कानाला खडा

विलासिनी प्रभाकर कुलकर्णी
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

प्रवासाला निघाल्यावर हाताशी आपली औषधे ठेवण्यास विसरता कामा नये, असा कानाला खडा लावला.

प्रवासाला निघाल्यावर हाताशी आपली औषधे ठेवण्यास विसरता कामा नये, असा कानाला खडा लावला.

नाताळच्या सुटीत आम्ही "सिंगापूर-मलेशिया' सहलीला जायचे ठरविले. मुलाने सर्वच ऑनलाइन बुकिंग केले. विमानप्रवास, निवास, खाणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, असा सर्वच बेत ठरवून प्रवासाची तयारी केली. यादी करून सर्वच सामान भरले. सर्वांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या बॅगा! पण एक गंमतच झाली. माझी मधुमेहाची औषधे रात्री फ्रीजमध्ये ठेवली. सकाळी जाताना फक्त बॅगमध्ये टाकायची! पहाटे दीडला उठून, आवरून सिंगापूरसाठी विमानतळ गाठले आणि या सर्व गडबडीत ती फ्रीजमधील औषधे बॅगमध्ये टाकायची मी विसरलेच! विमानाने मस्त सिंगापूरला पोचलो. सर्व छान प्रवास. छान विमानतळ "जीवन में एक बार आना सिंगापूर' हे गाणे आठवत हॉटेलमध्ये पोचलो. भारतीय हॉटेलात जेवायला गेलो आणि तेव्हा आठवले, की आपण औषधे पुण्यालाच विसरलो. मग काय? शेवटी सिंगापूरला एका नवीन डॉक्‍टरला गाठावे लागले. पुण्यातील डॉक्‍टरांचे प्रिस्किप्शन जवळ होते, पण त्यांच्याकडे तशी औषधे नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांना विनंती करून दहा दिवसांसाठी त्याच प्रकारची दुसरी औषधे, गोळ्या घेतल्या. ती औषधे कशी घ्यायची ते मुलाला समजावले. पण या सगळ्याचा त्रास मुलालाच झाला. तोच ती औषधे दोन्ही जेवणाआधी आठवणीने द्यायचा.

अजून एक अशीच गंमत. माझे मिस्टर व दीर यांची औषधे बरोबर घेतली होती. पण आयत्या वेळी सापडेचनात! दोघांच्याही रक्तदाबाच्या गोळ्या! शेवटी मलेशियात अजून एका नवीन डॉक्‍टरांना गाठून त्या दोघांचा रक्तदाब तपासून घेतला. त्या डॉक्‍टरांनी त्यांना नवीन गोळ्या दिल्या! त्या तिथेच मिळाल्या. असे सर्व औषधांचे रामायण झाले. अर्थात या सर्वांत त्रास झाला तो माझ्या मुलालाच! नवीन जागा, नवीन भाषा, नवीन चलन या सर्वांत दहा दिवसांची सहल मात्र छान झाली. पण तरीही असे वाटते, नको हे देवा असा प्रसंग अनुभव! अशी छोटीशी चूकही कुणाच्याच बाबतीत घडू नये. मी मात्र कानाला खडा लावला. औषधे आठवणीने बॅगेत ठेवायची. हाताजवळच्या बॅगेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilasini kulkarni write article in muktapeeth