केशराचा पाऊस

विवेक देशपांडे
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

भररानात, चांदण्यांत केशराच्या पावसात भिजत होतो. केसरिया भवतालात मंद सुगंध पसरला होता.

भररानात, चांदण्यांत केशराच्या पावसात भिजत होतो. केसरिया भवतालात मंद सुगंध पसरला होता.

चिखलदऱ्यावरून कोकटूकडे जाणारा रस्ता अरुंद आणि नागमोडी. घनदाट जंगल. आजूबाजूला पंचवीस किलोमीटरपर्यंत वस्ती नाही. दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले भव्य वन विश्रामगृह सुस्थितीत होते. सूर्य अस्ताला गेला, थंडी जाणवू लागली, हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आणि झाडाच्या मागून मोठ्या दिमाखात चंद्राचे आगमन झाले. पौर्णिमा होती. कंदिलाच्या मंद प्रकाशात मारुती चितमपल्लीसर आम्हाला कोकटू परिसराची, तिथल्या पक्ष्यांची, झाडांची, प्राण्यांची माहिती देऊ लागले. वनमहर्षींच्या मुखातून "जंगल गाथा' ऐकताना दोन तास कसे गेले हे समजलेच नाही. मारुतराव म्हणाले, ""आता लौकर झोपा. उद्या पहाटे आपल्याला "केशराचा पाऊस' अनुभवायला जायचे आहे. पहाटे चार वाजता सर्व जण तयार राहा आणि झोपताना दारे, खिडक्‍या नीट लावून घ्या. कारण या भागात अस्वले आणि बिबट्यांचा वावर आहे.'' मी भीत भीतच सरांना विचारले, ""इथे कुठे केशराची शेती आणि त्याचा पाऊस असतो तरी कसा?'' सर म्हणाले, ""याचे उत्तर तुम्हाला उद्याच मिळेल.''

रात्रभर आम्ही झोपलोच नव्हतो. "एखादी पांढरी शाल, पाण्याची बाटली बरोबर घ्या. शक्‍यतो फिक्कट रंगाचे शर्ट घाला', या सरांच्या सूचनेसह पटकन आवरले आणि निघालो केशराच्या पावसात भिजायला भरचंद्रप्रकाशात! सुमारे तासभर चालल्यावर आम्ही एका रायमुनीयाच्या झाडापाशी पोचलो. मारुतरावांनी पांढरी शाल झाडाखाली चार टोकांना धरायला सांगितली. आम्ही स्तब्ध उभे होतो. थोड्या वेळाने लक्षात आले, की ती शाल पूर्णपणे केशरी रंगाने भरली आहे. अंगावर दबबिंदू पडत होते. शर्टही केशरी झाला होता. आम्हा सर्वांचाच "केसरिया' झाला होता. हे विलोभनीय दृश्‍य आम्ही आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. हा केशराचा पाऊस अंगावर झेलताना विलक्षण अनुभूती मिळाली होती. डोळे तृप्त झाले होते. आनंद जंगलात मावत नव्हता.

"मंत्रमुग्ध' या शब्दाचा खरा अर्थ त्या पहाटे समजला होता. मारुतराव सांगू लागले, की या भागात रायमुनिया, केकड, रानचमेली, आरंगा यांचे वृक्ष आहेत. हिवाळ्यात या सर्वांना फुलोरा येतो. फुलांचे परागकण वाऱ्यासंगे उडतात. त्यांवर दव पडून ते खाली उतरतात. बघता बघता साऱ्या जमिनीवर केसरी रंगाचा सडा घातला जातो. आम्हाला जाणवत होते, की या फुलांचा एक हलकासा, मंद सुगंध अवतीभवती पसरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vivek deshpande write article in muktapeeth