदपथ गजबजलेले असतात.

बहीण जयू गोखले व मेहुणा (आतेभाऊ) अतुल गोखले यांच्याकडे पंधरा दिवस राहायला गेले. हे मॅनहटनच्या पलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजूला, "रुझवेल्ट आयलंड' प्रदेशात राहतात. त्यांनी मला मॅनहटन दाखवायचे ठरवले. जे सर्वजण पायी चालत बघतात. मला पायदुखीचा त्रास आहे, हे माहीत असूनही हिंडायचे ठरले. मी आधीच पायदुखीची गोळी घेऊन टाकावी वगैरे बेत करत होते; तर अतुलने मला धक्का दिला. म्हणाला, ""तुला तिचाकी सायकलवर बसून मॅनहटन बघणे शक्‍य आहे.'' मी म्हटले, ""शक्‍य नाही, काहीतरी काय, मला शक्‍य नाही.'' खूप आढेवेढे घेतले; पण त्याने चंगच बांधला होता. सर्व चौकशी करून तिचाकी सायकल शोधून ठेवली होती. तिचे नाव "मोबिलिटी'. ती बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केली की बारा तास चालते. हॅंडलला आडवा रॉड होता. तो आपल्याकडे ओढला की सायकल चालू व सोडून दिला की आपोआप थांबायची. एवढे सोपे. पॅंडल नव्हतेच.

एक दिवस अतुलने डिकीत घालून भाड्याची "मोबिलिटी' आणली. रुझवेल्ट आयलंडवर मोकळे रस्ते भरपूर असल्यामुळे सराव सुरू झाला. फक्त बहिणीच्या सतराव्या मजल्यावरून लिफ्टने खाली आणायचा खटाटोप झाला. चौथ्या दिवशी पुरेसा सराव झाल्यामुळे मॅनहटन, मग सेंट्रल पार्क असे ठरले. मॅनहटनच्या रुंद पदपथावर माझी मोबिलिटी विराजमान झाली. सराव झाल्यामुळे मी तिच्या प्रेमात पडले होते. मी चक्क तिचाकीवर (तेवढी एकच होती अख्या गर्दीत) बसून हिंडू लागले. बहीण झरझर चालते. ती शेजारी पायी चालत होती. आम्ही मनसोक्त भटकंती करू लागलो. गर्दीतून वाट काढणे हा आपला पुणेकरांचा हातचा मळ. त्या दिवशी रविवार असल्यामुळे पर्यटकांची, चालणाऱ्यांची भरपूर गर्दी होती.

एक सण होता म्हणून रस्त्यावरून मिरवणुका चालू होत्या. काही रस्ते पोलिसांनी बंद केले होते. आम्हाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचे होते. पण ज्येष्ठ नागरिक (म्हातारी) म्हणून पोलिसांनी चक्क पलीकडे जाऊ दिले. तिथे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंग सर्वांना हा मान दिला जातो. बहिणीने पोलिसांना विनंती केल्यावर लगेच जायला मिळाले. जवळजवळ दीड तास मोबिलिटीवरून मॅनहॅटन पालथे घातले. त्याला बारीकशी घंटाही होती; पण ती ऐकायची सवय नसल्यामुळे गर्दीत कुणाला ऐकू येत नव्हती. पाय अजिबात दुखले नाहीत. दुसऱ्या दिवशी प्रचंड पसरलेला सेंट्रल पार्कही असेच मनसोक्त हिंडलो. अर्थातच पाय शाबूत. आहे की नाही मोबिलिटीची जादू.

माझ्या मनात आले, आपल्याकडील ज्येष्ठ नागरिकांना असे हिंडायला मिळाले तर, असे रुंद व खडबडीत नसणारे पदपथ पुण्यात असते तर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veena vidwans write article in muktapeeth