‘हकालपट्टी’चा जन्म (मुक्‍तपीठ)

सां. रा. वाठारकर
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

अनेक शब्दांची उत्पत्ती ही निसर्गाकडे पाहूनच झाली असावी, हे त्या चार यत्ता शिकलेल्याकडून समजले. 

मी मध्यंतरी जुलैमध्ये गावाकडे गेलो होतो. तिथे गेले की शेताकडे चक्कर असतेच. तेथील बांधावर जांभळाचे झाड आहे. ते बघितले, की ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’ या ओळी मनात हमखास येऊन गुणगुणतात. या खेपेला जांभळाचा मोसम संपल्यानंतर तिथे होतो. मी सहज माझ्याबरोबर आलेल्या वाटेकऱ्याला विचारले, ‘‘अरे रामा! जांभळं भरपूर आली असतील ना या सीझनमध्ये!’’ चार यत्ता शिकलेला वाटेकरी आपल्या ग्रामीण ढंगात म्हणाला, ‘‘व्हय मायंदाळ आली हुती. आता नुकतंच झाड ‘हकलं’ झालंय.’’

‘हकलं झालंय’ हा शब्द ऐकला आणि मनात आले, झाडावरचा सगळा भार उतरून ते ‘हलकं’ झालेय असे त्याला म्हणायचे असेल. पण केवळ समजूत करून घेऊन गप्प बसवेना, म्हणून मी त्याला अर्थ विचारला. ‘‘आहो पाव्हणं, ‘हकालणे’, ‘हाकला’ हे शब्द तुमी वाचले असतीलच ना?’’ मी ‘होय’ म्हणालो. त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘ हकलं या शब्दावरूनच हे शब्द तयार झालेत.’’ हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले. काही शब्दांची उत्पत्ती अशा पद्धतीने होते, हे पहिल्यांदाच ऐकले होते. मी म्हणालो, ‘‘झाड हकलं झाले म्हणजे नेमके काय होते?’’ 

या प्रश्‍नावर तो उत्तरला, ‘‘अहो शेवटची सगळी फळं पडली व एकही मोहोर दिसला नाही, की झाड हकलं झालं असं म्हटलं जातं. झाड बोलत नसलं तरी त्याची बॉडी लॅंग्वेज आम्हाला समजते.’’ हे वाक्‍य ऐकवून त्यांनी आणखी एक आश्‍चर्याचा धक्का दिला. मी निरोप घेऊन घरचा रस्ता पकडला. पण जातानाही माझ्या डोक्‍यात राहिलेले ‘झाड हकलं झालं’ हे वाक्‍य मात्र जाता जाईना. मराठी भाषेत अनेक शब्दांची उत्पत्ती ही निसर्गाकडे पाहूनच झाली असावी, हे मनोमन पटते. प्रत्येक शब्दाची जन्मकहाणी वेगवेगळी असू शकते. अर्थात, हा संशोधनाचाच विषय आहे म्हणा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watharkar Write Article In Muktapeeth