बाईला निवृत्ती नाही!

विमल लेंभे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

वयाच्या एका विशिष्ट दिवशी नोकरीतून निवृत्ती ही ठरलेली असते. त्या वेळी स्त्री पुढच्या आयुष्याचे काही नियोजनही करते; पण काही काळाने तिच्या लक्षात येते की, अरेच्चा, आपण केवळ नोकरीतून निवृत्त झालो, बाकी प्रवृत्तीच्या मार्गावरून चालतोच आहोत.

वयाच्या एका विशिष्ट दिवशी नोकरीतून निवृत्ती ही ठरलेली असते. त्या वेळी स्त्री पुढच्या आयुष्याचे काही नियोजनही करते; पण काही काळाने तिच्या लक्षात येते की, अरेच्चा, आपण केवळ नोकरीतून निवृत्त झालो, बाकी प्रवृत्तीच्या मार्गावरून चालतोच आहोत.

शाळेत माझा निरोपसमारंभ झाला, त्या दिवशी सकाळपासूनच मन बेचैन होते. मनात नाना विचार दाटून आले होते. उद्यापासून माझी लाडकी शाळा, माझे विद्यार्थ्यी, माझा मुख्याध्यापिका म्हणून असलेला कक्ष, माझ्या सहकारी शिक्षिका, शाळेचे वॉचमन, वर्ग झाडणाऱ्या सखुबाई, शाळेचे टपाल, हजेऱ्या व्यवस्थित ठेवणाऱ्या, नोटीस वर्गवार फिरवणाऱ्या सॅमेरेटीबाई हे मला दिसणार नव्हते. आता माझ्या जीवनक्रमात बदल होणार होता. निरोप द्यायला आसपासच्या शाळेतून एक दोन शिक्षक, मुख्याध्यापक, भागाधिकारीसाहेब आवर्जून आले होते. आधीच्या शाळेत बरीच वर्षे मी काम करीत होते, तेथील काही शिक्षकही आले होते. कोणत्याही निरोप समारंभात होतात, तशी अधिकाऱ्यांची, काही सहकारी शिक्षकांची भाषणे झाली. भरपूर भेटी मिळाल्या. फलके गुरुजींनी दिलेले "श्रीगोंदवलेकर महाराज यांची प्रवचने' ही भेट मला खूपच आवडली. शेवटी मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत मी सर्वांचे आभार मानले. त्यात आमच्या दोन्ही साहेबांचे आभार मानायचे विसरून गेले. त्याची चुटपूट मनाला लागून राहिली. चहापाणी झाले. साहेबांनी मला विचारले, "पुढे काय करणार?' मी पटकन म्हणाले, "आता मी भजनाच्या क्‍लासला जाईन, भजने शिकेन!'

काहींनी सल्ला दिला, देशाटन करा, तीर्थयात्रा करा, सहलीला जा! मीही हसून हो म्हणाले; परंतु माझा खरा आनंदाचा ठेवा देवाने माझ्या हाती दिला होता, तो म्हणजे माझी तीन महिन्यांची गोंडस, सुकुमार नात. तिला पाहून मी हरखूनच गेले होते. माझे भजन, तीर्थयात्रा, सहली सर्व जागेवरच राहिले. रोजचे रुटीन सुरू झाले. माझा मुलगा, सून दोघेही नोकरीला जात. दिवसभर चिमुकली नात आणि मी! तिचे संगोपन करण्यात माझा दिवस कुणीकडे गेला, ते कळत नसे. मी पूर्णपणे नातीमय झाले. तिची आई नोकरीला जाऊ लागली, त्या बालजिवाची मीच आई झाले. आता दिवस वाऱ्याच्या वेगाने पळू लागले. बघता बधता नात पाच वर्षांची झाली. शाळेत जाऊ लागली. तिला शाळेत नेणे, आणणे हे ओघानेच माझ्याकडे आले. तिचा युनिफॉर्म, तिचे दप्तर, डबा तयार ठेवणे. शाळेसाठी तिला तयार करणे हे सर्व मीच पाही. तिची शाळा सुटायच्या वेळी मी अर्धा तास आधीच शाळेच्या समोरच्या फुटपाथवर बसून राही. सर्व मुले बाहेर पडल्यावर माझी नात स्वप्ना व तिची मैत्रीण अपेक्षा सावकाश रमत-गमत येत. माझे डोळे तिच्या प्रतीक्षेत पार थकून जात; पण तिला पाहिल्यावर माझा थकवा पार पळून जाई. ती तिसरीत जाईपर्यंत मी तिची ने-आण करीत असे; पण एकदा तिला घरी आणताना मी रस्त्यात ठेचकळून पडले. मग मात्र तिला रिक्षा लावली.

यथावकाश नातीचे शिक्षण पूर्ण झाले. तिला नोकरीही लागली. लग्नही झाले. माझा मुलगा व सून नोकरीला जातात, त्यामुळे घरात सर्व पाहणे आलेच.
गॅसवाला आला, गॅस सिलिंडर घ्या. पाणीबिल, वीजबिल, टपाल आले ते घ्या. भरल्यावर नीट फाइल करा, आलेल्या गेलेल्याचे पाहा, घरामागची बाग झाडा, पालापाचोळा गोळा करा, झाडांना पाणी घाला, भाजी निवडा, दळण करा, मोलकरणीचे धुणे पटत नाही म्हणून स्वतःचे कपडे स्वतः धुवा. भांडी घासायला येणारी बाई एकदाच सकाळी येते, मग दुपारची भांडी घासा. मुलगा कामावरून आला की त्याचा-माझा चहा करा. आता वृद्ध झाल्यामुळे पापड, लोणची, मसाला, चटण्या करणे ही कामे बंद झाली आहेत. सूनबाई स्वयंपाक करून दहा-साडेदहाला नोकरीला जाते. तिच्या हाताला चव आहे. संध्याकाळी सातला येते. खूप दमते बिचारी! वाटते, तिला मस्त चहा करून द्यावा; पण ती म्हणते ऑफिसात आमचा चहा होतो. माझी मोठी सूनही कर्तबगार आहे. आदर्श शिक्षिका म्हणून तिचा सत्कार झाला. तिने आपल्या नातवंडावर उत्तम संस्कार केले. मला तिचा अभिमान वाटतो. तसेच माझी मुलगी, बहीण यांनीपण नोकरी व घर सांभाळण्याची तारेवरची कसरत उत्तम प्रकारे निभावली. तसेच माझ्या भोवतालच्या स्त्रिया, माझ्या मैत्रिणी नोकरी व घर उत्तम सांभाळण्याची कसरत करीतच असतात. एकूण काय, तर बाईला निवृत्ती नाही. कधीच नाही. एकटीच असले की मला पंधरा-सोळा वर्षांपूर्वी झालेला माझा निरोप समारंभ आठवतो. भजने शिकण्याचा माझा संकल्प आठवतो. मस्त तीर्थाटन करा, भटकून या, हा सल्ला आठवतो. खूप वाचा, आतापर्यंत जे राहून गेले आहे आयुष्यात ते करा, या प्रेमळ सूचना आठवतात. मी शाळेतल्या नोकरीतून तेवढी निवृत्त झाले; पण बाकी अधिकच गुंतत गेले. आधी आमच्या संसारात, नंतर मुलाच्या. त्याचे काही दुःख नाही. कैफियत नाही; पण इतकेच वाटते की, बाई ही प्रवृत्तीच्या मार्गावरूनच सतत चालते, तिला निवृत्ती नाही. आम्ही स्त्रिया कधीच "रिटायर्ड' होऊ शकत नाही हेच खरे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vimal lembhe write article in muktapeeth