शिक्षकांची सद्‌भावना

विद्याधर अनास्कर
शनिवार, 31 मार्च 2018

.. तेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण समजून घेतलेले नसते. तेव्हा त्याच्याविषयी मनात अढीच बसलेली असते म्हणा ना! मग कधीतरी गैरसमज दूर होतात आणि आता नवा प्रकाश उमलतो.

.. तेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण समजून घेतलेले नसते. तेव्हा त्याच्याविषयी मनात अढीच बसलेली असते म्हणा ना! मग कधीतरी गैरसमज दूर होतात आणि आता नवा प्रकाश उमलतो.

माझे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे झाले. इयत्ता आठवीत असताना इतिहास हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला दि. दा. जोशी नावाचे शिक्षक होते. शाळेत ते "दि. दा.' या नावानेच प्रसिद्ध होते. अत्यंत विद्यार्थिप्रिय असणारे हे शिक्षक; पण त्यावेळच्या त्यांच्या वागण्याचा हेतू न कळल्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे त्यांच्याबद्दल माझ्या मनात अढी होती. शाळेमध्ये "दि. दा.' सर माझ्यावर अन्याय करीत होते, ही त्या वेळी झालेली जखम घेऊन मी आजपर्यंत वावरत होतो. गैरसमज माणसाची दृष्टीच बिघडवतो, असे म्हणतात ते खरेच आहे. इयत्ता आठवीत तयार झालेल्या माझ्या मनातील अढीमागील कारणांचा शोध मी तेव्हापासून आतापर्यंत घेण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटत होते, नव्हे माझी खात्रीच होती की, मी खेडेगावातून आलो म्हणून सर माझ्याशी असे वागत होते. किंवा परिस्थितीने मी गरीब होतो म्हणूनही असेल. अथवा मी सावळा होतो म्हणून असेल. सर माझ्यावर अन्याय करीत होते, हे नक्की.

वास्तविक, "दि. दा.' म्हणजे हाडाचे शिक्षक. इतिहास विषय शिकवताना इतिहासातील प्रसंग ते डोळ्यांसमोर हुबेहूब उभे करत. "बचेंगे तो और भी लढेंगे' हा मराठ्यांचे सरदार दत्ताजी शिंदेंचा धडा शिकवताना त्यांचा आवेश आजही डोळ्यांसमोरून जात नाही. "दि. दा. सर' जसा इतिहास विषय शिकवायचे, तसेच ते चित्रकलाही शिकवायचे. डावखुरे असलेले सर चित्रकलेच्या तासाला डावखुऱ्या हाताने एका झटक्‍यात फळ्यावर भले मोठे वर्तुळ काढायचे. वर्तुळाचे शेवटचे टोक आरंभ टोकाला जुळल्यानंतर त्यांनी वर्गाकडे टाकलेला कटाक्ष व सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना दिलेली दाद आजही नजरेसमोर येते. या सर्वांमुळे सर मलाही खूप आवडायचे. त्यांच्याशी बोलावेसे वाटायचे. त्यांनी स्थापन केलेल्या सुभाष पथकात जावेसे वाटायचे; परंतु केवळ ते माझ्यावर अन्याय करतात, या माझ्या समजामुळे मी हे सर्व करू शकलो नाही.
आज इतक्‍या वर्षांनी सरांच्या त्यावेळच्या वागण्यामागील सद्‌भावना समजल्यावर माझी मलाच लाज वाटली. सरांच्या कृतीचा किती चुकीचा अर्थ लावून सर माझ्यावर अन्याय करतात, असे समजत होतो मी.

गोष्ट अशी आहे... वर्गात उशिरा येणाऱ्या, दंगा करणाऱ्या, गृहपाठ न करणाऱ्या, थोडक्‍यात सांगायचे तर शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर समोरच्या बाजूला शहाबादी फरशीवर कोलांटी उडी घ्यायला सांगायचे. अशी उडी घेताना मुलांनी पूर्ण वर जाऊन उडी घेणे अपेक्षित असायचे. त्यामुळे पाठ फरशीवर जोरात आपटायची व पाठीला चांगलाच दणका बसायचा. माझ्यावर अशी शिक्षा करण्याची वेळ आली तर सर नेहमी मला शर्ट काढायला सांगायचे. उघड्या पाठीवर बसलेला दणका जोरात बसायचा. मला कळत नव्हते की, सर इतरांना शर्ट काढायला सांगत नाहीत व मलाच का शर्ट काढायला सांगतात? मी खेड्यातून आलेला गरीब व सावळा आहे, हेच त्याचे कारण असणार, हे माझ्या मनाने पक्के हेरले होते.

सरांच्या माझ्याशी असे वागण्याचे कोडे मला शालेय जीवनात कधीच सुटले नाही. नंतर जेव्हा जेव्हा शालेय जीवनाचा विषय निघायचा, तेव्हा-तेव्हा मी हा किस्सा सर्वांना सांगायचो. आमच्या मित्रांमध्येही त्यावर चर्चा व्हायची. मध्यंतरी सकाळी फिरायला गेलो असताना सर मला भेटले. सरांनी मला लगेच ओळखले. विद्या सहकारी बॅंकेचा अध्यक्ष म्हणून मी बॅंकिंग क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची त्यांनी खूप स्तुती केली. मला जवळ घेऊन पाठ थोपटली. मी त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी सर घरी आल्यावर मी सरांचा योग्य तो आदर सत्कार केला. पत्नी व मुलीची ओळख करून दिली व गमतीने कोलांटी उडीची आठवण सांगत पत्नीला सांगितले... ""हेच ते सर, जे मला नेहमी शर्ट काढून कोलांटी उडी घ्यायला सांगत असत.''... सर एकदम भावूक झाले व म्हणाले, ""अरे अनास्कर! तू त्या वेळी गरीब होतास, पापड लाटून शाळेत यायचास, तुझ्याकडे गणवेशाचे दोनच जोड असायचे. त्यातला एक शर्ट फाटल्यामुळे तू एकच शर्ट पाच दिवस घालायचास. त्यामुळे फरशीवरील धुळीमुळे तुझा शर्ट घाण होऊ नये म्हणून मी तुला व त्या मोकाट्याला शर्ट काढून उडी मारायला सांगत असे.''

सरांचे हे बोलणे ऐकताच वर्गातील बुटका मोकाटे माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. काय बोलावे ते मला व पत्नीलाही कळेना. शिक्षकांची सद्‌भावना ओळखू न शकल्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे मी, सरांनी माझ्यावर अन्याय केल्याची जखम घेऊन गैरसमजात वावरत होतो. आता नवा प्रकाश अंतःकरणात उमलला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidyadhar anaskar write article in muktapeeth