जिवलग रॉल्फ

विजया काळे
शनिवार, 1 एप्रिल 2017

जिवलग! म्हणजे जिवाला जीव लावणारा. लळा लावणारा. जिवात जीव ओतणारा. प्रसंगी जिवासाठी जीव देणाराही. असाच जिवलग आहे आमचा रॉल्फ. माझ्या मुलाच्या कुटुंबातील एक सदस्य.

जिवलग! म्हणजे जिवाला जीव लावणारा. लळा लावणारा. जिवात जीव ओतणारा. प्रसंगी जिवासाठी जीव देणाराही. असाच जिवलग आहे आमचा रॉल्फ. माझ्या मुलाच्या कुटुंबातील एक सदस्य.

शहराच्या एका शानदार उपनगरीत आहे माझ्या मुलाचे त्रिकोणी कुटुंब. तो स्वतः, पत्नी आणि मुलगा. त्यात चौथा सदस्य आहे रॉल्फ. करड्या - काळसर रंगाचा. उंचापुरा. जवान. पाणीदार डोळ्यांचा. जर्मन शेफर्ड. घराची राखण करणारा. मालकांची पाठराखण करणारा. त्यांच्या सुरक्षितेसाठी जागता पहारा ठेवणारा ईमानदार. त्याची सोबत आणि आधार वाटतो.
माझा मुलगा त्यांच्या सुटीच्या सवडीनुसार कधी फिरायला जातात, त्या वेळी आम्ही उभयता आजी - आजोबा त्याच्याकडे मुक्कामाला जातो. त्यांच्या गैरहजेरीत घर आणि रॉल्फला सांभाळायला.

चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. असेच आठ-दहा दिवसांच्या सहलीला ते गेले होते. घर, कामवाली, रॉल्फचे जेवण या संबंधी सर्व सूचना सुनेने मला दिल्या होत्या. रॉल्फसाठीच्या पोळ्या बाई करून ठेवीत असे. त्याला सकाळी अकरा आणि सायंकाळी साडेपाचला जेवण द्यायचे असे. त्याची स्टीलची थाळी, पाण्याचे भांडे त्याच्या ठराविक जागेवर अंगणांत भरलेले असे सकाळच्या जेवणात त्याच्या पोळ्यांबरोबर नॉनव्हेज द्यायचे असे. नॉनव्हेजशी माझा परिचय नव्हता; पण त्याचे खाणे का बंद ठेवायचे? ते कसे, किती द्यायचे मी सुनेकडून शिकून घेतले होते. आम्हा उभयतांचा इथला निवास आरामाचा असतो. जेवणे, झोपणे, खाणे, चहापाणी, वाचन आणि टी.व्ही.! सायंकाळचे रॉल्फचे जेवण देऊन झाले की आम्ही जवळपासच्या बागेत - मंदिरात चक्कर मारून येत असू. त्या दिवशी सायंकाळचा चहा झाला आमचा. आता रॉल्फची थाळी त्याच्यापुढे ठेवून बाहेर पडायचे. पोळ्यांचा डबा मी उघडला तर तो भरलेला.

"अगऽऽबाई! म्हणजे दुपारचे जेवण रॉल्फला दिलेच नाही. सुनेसारखी रोजची सवय नसल्याने मी विसरून गेले. बिचारा मुका प्राणी उपाशी राहिला. भटक्‍या कुत्र्यांसारखा तो बाहेरचे काही खात नाही. अंगणातच आपल्या जागेवर बसून असतो. मला अतिशय वाईट वाटले. दुःख झाले. अपराधी वाटले. संध्याकाळची थाळी त्याच्यापुढे ठेवली. तो वाटच बघत असतो वेळेवर. तो लपालप खाऊ लागला. "रॉल्फ माफ कर. दुपारी जेवण द्यायला मी विसरले. तुझी उपासमार झाली. खूप भूक लागलीय ना? मी त्याच्या डोक्‍यावरून, अंगावरून थोपटून मायेचा हात फिरवला. तो न कुरकुरता खात होता. त्याच्या जागी आपण कुणी माणूस असतो तर? त्रागा केला असता. रागानं आदळआपट केली असती. भूक लागलीय, खायला दे, म्हणून आरडाओरड केली असती. रॉल्फने जेवणाची वेळ झाली म्हणून रोजच्या सारखी दारात ना हजेरी लावली, (कारण आम्ही ते बंदच ठेवले होते) की चार-चारदा दारावर धक्के देऊन ठोठावले नाही. "भोऽऽभोऽऽ' भुंकला नाही की गुरगुरला नाही. त्याने समजून घेतले, आपले मालक-मालकीण परगावी आहेत. आजी- आजोबा विसराळू असतील!

नेहमी माझा मुलगा आधी घराबाहेर पडतो. मग नातू कॉलेजला जातो आणि नंतर सून. आधी रॉल्फला जेवण देऊन मगच आपण जेवून नोकरीला बाहेर पडते. मालकाच्या जेवणाच्या वेळी तो खुर्चीवर पेपर वाचत, टी.व्ही. पाहत जेवत असेल, तर रॉल्फ त्याच्या पायाशी बसून असतो. दासमारुतीसारखा. मग त्याच्याकडून ताटातला एखादा पोळीचा तुकडा मिळाला की त्याचा हा लाडोबा सेवक खूष असतो. केव्हाही गेले तरी प्रवेशताच आदी त्याला पहिली सलामी द्यावी लागते. शिवदर्शनाआधी नंदीचे दर्शन, मग शिवाचे तसेच. तो अंगाशी - पायाशी घुटमळतो, खाऊ नाही दिला तरी. मायेचा हात पाठीवरून फिरवण्यासाठी लांगुलचालन करीत असतो; पण आज यातले काहीच झाले नाही, तरी त्याचे पाणीदार डोळे माझ्याकडे पाहत होते. मला अश्रू अनावर झाले. आज मी तुला उपाशी ठेवले. मला माफ कर रॉल्फ. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवित होते. पश्‍चात्तापाने, दुःखाने माझे मन आक्रंदत होते.

मुलगा कुटुंबासह सहलीवरून परतला. माझे मन मला खात होते. रॉल्फच्या उपासमारीचा किस्सा मी सुनेला सांगितला. काही बिघडत नाही. कुत्रा दोन-दोन दिवस उपाशी राहू शकतो. तिने माझे समाधान केले. हा ईमानी चतुःष्पाद चाकर दोन दिवस उपाशी राहू शकतो? पण का? आम्हाला दोन वेळा जेवणे, दोनदा चहा-पाणी, तीन-तीनदा दिले तरी खाणे हवेच. मग त्याला का नको? ज्याची सेवा करतो, भाकर खातो त्यांच्यासाठी एवढी ईमानदारी? माणसांपेक्षाही मोठी? माझ्या मनात त्याच्याविषयी दया, प्रेमच नाही, तर अभिमान दाटून आला.

आजही आम्ही जेव्हा मुलाकडे जातो, तेव्हा त्याच्यासाठी, दारातल्या पहिल्या सलामीला दोन बिस्किटे घेऊन जातो. तीही विसरतात तेव्हा ""रॉल्फ आज बिस्किटे विसरली हं,'' मी आधीच सांगून टाकते. त्याचाही त्याला राग नसतो. केवळ पाठीवरून हात फिरवला की तो खुषीत शेपटी झुलवतो. माणसांप्रमाणे तोही प्रेमाला भुकेला असतो; केवळ अन्नाला नाही. असा हा आमचा जिवलग नातेवाईक रॉल्फ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaya kale write article in muktapeeth