भारताच्या मुळांचा शोध घेताना...

c v raman
c v raman

मागच्या लेखात आपण डावा आणि उजवा या दोन्ही विचारांच्या पलीकडे ब्रिटीशांच्या पूर्वी या देशाच्या मातीतला काही विचार अस्तित्वात होता का? असेल तर अर्थ, विज्ञान, महसूल, शिक्षण, शेती व्यापार या बाबत आमच्या काय व्यवस्था होत्या? असा प्रश्न उपस्थित झाला होता. भारताच्या मुळांचा शोध घेताना आपण फार प्राचीन काळ लक्षात घेत नसून केवळ अठराव्या शतकातील व्यवस्थांचा विचार करणार आहोत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबत ब्रिटीशांच्या पूर्वी असलेल्या व्यवस्था आणि प्रत्यक्षातील विज्ञानाचा उपयोग बघणे क्रमप्राप्त आहे.

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आपल्याकडे कमालीचा नकारात्मक भाव दिसून येतो. त्याला कारण देखील तसेच आहे. आपल्याकडे विज्ञानातील प्रत्येक आधुनिक शोध आमच्या देशात आधीच लागला होता असे सांगायची एक खोड आहे. विज्ञाना संबंधी भाकडकथा सांगून आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाला कमी लेखतोय. आपल्या असल्या मुर्खपणामुळे आपल्याच विज्ञानाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन दुषित होतो इतकी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आमच्या देशातील संत,शास्त्रकार आणि वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. मात्र या रचनेत भौतिकवादाला जागा नव्हती.

अवाजवी गरजा आणि उपभोगाचे स्थान यात दुय्यम होते. अध्यात्मातून मानवी जीवनास सुख आणि शांतता लाभेल असा प्रयत्न होता तर विज्ञानातून आवश्यक तेवढ्याच भौतिक गरजांची पूर्ती होती. पुढे युरोपीय भौतिकवाद आला आणि त्याने आपल्या सगळ्यांचे जगण्याचे मानदंड बदलुन टाकले. उपभोक्तावादाच्या प्रचंड आक्रमणात आमच्या जीवनपद्धतीचा पालापाचोळा झाला नसता तर नवल. १९९० नंतरच्या काळात हे सपाटीकरण वेगाने झालेले आपल्याला दिसेल.

मग आम्ही पश्चिमेला तोंड देण्याचा सोपा मार्ग स्वीकारला तो म्हणजे जे आज युरोप सांगतोय ते सारे काही आमच्याकडे आधीच होते. अर्थात आमच्याकडे काहीच नव्हते असे नव्हे. पण आमची आराध्य देवता असलेला गणपती म्हणजे संगणक असून त्याच्या समोर ठेवला जाणारा उंदीर हा संगणकाचा माउस अशी बाष्कळ विधाने केली जातात. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी मानवी शरीराला हत्तीचे डोके बसवून गणपती करणे हे प्लास्टिक सर्जरीचे जगातील पहिले उदाहरण आहे असे सांगणे त्यांना टाळता आले असते. अशी विधाने करताना संबंधितानी त्या विषयाचा आपला अभ्यास आणि त्यासंबंधीचे पुरावे या दोन्हीचा विचार करणे गरजेचे आहे.

सायंस मधील वादावर बोलताना जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी सांगितले की असे दावे करताना त्यासाठी लागणारे ठोस असे पुरावे आणि संदर्भ देता आले पाहिजे अन्यथा या देशात होऊन गेलेल्या सुश्रुतापासून तर जगदीशचंद्रापर्यंत आणि कणादांपासून कलामांपर्यंतच्या संशोधनाचे महत्व कमी होते.

प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमन १९४९ मध्ये प्रयाग येथील एका महाविद्यालयात म्हणाले होते,
“Boys when we import, we not only pay for our ignorance but we also pay for our incompetence”.
भारतीय विज्ञानासंबंधी स्वामी विवेकानंदाची मते लक्षात घेण्याजोगी आहेत. कारण धर्मपाल विज्ञानाच्या बाबतीत ज्या कालखंडाचा अभ्यास करीत होते त्या कालखंडात स्वामीजी येतात. २३ ऑक्टोबर १९०० मध्ये फ्रान्सच्या पॅरिस शहरात एका सायन्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या परिषदेला स्वतः स्वामी विवेकानंद उपस्थित होते. या परिषदेत स्वामीजींचे अप्रतीम असे भाषण झाले. या परिषदेत सुप्रसिद्ध विचारवंत आणि संस्कृत चे गाढे अभ्यासक फ्रेडरिक म्याक्स्मुलर आणि विन्सेट स्मिथ उपस्थित होते. या परिषदेनंतर स्वामीजी तत्कालीन सुप्रसिद्ध वैज्ञानिक निकोला टेसला यांना भेटले.

स्वामीजींनी टेसला यांना पदार्थ आणि उर्जा यात द्वैत नसून ते एकच आहेत आणि ते गणितीय भाषेत सिद्ध करावे अशी सूचना केली. मात्र निकोला टेसला यांना त्यात यश आले नाही. मात्र सांख्य दर्शनाने टेसला प्रभावीत झाले होते. पुढे जाऊन स्वामीजी विख्यात शास्त्रज्ञ विलियम थांपसन आणि व्हॉन हेलमोल्ट यांना भेटले. त्यांच्यात बरीच वैज्ञानिक चर्चा झाली. पुढे जाऊन १९०५ मध्ये अल्बर्ट आईनस्टांईन यांनी E = mc२ या सूत्राद्वारे पदार्थ आणि उर्जा एक असल्याचे सिद्ध केले. १९२९ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ वार्नर हायजेनबर्ग भारतात गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या विनंतीवरून आले. त्यांच्यात झालेल्या वैज्ञानिक चर्चेतून त्यांच्या लक्षात आले की भौतिक जगाचे सत्य काय आहे तर हे संपूर्ण भौतिक जग हेच Law of impermanence या तत्वावर चालते ते एकमेकांशी संलग्न आहे. त्याला विभक्त करता येत नाही.

वाराणशी येथील वेधशाळा आणि खगोलविज्ञान
वाराणशी येथील वेध शाळेवरील सर रोबर्ट बार्कर, सदस्य रॉयल सोसायटी, लंडन यांनी १७७७ मध्ये लिहिलेला लेख तत्कालीन वैज्ञानिकतेवर प्रकाश पडावा या करीता पुरेसा आहे. तो त्यात म्हणतो,
“ बनारस ही हिंदूंची धार्मिक नगरी असून; इथे अनेक विद्वान, संत आणि धर्मगुरू राहतात. इथे अनेक ध्यानकेंद्रे, संस्कृत शाळा, चिकित्सालय आहेत. येथील काही मंडळी भविष्यात होणाऱ्या चंद्र व सूर्य ग्रहणाबाबत अचूक माहिती देतात असे मला कळले. १७७२ मध्ये मी त्यांच्या या भविष्यवाणी करण्याच्या पद्धतीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र मला कुणीच समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांच्या मते याचे ज्ञान फारच थोड्या लोकांकडे होते. त्यांच्याकडे काही पुस्तके होती जी खगोलीय कोष्टके होती. ज्याचा अर्थ काहीच लोकांना कळत असे. त्यानंतर मला एका खगोलीय परीक्षणासाठी असलेल्या एका इमारतीकडे नेण्यात आले. त्या इमारतीच्या आम्ही आत शिरल्यावर एका विशाल छतावर आम्ही पोचलो आणि बघतो तर काय! दगडांनी बनविलेली विशालकाय यंत्रे समोर दिसली. यातील काही दगडी यंत्रे २० फूट उंच होती. त्यांचे निर्माण शंभर-दोनशे वर्षापूर्वी झाले असेल मात्र ती यंत्रे अतिशय चांगल्या स्थितीत होती. त्या दगडी बांधकामाकडे बघितल्यानंतर काहीतरी गणितीय वास्तू असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत होते” पुढील लेखात यावर अधिक माहिती बघू या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com