या चिमण्यांनो!

विजया आगाशे
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

आपल्या भावविश्‍वात चिवचिवाट करणारी चिमणी प्रत्यक्षात दुरावली आहे. ती परतून येईल?

आपल्या भावविश्‍वात चिवचिवाट करणारी चिमणी प्रत्यक्षात दुरावली आहे. ती परतून येईल?

नातीला भरवत होते. एक घास चिऊचा. एक घास काऊचा. पण चिऊ होतीच कुठे? आपल्या अंगणात चिऊ कधी बरे आली होती? सगळ्या चिमण्या संगनमत करून निघून गेल्या, त्यालाही आता दहा-बारा वर्षे लोटली. चिऊ का गेली बरे येथून? पूर्वी इथे खूप चिमण्या होत्या. त्यांच्या चिवचिवाटाची सवयच झाली होती. त्यांच्यासाठी अंगणात धान्य टाकताना, वाटीत पाणी भरून ठेवताना त्या अजून जवळ याव्यात, अशीच इच्छा मनात असायची. त्याही टीपटीप दाणे टिपायच्या, मातीत पंख फडफडवून अंघोळ करायच्या. एक मात्र चुकलेच. चिऊला कधी प्रेमाने घरात येऊ दिले नाही की तिला येथे कधी घरटे करू दिले नाही. चिमण्या घरात घरट्यासाठी एखादी जागा शोधायच्या. मी चिऊला हुसकावून लावायचे. आमच्या कॉलनीच्या रस्त्यावर एक बाभळीचे झाड होते. चिमण्यांची सकाळ-संध्याकाळ शाळाच भरायची तिथे. पण ते झाडही उरले नाही.

पावसात कावळ्याचे घरटे वाहून गेले तर कावळा कोठे जात असेल? तोही चिऊताईला शोधत असेल का? कारण तो आता कसे म्हणणार, की "चिऊताई-चिऊताई दार उघड आणि मला घरट्यात घे!' तोही वाट बघत असेल का चिऊची? माझ्याचसारखी? लहानपणापासून चिमणी आपले मन, आपले भावविश्‍व व्यापून असते. गोष्टींमधून, कवितांमधून, अंगाई गीतांमधून भेटते. उशिरापर्यंत घरट्यात झोपलेली चिऊ बाळाचे नाव घेताच भुर्रकन चारा आणायला उडून जाते. ती दयाळू आहे. घरटे वाहून गेलेल्या काऊला ती आपल्या घरट्यात घेते. पण तो दंगा करू लागताच त्याला धडा शिकवायलाही ती मागेपुढे बघत नाही. तिचे घरटे कोणीतरी मोडून जाते व ते कोणीच कबूल करत नाही. फक्त पोपट तिला त्याच्या पिंजऱ्यात बोलावतो. पण स्वाभिमानी चिमणी, जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला, म्हणत रानात उडून जाते. तिला पारतंत्र्यात राहाणे आवडणार नाही. बालकवींनी ही सुंदर कविता तिच्यावर लिहिली आहे. घराबाहेर, झाडांवर कृत्रिम घरटी केली तर ही दुरावलेली चिमणी परतून येईल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaya aagashe write article in muktapeeth