एका श्‍वासाचे अंतर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

साधारण चाळीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे. बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात मी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. फक्त या कारागृहातच फाशी देण्याची व्यवस्था आहे. कर्नाटकातल्या फाशीची शिक्षा झालेल्या सर्व कैद्यांना या कारागृहातच पाठवले जाते. त्या सर्वांना एका खास इमारतीत सर्वांपासून दूर, प्रत्येकास एका खास बराकीत ठेवलेले असते. अशा या फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखणे हे कठीण काम आम्हाला करावे लागे. फाशी देताना तो कैदी वैद्यकीय दृष्टीने योग्य असायला हवा. तो स्वतः फाशीच्या तक्तापर्यंत चालत जाऊ शकला पाहिजे, असे तुरुंग संहितेत स्पष्ट केले आहे.

साधारण चाळीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे. बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात मी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. फक्त या कारागृहातच फाशी देण्याची व्यवस्था आहे. कर्नाटकातल्या फाशीची शिक्षा झालेल्या सर्व कैद्यांना या कारागृहातच पाठवले जाते. त्या सर्वांना एका खास इमारतीत सर्वांपासून दूर, प्रत्येकास एका खास बराकीत ठेवलेले असते. अशा या फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखणे हे कठीण काम आम्हाला करावे लागे. फाशी देताना तो कैदी वैद्यकीय दृष्टीने योग्य असायला हवा. तो स्वतः फाशीच्या तक्तापर्यंत चालत जाऊ शकला पाहिजे, असे तुरुंग संहितेत स्पष्ट केले आहे. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर वैद्यकीय अधिकारी व सिव्हिल सर्जन त्या कैद्यास तपासून त्याचा श्‍वास व हृदयक्रिया थांबली आहे की नाही, याची खात्री करून घेतात व त्यानंतर सिव्हिल सर्जन एका विहित फॉर्मवर डेथ सर्टिफिकिट देतात. बेळगावच्या कारागृहात मला नऊ वेळा अशा शिक्षेच्या अंमलबजावणीच्या वेळी हजर राहावे लागले. या प्रकाराची एक सल मनाला व हृदयाला जाणवत असे. पण परमेश्‍वराने मला एक संधी दिली व ती पार पाडण्याचे बळही दिले. 

गरीब घरातल्या, दारू गाळणाऱ्या समाजातल्या बायकांना दिवस गेले, की त्या आठव्या-नवव्या महिन्यात दारूची अवैध वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करवून घेत. त्यांना दोन - तीन महिन्यांची शिक्षा होत असे. कैदी म्हणून सरकारी खर्चाने त्यांचे बाळंतपण होत असे. बेळगावच्या कारागृहात अशा या स्त्रिया असत. अशीच एकदा एक बाई दोन महिन्यांच्या शिक्षेकरिता आली. मी तिला वरून तपासले. नववा महिना संपत आला होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे तिची काळजी घेतली जात होती. एकेदिवशी संध्याकाळच्या वेळेस त्या बाईला बरे नाही, असा निरोप आला. त्या बाईला बाळंतपणाच्या कळा चालू झाल्या होत्या. लगेच पोलिस एस्कॉर्ट मागवून फिमेल जेलरसह तिला मेडिकल नोटसह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. त्या बाईला बाळंतपणासाठी तेथे ठेवून घेण्यात आल्याचा निरोप मला मिळाला. मी निश्‍चिंत झालो. त्या दिवशी रात्री नऊनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. वीजही गेली. कारागृहात गॅसबत्या व कंदील उजळले. रात्री दोन वाजता निरोप आला की कारागृहात एक बाई वेदनांनी कळवळते आहे. जाऊन पाहिले, तर मघाशी सिव्हिलला पाठवलेलीच बाई समोर तळमळत होती. बाळंतपणाच्या चुकीच्या कळा, असे डायग्नोसिस करून कुणा डॉक्‍टरांनी तिला परत पाठवले होते. ती परत आल्याचे मला कळविण्यात आले नव्हते. आता ती कधीही बाळंत होईल अशी स्थिती होती. 

पाऊस जोरात कोसळतच होता. कंदिलाच्या उजेडात कोणतीच सोय नसलेल्या त्या ठिकाणी बाळंतपण करावे लागणार होते. बरोबरच्या नर्सला पाणी उकळून हत्यारे त्यात टाकायला सांगितली. बाकी तयारी केली. फिमेल जेलरच्या साह्याने घोंगड्या अंथरून घेतल्या. आडोसाही केला. जास्तीच्या बॅटऱ्या व कंदील मागवले. हात साबणाने धुऊन हॅंडग्लोव्हज चढवले. मनात देवाला विनवले, ‘देवा पोर आडवे येऊन देऊ नकोस. इथे सिझेरियन ऑपरेशनची सोय नाही आहे. आता तूच यातून आम्हाला तारून घेऊन जा.’

देवाच्या कृपेने सगळे निभावले. मुलगा झाला. नाळ कापून बाळाला तळहातावर घेतले. त्या नवजात बाळाने एक दीर्घ श्‍वास घेतला आणि आपण या जगात आलो असल्याची रडून ग्वाही दिली. बाळाला स्वच्छ करून टॉवेलात गुंडाळून ट्रेमध्ये ठेवले. 

ज्या ठिकाणी शेवटचा श्‍वास थांबल्याची मी खात्री करून घेत असे, तेथेच एका नवजात बालकाने माझ्या हातात पहिला श्‍वास घेतला. 

आता पहाटेचे पाच वाजत आले होते. पोलिस गाडी व एस्कॉर्टपण आला. मेडिकल नोटसह त्या बाईला तिच्या बाळासह त्या गाडीत बसवले. इतक्‍यात त्या बाईने विचारले, ‘‘साहेब तुमचे नाव काय? तुमच्या धावपळीने व हातगुणाने आज माझा बाळ माझ्या मांडीवर झोपला आहे. त्याला मी तुमचे नाव ठेवते.’’ मी म्हणालो, ‘‘बाई, या बाळाचे नाव कृष्णा ठेव. तो पण अशाच अंधाऱ्या रात्री, भर पावसाळ्यात, बंदिखान्यात जन्मला होता. म्हणून कृष्णा हेच नाव त्याला शोभेल.’’ ‘‘हो साहेब, नमस्कार,’’ ती म्हणाली. गाडी चालू झाली. 

पहाट उजळू लागली होती. मंद वाऱ्याची 
झुळक येत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wamanrao naik article

टॅग्स