चमत्कार वैद्यकाचा!

विलास चाफेकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

शस्त्रक्रियेची एक छोटीशी खूण माकडहाडावर ठेवून सत्त्याहत्तर वर्षांची वेदना गायब झाली.

शस्त्रक्रियेची एक छोटीशी खूण माकडहाडावर ठेवून सत्त्याहत्तर वर्षांची वेदना गायब झाली.

चमत्कारांवर माझा मुळीच विश्‍वास नाही, पण घडले ते मात्र चमत्कार वाटावा असे. ते अघटित होते असेही नाही म्हणता येणार. पण ते घडले वेगाने. मणक्‍यांचा विकार मला अगदी लहानपणापासून आहे. वेदना जाणवू लागल्यापासून थोडे फार उपचारही झाले लहानपणीच, पण त्या उपचारांना पाठीचा कणा नमला नव्हता. साहजिकच या चिरंतन वेदनेसोबतच राहणे भाग पडले. दुखणे घेऊनच शिकणे झाले. सामाजिक काम करायचे ठरले. दुखणे "पाठीमागे' टाकून खूप काम केले. महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात कामे उभी केली. "जाणीव' व "वंचित विकास'ने आकार घेतला. कामाच्या निमित्ताने प्रचंड प्रवास झाला, बहुतेक सारा प्रवास एसटीने. या प्रवासात हादरे बसायचे. वेदना सहन करीत फिरायचो. पण वाढत्या वयासोबत वेदनाही वाढल्या. थांबायची इच्छा नव्हती, पण हळूहळू मला चालता येईनासे झाले.

अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका डॉक्‍टराशी माझी गाठ पडली. पाठीवर सॅक, हसतमुख, उत्साहाने रसरसलेले, मध्यमवयीन डॉक्‍टर. त्यांच्या उत्साहाचा संसर्ग समोरच्यालाही लगेच होत असावा. म्हणाले, ""आपण ऑपरेशन करूया.'' म्हणालो, ""नको. एका प्रख्यात डॉक्‍टरानी मला सांगितलेय, ऑपरेशन करू नका. अपंग होण्याची भीती.'' ""किती वर्षांपूर्वी सांगितले?'' ""पन्नास वर्षे तरी झाली.'' ""आता वैद्यकशास्त्र व तंत्रज्ञान खूप विकसित झालेय. करा ऑपरेशन. मीच करतो.'' ""खात्री काय यशाची?'' ""शंभर टक्के यशस्वी होईल ऑपरेशन.''

त्यांच्या उदंड आत्मविश्‍वासामुळे मी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. ऑपरेशन ठरले. चाचण्या झाल्या. खरे तर त्यांच्या व माझ्यावाचून इतर साशंकच होते. ऑपरेशन झाले. मी शुद्धीत आलो. डॉक्‍टर दरवाजातच उभे होते. मी उठलो. चार पावले टाकली. डॉक्‍टरांचे अभिनंदन केले आणि पुन्हा पलंगावर येऊन झोपलो. ना टाके घातलेले, ना बॅंडेज बांधलेले. फक्त माकडहाडाच्या वर ऑपरेशनची खूण हाताला लागत होती. तीन महिन्यांत मी चालायलाही लागलो. गेल्या 77 वर्षांची वेदना गायब झालेली. याला चमत्कार म्हणायचे की डॉक्‍टर अमोल रेगे यांचे कौशल्य?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilas chafekar write article in muktapeeth