गणपतीची शाळा

गणपतीची शाळा

पोरवयात एखाद्या गुरुजींचा मनावर खूप प्रभाव असतो. पुढे वाढत्या वयात काही काळ त्या गुरुजींचा विसरही पडू शकतो; पण पुन्हा कधीतरी एखादा क्षण त्या जुन्या दिवसांत घेऊन जातो आणि ते दिवस पुन्हा उजळतात.

"शाडूतून गणेशमूर्ती साकारण्याचे धडे' ही बातमी "सकाळ'मधे वाचली अन्‌ मन भूतकाळात गेले. मला आठवली, माझ्या बालपणीची नवीन मराठी शाळा आणि आमचे थिटे गुरुजी. कृष्ण दत्तात्रय थिटे गुरुजी शाळेत "क्राफ्ट टीचर' होते. शाळेत एका बाजूला मातीकामाचा वर्ग होता. 1950 ते 1960 या काळात थिटे गुरुजी शाळेत होते.

गुरुजींनी जणू पर्यावरणाचे महत्त्व तेव्हाच ओळखले होते. गुरुजी स्वतः गणपतीचे साचे तयार करत असत. सर्व लहान मुलांना आपल्या हाताने गणपती कसा तयार करायचा ते शिकवत असत. निसर्गरक्षणाबरोबरच मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा, त्यांचे कलागुण विकसित व्हावेत हा त्यांचा उद्देश होता. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना आनंदाने भरते यायचे. गणपती तयार केल्यावर तो घरी नेऊन त्या गणपतीची मनोभावे पूजा करायची असे ते सांगत आणि आम्ही आमच्या आई-वडिलांची शाबासकी मिळवायचो. त्यामुळे थिटे गुरुजी आणि मुलांचा गणपती हे एक समीकरणच होते त्या वेळी. नवीन मराठी शाळेचे ते एक वेगळेच वैशिष्ट्य होते. पुढे सोहनीबाईंनी ही परंपरा सुरू ठेवली. त्या वेळी शाळेत केलेला गणपती अजूनही जपून ठेवला आहे, असे सांगणारे माजी विद्यार्थी भेटतात.
गुरुजी अत्यंत साधे, शांत स्वभावाचे. अबोल, साधी राहणी. आपण कोणाचे वाईट केले नाही तर, आपलेही कोणी वाईट करणार नाही, असे त्यांचे सरळमार्गी विचार होते. त्यांना पैशाचा मोह नव्हता. फक्त मुलांना देता येईल तेवढे देत राहिले आयुष्यभर. गुरुजींनी पुढे विमलाबाई गरवारे शाळेत विद्यार्थ्यांसाठी छंदवर्ग सुरू केले. सुंदर हस्ताक्षरासाठी ते प्रसिद्ध होते. मुलांच्या हस्ताक्षरावर त्यांचा भर होता. गुरुजी हस्तकला शिकवायचे. कागदापासून नाव, आगबोट, फुगा इत्यादी करायला शिकवायचे. संक्रांतीच्या वेळी जाड कागदांपासून हलव्याचा डबा कसा करायचा ते शिकवत असत. स्नेहसंमेलनाच्या वेळी त्यांच्या उत्साहाला पारावार नसे. एखादा विषय घेऊन ते प्रदर्शनात मांडत असत. म्हणजे की, धरण, शेती, कालवे असे देखावे तयार करत असत. तानाजी आणि मावळे दोर धरून कोंढाणा कसे चढून जातात, हा देखावा त्यांनी एकदा साकारला होता. एकदा मोहेंजोदडो व हडप्पा या संस्कृतींचे, उत्खनन करताना सापडलेल्या हत्यारांच्या प्रतिकृती शाडू, कागद व पुठ्ठा वापरून तयार केल्या होत्या.

गुरुजी जिथे राहात असत, त्या शनिवार पेठ, हसबनीस बखळ यांचा पन्नासावा गणेशोत्सव होता, तेव्हा शाडूपासून गणपती बसवून अष्टविनायक-दर्शनाचा देखावा मांडला होता. गुरुजींचा ऐतिहासिक, पौराणिक या विषयांवर भर होता. ते शिल्पकलेत निष्णात होते आणि त्यांचे साधन म्हणजे शाडूची माती, कागद, पुठ्ठा इत्यादी साहित्य. दिल्ली व म्हैसूर येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांना संस्थेने पाठवले होते. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मोलाचा क्षण होता. कलाकृती बनविण्याची त्यांच्या हातातली जादू पाहून सर्व राज्यांतील लोक थक्क झाले होते.

त्यांच्या मुलीने, गीताने सांगितलेली एक आठवण- थिटे गुरुजी व्यवसाय उपक्रम वर्गाचे प्रमुख होते. भरतकाम, पेंटिंग, पोहणे, हस्ताक्षर, कागदी फुले बनवणे, शाडूमातीपासून वस्तू बनवणे, एरोमॉडेलिंग, दुचाकीची दुरुस्ती, इंग्रजी संभाषण इत्यादी उपक्रम ते राबवत असत. त्यामुळे मे महिन्यात मुलांसाठी पर्वणी असायची. घरांच्या, गाड्यांच्या प्रतिकृती बनविल्या जात. त्यामुळे मुलांचा ओढा त्याकडे जास्त असायचा. गुरुजींचे माजी विद्यार्थी आवर्जून कळवायचे, की "मी कागदाच्या फुलांचा, घराच्या मॉडेल्सचा वर्ग घेणार आहे. तो कोणाला शिकवायला देऊ नका.' उपक्रम राबविण्यासाठी त्यांच्या या माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. शिवाय चित्रकलेचे वर्गही घेतले जायचे. गुरुजीं बालअध्ययन वर्गात म्हणजे मॉंटेसरीतील मुलांनाही शिकवत असत. वाडिया कॉलेजमध्ये "टीचर्स डिप्लोमा' शिकवायला जात असत. बीएडच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला शिकवत असत; तसेच कर्वे रस्त्यावरील मूकबधिर मुलांच्या शाळेत आठवड्यातून दोन दिवस जाऊन पुस्तकबांधणी, उत्तरपत्रिका, शंभर पानी वही कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करीत असत.
आमचे थिटे गुरुजी काही काळ आमच्या घराजवळच राहायला आले होते. गुरुजी आपल्याच घराजवळ राहायला आल्याचे ऐकून आम्हा छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला होता. गुरुजींबद्दल सगळ्यांनाच आदरयुक्त प्रेम होते. धाक-दरारा नव्हता. ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रिय होते. आम्ही सर्वजण त्यांना दसऱ्याचे सोने द्यायला; तसेच त्यांनीच शिकविलेल्या हलव्याच्या डब्यातून तिळगूळ द्यायला व नमस्कार करायला जात असू. तेव्हा गुरुजींचा व काकूंचा आमच्या पाठीवरून आशीर्वादाचा हात फिरत असे.

गुरुजींच्या त्या आशीर्वाद देणाऱ्या हातांचा स्पर्श अजून जाणवतो आहे. त्यांनी शाडूपासून केवळ मूर्तीनाच आकार दिला होता असे नाही, त्यांनी आम्हालाही घडवले होते, हे आता लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com