भटके पक्षी

विजया पटवर्धन
शनिवार, 10 मार्च 2018

परदेशी लोकांच्या मनात आपल्याबद्दल, भारताबद्दल काय काय कल्पना आहेत हे समजल्यावर आपल्याला थक्क व्हायला होते, नाही का?

परदेशी लोकांच्या मनात आपल्याबद्दल, भारताबद्दल काय काय कल्पना आहेत हे समजल्यावर आपल्याला थक्क व्हायला होते, नाही का?

पतीच्या नोकरीनिमित्ताने पूर्ण भारतभर फिरणे झालेच, पण परदेशातही वास्तव्य झाले. परदेशांत भारत व भारतीयांबद्दल काय भन्नाट कल्पना आहेत, काय सांगू?
कंपनीने तीन वर्षांसाठी इराक व कुवैतला पाठविले होते. इथल्या मोकळ्या वातावरणातून "पर्दानशीन' अरबी देशांत राहणे म्हणजे सुरवातीला एक दिव्यच वाटत होते ! तेव्हा इराण-इराक युद्ध चालू होते. कौतुकाची गोष्ट अशी, की बाया बुरखा घालायच्या. पण नवरे, मुले लढाईत आणि या कार्यालये, दुकाने, मॉल सांभाळायच्या तेही बुरखा न घालता. काम संपले की पुन्हा बुरख्यात ! एकीकडे या बायांचे कौतुक वाटायचे, तर दुसरीकडे गंमत वाटायची हे पाहताना. मी बाहेर बाजारात जायची, तर कुणी बुरखेवाली माझा पदर माझ्या अंगभर लपेटायची. म्हणायची, "हराम, हराम'. म्हणजे, बाईने शरीराचा कुठलाही भाग दिसू देणे म्हणजे पाप ! मनात यायचे, दुकानात, कार्यालयात बुरखा घातला नाही तर पाप नाही का? पण त्या सगळ्याजणी ही कसरत सुरेख जमवत होत्या.

आमचा प्रकल्प इराणच्या सीमेपासून जवळ होता. कितीदा तरी त्यांचे अग्निबाण आमच्या कॉलनीवरून जात असत. सीमेपलीकडून अग्निअस्त्रे निघाली की इशाऱ्याचा भोंगा वाजत असे. सावधानतेची सूचना मिळे. मग धावत पळत खंदक गाठायचा. त्यात लपायचे. सारे काही शांत होईपर्यंत खंदकात लपून बसायचे. कुवैतमध्येही तीच गत ! त्या देशात मी खंदकात किती राहिले आणि बाहेर किती हिंडले हे सांगत नाही.

आम्ही तिथूनच युरोप फिरायला गेलो. आम्ही इराकहून पहिल्यांदा तुर्कस्तानला गेलो. तिथून युगोस्लाव्हिया, बल्गेरिया बघितले. आता युरोपीय संस्कार दिसू लागले. माझ्या साडीकडे सगळे कुतूहलाने वळून वळून बघायचे. व्हेनिसला गंमत झाली ! एका चौकात भटकत असताना लक्षात आले, की एक बाई बराच वेळ माझ्याकडे बघत आहे. का इतकी टक लावून पाहात असेल? तशी साधी सरळ वाटते चेहऱ्यावरून. पण आपल्यावर नजर ठेवून का असावी? मनात कुशंकाच फार. अखेर धीर करून तीच जवळ आली.
""हे काय घातले आहेस?''
""हिला साडी म्हणतात.''
""कशी घालता? हे काय आहे?''
पदराकडे बोट दाखवीत, ""याचे दुसरे टोक कुठे आहे?''
अरे देवा, हा सगळा संवाद भर चौकात चालू आहे. आता हिला आत खोचलेले दुसरे टोक कसे दाखवू? मोठीच पंचाईत झाली. कारण ती तर अडूनच बसली. तिला वाटत असेल, मी असा काय कठीण पेच टाकला की ही बाई घाबरून गेली? तेवढ्यात तिच्या मैत्रिणी येऊन तिला घेऊन गेल्या आणि माझी मोठ्या धर्मसंकटातून सुटका झाली !

म्युनिकला मी तोंड धुवायला वॉशरूममध्ये गेले. शेजारी एक वयस्क बाई तोंड धूत होती.
""तुम्ही कुठून आला?''
""भारतातून आले आहे.'' चेहरा धुण्यासाठी मी कपाळाची टिकली काढली आणि अचानक ती बाई भूत पाहिल्यासारखी थरथरू लागली. मला कळेना, आतापर्यंत ही बरी होती. अचानक हिला काय झाले?
""तुला काय झाले? बरी आहेस ना?'' असे विचारत तिला मदत करायला मी पुढे झाले, तर ती आणखी मागे सरत हातानेच मला दूर रोखण्याचा प्रयत्न करीत होती. मला कळेना काय करावे. मी तिला पुन्हा विचारले, ""तुला काही मदत करू का?''
ती थरथरत म्हणाली, ""तुला जादूबिदू येते का? तू हा कपाळावरचा "रेड डॉट' कसा काढलास?''
मीच सावरले आता. मी टिकली तिच्या हातावर ठेवली आणि तिच्याकडे पाहून हसले.
""ओह ! मला वाटले, भारतीय बायकांच्या कपाळावर जन्मतःच हा "रेड डॉट' असतो आणि तो कधी काढता येत नसतो,'' ती सुस्कारा टाकत बोलली. कसनुशा चेहऱ्याने हसत बाहेर गेली.

अमेरिकेत आमचा मुलगा, सून राहतात. त्याच्याकडे गेलो होतो. एकदा त्याच्या घरी हिरवळीवर बसलो होतो. तिथे सुनेची फ्रेंच शेजारीण आली. सुनेने ओळख करून दिली. ती ऐटीत म्हणाली, ""आम्ही येथे जवळच राहतो आणि तुम्हाला खोटे वाटेल, पण मी अन्‌ माझा बॉयफ्रेंड गेली चार वर्षे एकत्र राहात आहोत.'' माझी सून तिच्या सुरातील उपहास लपवू शकली नाही. ती म्हणाली, ""अगं, तुला खोटे वाटेल, पण माझ्या सासू-सासऱ्यांनी लग्न केले आहे आणि ते गेली चाळीस वर्षे एकत्र राहात आहेत.''
मैत्रीण थक्क झाली. म्हणाली, ""फॉर्टी इयर्स? आय काण्ट बिलीव्ह!''

अरे देवा, या लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय काय समज आहेत !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaya patwardhan write article in muktapeeth