भारतरत्न अण्णांचा सत्कार

विनायक श्रीधर अभ्यंकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

लहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच बालगोपाळांना प्रेरणा देता झाला.

लहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच बालगोपाळांना प्रेरणा देता झाला.

त्यादिवशी पुणेकरांना एक सुखद धक्का देणारी बातमी मिळाली. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांना "भारतरत्न' किताब जाहीर झाला. साऱ्या पुणेकरांचे पाय आपोआप हिंगणे मुक्कामी वळले. नारायण पेठेतून हिंगणे गावाला जाणे म्हणजे त्या वेळी केवढा प्रवास असायचा! तेव्हा माझे वय असेल आठ वर्षे. आमचे सर्व बालगोपाळांचे नारायण पेठेत "उदय मित्रमंडळ' होते. मंडळ कसले, भांडणे आणि हुंदडणे याचे ते व्यासपीठच म्हणा!
महर्षी अण्णांना "भारतरत्न' किताब मिळाला म्हणून त्यांचा सत्कार करायचे "चांगले खूळ' मी माझ्या बालगोपाळांच्या गळी उतरवले. पक्के ठरवले, की अण्णांचा आपण सत्कार करायचाच. माझी आजी ही माझ्या या उपक्रमातील सर्वाधार होता. कारण ती "कर्वे माहेरवाशीण'. तिला हा विचार फारच भावला. अण्णांचा होकार मिळवणे सर्वांत महत्त्वाचे. तेव्हा आजीचा सल्ला घेतला. ती म्हणाली, ""सांग अण्णांना, म्हणावे, मी शंभूभट कर्व्हांचा पणतू आहे. म्हणजे अण्णा नक्कीच होकार देतील.'' ठरले. मी आणि माझा मित्र उदय गोडांबे अण्णांना सत्काराचे "आवतण' देण्यास गेलो आणि संदर्भ देताच अण्णा म्हणाले, ""तू तर घरचाच, सत्कार वगैरे काही नको. पण मी येईन तुम्हा बालमित्रांशी गप्पा मारायला.'' आम्हाला तर वाटले आपण कोंढाणाच जिंकला; पण खरी परीक्षा पुढेच होती. कारण सत्काराचे स्थळ, वेळ, अध्यक्ष, साधनसामग्री आणि मुख्य म्हणजे श्रोतृवर्ग? इथेच खरी कसोटी होती.

सत्काराचे अध्यक्ष कोण, हा प्रश्‍न माझ्या मामाने सोडवला. एस. एम. जोशी (आमचे अण्णाच) यांच्या नावाने चिठ्ठी मिळाली. त्या काळी अशा उपक्रमांत थोर पुढारीसुद्धा प्रेमाने मदत करीत. चिठ्ठी मिळाली तेव्हा समजले एस. एम., नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक इत्यादींची गायकवाडवाड्यात (आताचा केसरीवाडा) गोवा मुक्तीसंग्रामावर बैठक चालू आहे. खूप वेळ लागणार होता. परंतु, "हाती घ्याल ते तडीस न्या' या आमच्या शाळेच्या ब्रीदाला स्मरून तिथेच ठिय्या मारला. शेवटी एस. एम. अण्णा भेटताच धाडसाने आमचा प्रस्ताव मांडून मी म्हणालो, ""एका अण्णांच्या सत्काराला दुसऱ्या अण्णांनी अध्यक्ष म्हणून यावे, ही प्रार्थना.'' माझ्या मामाची चिठ्ठी वाचल्यावर तेही यायला तयार झाले.

आता प्रश्‍न होता स्थळाचा. तोही सुटला. माती गणपतीचा लाकडी कठड्यांनी मर्यादित केलेला प्रशस्त हॉल. पेशवेकालीन पुराणवाचन करणाऱ्या पुराणिकांसाठी असलेला लाकडी बाक हेच व्यासपीठ ठरले. दोन्ही सन्माननीय अण्णा त्यावर सहज बसू शकणार होते.

सत्काराच्या दिवशी आमच्या जिवाची घालमेल चालली होती. खरेच अण्णासाहेब येतील का? एस. एम. अण्णा शब्द पाळतील ना? ते आले नाहीत तर आपला केवढा अपमान होईल या भावनेने हरिनामाचा जप करीत माती गणपतीच्या पायऱ्यांवर उभा होतो. तोच समोरून एस. एम. अण्णा चालत येताना दिसले. एक अण्णा तर आले. भारतरत्न अण्णा कधी येणार हा विचार घोळत असतानाच एका काळ्या मोटारगाडीतून अण्णांची वामनमूर्ती खाली उतरली. शुभ्र लेंगा, पूर्ण बाह्यांचा कॉलरबंद बिन बटणी कफलिंगचा सफेद शर्ट, त्यावर फिका हिरवट रंगाचा कोट आणि काळी फर कॅप. शंभरी पूर्ण केलेल्या, शांत, ऋषितुल्य व तेजस्वी अण्णां आमच्या समोर होते. माझा मित्र व मंडळाचा अध्यक्ष उदय गोडांबे याने बिचकतच अण्णांना हार व उपरणे घातले. या प्रारंभीच्या आगत-स्वागत समारंभात आम्ही एस. एम. अण्णा या प्रमुख पाहुण्यांचा विचारच केला नव्हता; परंतु हारतुऱ्यांची कधीच अभिलाषा न ठेवणाऱ्या त्या निगर्वी नेत्याने आम्हाला माफ करून भारतरत्न अण्णांच्या आयुष्याचे धागेदोरे व थोरपण थोडक्‍यात सांगितले. एस. एम. अण्णा म्हणाले, ""छोट्या मित्रांनो, अण्णांसाहेबांमध्ये रग, जिद्द होती; पण मस्ती नव्हती. समाजाने मानहानी केली, त्रास दिला तरी अण्णांसाहेबांनी समाजावर प्रेमच केले. गणित शिकवता-शिकवता अण्णांनी समाजाचे गणित नीट सोडवले. प्रसिद्धीपासून दूर राहून अबोल समाजक्रांती करणारे ते खरेच महर्षी आहेत.''

मग अण्णांनी आमच्याशी गप्पा मारत भाषण केले. मुरुड-हर्णेचे बालपणातले कष्टदायक पण अनुभवसंपन्न बालपण, पुढे गणित विषय शिकवताना आलेले मजेशीर स्वानुभव आपल्या शांत, सोप्या, रसाळ भाषेत त्यांनी मांडून "जीवन हे झगडण्यासाठी असून, पराक्रमाने जगा' असा उपदेश केला. अण्णासाहेब त्या दिवशी म्हणाले, ""बालमित्रांनो, मी माझे मरण डोळ्यांनी पाहिले आणि सुखावलो. मृत्यू झाला हे समजून हारतुरे घेऊन आलेले स्नेही पाहून थोडा वेळ गंमतच वाटली.'' त्यांनी मग "मृत्यूला म्हणतो सबूर जरी' ही कविता ऐकवली. अण्णा त्या दिवशी फारच खुलले होते.

आजही तो प्रसंग सतत माझ्या डोळ्यांसमोर जिवंत होऊन उभा आहे. दोन अण्णांच्या त्या अत्यल्प सहवासानेसुद्धा आम्ही भारावून गेलो. अण्णा आणि एस. एम. जोशी दोन्हीही पुणेकर थोर विभूती हा आदर्श होता. आमच्या पिढीला तो लाभला. अशा निगर्वी, समाजप्रिय महामानवांनी आमच्या बालसुलभ ध्यासपर्वात आम्हाला प्रोत्साहित केले, हा आमचा आनंदाचा ठेवाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak abhyankar write article in muktapeeth