आम्हाला काय दिलं?

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर...

जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर...

प्रिय पु.ल.,
तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते, तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी घेतो. वाचत नाही. मजकूर बव्हंशी लक्षातच असतो. पण पुस्तक डोळ्यांसमोर धरले की मित्राचा हात धरल्यासारखे वाटते. धीर येतो. एखाद्या अनवट प्रसंगी वापरलेली चपखल शब्दयोजना, कोटी आमच्यावर झालेल्या तुमच्या भाषिक संस्कारांमुळे सुचलेली असते. तेव्हा मनोमन तुमचे आभार मानत असतो. तुम्हाला "आउटडेटेड' म्हणण्याची सध्या फॅशन आहे. असे म्हणणारे आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून विचारत असतात, की सांगा, तुम्हाला पुलंनी नेमके काय दिले? तर त्याचाच हिशेब मांडायचा प्रयत्न करतोय. सामाजिकदृष्ट्या मध्यमवर्गीय, एकत्र कुटुंबात जन्मलो तरी माझे लहानपण गरिबीत गेलेले होते. शिक्षण उरकावे, कायम नोकरी मिळवून लग्न करावे, महिन्याची एक तारीख आणि महिनाअखेर नीट जुळाव्यात एवढीच स्वप्ने होती. तुम्ही आम्हाला स्वतःखेरीज स्वतःच्या पलीकडेही बघायला शिकवले. हे असे बघण्याची, बघायला शिकवण्याची गरज कधी आउटडेटेड होणार नाही, म्हणून तुम्ही कालातीत आहात.

शंकर पाटील, जयवंत दळवी, रमेश मंत्री आदींनी आम्हाला पोटभर हसवलेच होते. तुमचा विनोद आणि कोट्या आम्हाला कितीही आवडत असल्या तरी तुमचा "यूएसपी' तेवढाच नव्हता. तुम्ही आम्हाला हात धरून ग्रामीण, दलित आणि इतर साहित्यांच्या अंगणात नेलेत, चाप्लीनचे चित्रपट, आनंदवन, शांतिनिकेतन दाखवलेत, खानोलकर, मर्ढेकर सोपे करून सांगितलेत. विनोबा आणि गांधीजी समजावून सांगितलेत. तुम्ही केलेले विविध क्षेत्रांतल्या माणसांचे गुणगानपर व्यक्तिचित्रण हा आमच्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक विश्वाचे दस्तऐवजीकरण केलेला खजिना आहे. आमच्या चंद्रमौळी घरांच्या एकेका गवाक्षा-खिंडारातून बाहेरचे विश्वरूप दर्शन तुम्ही घडवलेत. आणि इतरांच्या सुखदुःखांशी समरस होऊनही आमच्या जगण्याची आम्हाला लाज वाटली नाही. आमचे लहानपण, भाबड्या श्रद्धा, सणासुदीतले आनंद हे तुमच्या देखील स्मरणरंजनाचा भाग होते. तुमच्याशी घट्ट सूर जुळण्याचे ते खूपच मोठ्ठे कारण आहे.
शेवटपर्यंत तुमचा हात असाच हातात राहो!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in muktapeeth